आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघर्ष जगण्याचा : स्मशानभूमी ते चारचाकीपर्यंत औरंगाबादच्या चार्लीचा खडतर प्रवास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - चार्ली चॅप्लिन हे नाव जरी कुणी काढले तरी आज जगभरातील अनेक पिढ्या भारावून जातात. तोंडातून चकार शब्दही न काढता ज्या महान कलाकाराने या पिढ्यांचे निखळ मनोरंजन केले, अंतर्मुख करणा-या मार्मिक विनोदांनी ज्याने कधी मनाचा ठाव घेतला अगदी तसाच हुबेहूब चार्ली होऊन औरंगाबादचा एक अवलिया कलाकार जगतो आहे. सोमनाथ शिवहारअप्पा स्वभावणे हे या औरंगाबादी चार्लीचे मूळ नाव. ३४ वर्षांच्या या तरुणाला कोणीही चार्लीच्या रूपात पाहिले की आपोआप आपल्या चेह-यावर हास्य उमटते.

स्मशानात जन्म
सोमनाथची आई शकुंतलाबाई व वडील शिवहारअप्पा दोघेही अशिक्षित शेतमजूर. मूळ गाव पैठण तालुक्यातील बालानगर. पोटाची खळगी भरण्यासाठी दोघेही औरंगाबादला आले. हाताला काम नाही, राहायला जागा नाही म्हणून क्रांती चौक स्मशानभूमीतच त्यांनी मुक्काम ठोकला. तेथेच त्यांना वॉचमनची नोकरी मिळाली. याच स्मशानात १९८० मध्ये लहानग्या सोमनाथचा ऊर्फ चार्लीचा जन्म झाला. तेथेच तो वाढला.
मिकी-माऊस ते चार्ली...
शिक्षण सुटले पण अनुभवाच्या कॉलेजातून त्याने ज्ञानाची पीएचडी मिळवली अन् तेथेच सोमनाथला चार्ली सापडला. १९९९ मध्ये रस्त्यावर, जत्रेत मिकी-माऊसची वेशभूषा करून मनोरंजन करून तो पैसे कमावू लागला. येथेच त्याला अभिनयाचे बाळकडू मिळाले; पण काही महिन्यांतच अशा मिकी-माऊसची संख्या वाढल्याने अनेक स्पर्धक तयार झाले. पुन्हा चार्लीची आर्थिक घडी विस्कटली.
गरिबीमुळे शिक्षणात खंड
सोमनाथने महापालिकेच्या शाळेत चौथीपर्यंत कसेबसे शिक्षण घेतले. मात्र, घरखर्चाला हातभार लावण्यासाठी चॉकलेट, गोळ्या, बिस्किटे विक्री सुरू केली. हुशार असूनही शाळा सोडावी लागली. जगन्नाथअप्पा वाडकर या ज्येष्ठ समाजसेवकांच्या घरी घरगडी म्हणून वडिलांना नोकरी मिळाल्यावर छोटा सोमनाथ पुन्हा शाळेत गेला. सातवी पास होत नाही, तोच पुन्हा गोळ्या, बिस्किटे विकण्याची वेळ आली. शाळेतील एका शिक्षकांची दोन वर्षांनी भेट झाली. त्यांनीच
सोमनाथला थेट दहावीला बसवले; पण अभ्यासाला वेळ मिळाला नाही. तो दहावी पूर्ण करू शकला नाही.
...अन् चार्लीचा जन्म झाला
एक दिवस टीव्हीवर चार्ली चॅप्लिनची चेरी या शू पॅालिशची जाहिरात सोमनाथने पाहिली. आपणही चार्ली चॅप्लिन व्हावे आिण लोकांचे मनोरंजन करून पोट भरावे, असा विचार त्याच्या मनात आला. पण चार्लीचा पोशाख महाग, त्याचा मूकाभिनय कसा अन् कोणाकडून शिकावा हा प्रश्न. शेवटी वारंवार ही जाहिरात वारंवार पाहूनच त्याने चार्ली आत्मसात केला आिण २००३ पासून लग्न समारंभात चार्ली सादर करायला सुरुवात केली.
शून्यातून शून्याकडे...
स्मशानभूमीत जन्मलेल्या सोमनाथरूपी या चार्लीला त्याने केलेल्या सादरीकरणापोटी कुणी २
हजार, कुणी ३ हजार रुपये देऊ लागले. २००३ मध्ये त्याचे लग्न झाले. २००९ मध्ये त्याला औरंगाबादेत कमलनयन बजाज रुग्णालयातील कँटीनमध्ये मॅनेजर पदावर काम करण्याची संधी कँटीन कंत्राटदार नारायण वैद्य यांनी दिली. चार्लीचा प्रामाणिकपणा व मेहनत करण्याची तयारी पाहून वैद्य यांनी त्याला ते कँटीन स्वतंत्रपणे चालवण्याची संधी दिली. २०११ ते २०१२ या दोन वर्षांत चार्लीची आर्थिक भरभराट झाली. त्याने दर सहा महिन्यांनी एक असे करत चार चारचाकी घेतल्या. घरही घेतले; पण २०१२ च्या शेवटीच त्याचे कंत्राट रद्द झाले. त्याने पंधरा हजारांवर ठेवलेले दोन मॅनेजर, दहा कामगारांचा पगार द्यावा लागला. तेव्हा कार अन् घरही विकावे लागले. चार्ली मिळेल ते काम घेऊ लागला. कामाचे व्यवस्थापन न जमल्याने डोक्यावर लाखोंचे कर्ज झाले.
... आणि मुंबई गाठली
कर्जबाजारी सोमनाथला थकबाकीदारांनी मारहाण केल्याने तो निराश झाला. आत्महत्येचा
विचारही मनात आला. पण, चार्लीने मुंबई गाठली. त्याच्यासोबत होता फक्त कोट.

मुंबईत चार्ली पुन्हा प्रकटला...
म्हातारे आई-वडील, बायकोसह ५ वर्षांचा मुलगा अन् १ वर्षाची मुलगी यांना सोडून मुंबईत पळून आलेला चार्ली उपाशीपोटी दादर रेल्वेस्टेशनवर उतरला. त्याने गाडीतच चार्लीचा डगला चढवला. काही लोकांनी त्याच्याकडे पाहून पैसे दिले; मग तेथेच त्याने चार्ली चॅप्लिन शो सुरू केला. येणा-या-जाणा-या प्रवाशांचे स्वागत तो चार्लीच्या वेशात करी. काही दिवासांनी तो चर्चगेट, गेट वे ऑफ इंडिया येथे रत्यावर शो करू लागला. ६ महिने त्याने मुंबईत पायी शो केले.
सर्व देवस्थानांत मोफत प्रवेश
मुंबईत सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी चार्ली त्या वेशभूषेतच गेला. तेव्हा ट्रस्टींनी त्याला थेट देवाजवळ नेले. मुंबईतील सर्वच मानाच्या देवळांत त्याला मान मिळाला. एकदा तो मुंबईहून चार्लीच्या वेशभूषेतच तिरुपती बालाजीच्या दर्शनाला गेला. तेथेही देवस्थानाने सन्मानाने त्याला थेट देवासमोर नेऊन दर्शन करवले. ख-या चार्लीचा सन्मान पाहून हा औरंगाबादी चार्ली भारावला. त्याचे डोळे पाणावले. त्याने थेट आैरंगाबाद गाठले व फक्त चार्लीचेच शो करण्याचा संकल्प केला.
एड्सग्रस्तांना मदत : चार्ली ऊर्फ सोमनाथ अनाथ मुलांत रमतो. त्यांच्यसाठी मोफत शो करतो. गेल्या आठवड्यात एड्ग्रस्त मुलांसाठी त्याने शोमधून मिळालेले ८ हजार रुपये दान केले.
मार दिला त्यानेच दाखवली उज्ज्वल भविष्याची वाट...
सिक्रेट हे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे राँडा बायर्न या लेखकाचे बेस्ट सेलर पुस्तक आहे. याची सीडीदेखील आहे. एका देणेक-याने एकदा गुंडांकडून चार्लीस मारहाण केली. त्यानेच चार्लीच्या हातात ही सीडी दिली. चार्लीने कुतूहलापोटी ती सीडी पाहिली व त्याला भविष्याचा मार्ग मिळाला.
ती सीडी पाहून त्या भविष्याची स्वप्ने घराच्या भिंतीवर लिहून ठेवायला सुरुवात केली व दररोज स्वत:शी सकारात्मक बोलण्यास सुरुवात केली.
चार्लीनेच कर्ज फेडले...
सोमनाथमध्ये दडलेल्या चार्लीने त्याचे बरेचसे कर्ज फेडले; अजून पाच लाख देणे आहे. शो करून तो पैसे फेडतो आहे. तो म्हणतो, चार्लीच्या रूपात मी जेव्हा जातो, तेव्हा मी तणावमुक्त होतो. कर्जाचा मला विसर पडतो. देहभान हरपते. मी सतत १८ तास चार्ली जगतो; पण त्या रूपातून बाहेर येताच मी खूप दु:खी होतो.