आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...म्हणूनच आम्ही मद्यपाशातून मुक्त झालो, वाचा यांनी कसे सोडले व्यसन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुणाच्या आयुष्याची राखरांगोळी झाली, कुणाचे कुटुंब उद््ध्वस्त झाले. जवळचे दुरावले. काहींची नोकरी गेली, तर काहींची आर्थिक परिस्थिती ढासळली. नकळत एकदा चव चाखली आणि या दारूने विळखा घातला. व्यसन इतके वाढले की, सारेच संपल्यागत झाले. आता शेवट आला, असे वाटत असतानाच शहरातील एका जागतिक स्तरावरील संस्थेने आशेचा किरण दाखवला. तेथील सभेतून बिघडलेले शरीर आणि मनाला घडवण्याचे गमक कळाले. या संस्थेतील अनेक मद्यपीडितांचे केवळ अनुभव ऐकले तरी धीर मिळतो. प्रत्यक्ष सभा अटेंड केल्या तर व्यसन सुटते, असा दावा अनेकांनी केला आहे. त्यांचे अनुभव येथे देत आहोत...

माझे नाव संजय. मी एक ठार दारुडा. वयाच्या १६ व्या वर्षापासून दारू पीत होतो. नंतर वयाच्या ४० वर्षांपर्यंत माझ्या आयुष्यात दारू होती. दारूमुळे मी पार वेडा झालो. बायको सोडून गेली. नोकरीवरून काढून टाकण्यात आले. आर्थिकदृष्ट्या मी खंगून गेलो तरीही दारू सुटली नाही. उलट इंग्लिशवरून देशीवर आलो होतो. हातपाय थरथरत होते, मरतो की काय अशी अवस्था झाली होती. सर्व उपाय करून पाहिले, इलाज केला; पण दारू सुटली नाही. अशातच एका मित्राने अल्कोहोलिक्स अॅनॉनिमस बद्दल (एए) सांगितले आणि मी त्यांच्या सभांना जायला लागलो. तिथे इतर दारू पिणाऱ्यांचे अनुभव ऐकून मलाही चूक केल्याची जाणीव व्हायला लागली. अशा रीतीने हळूहळू मी दारूपासून दूर होत गेलो.

माझ्यासारख्या दारुड्याचा सन्मान झाला
माझेनाव सुनील. दिवस-रात्र दारूमुळे घराबाहेर काढण्यात आले तरीही दारू सुटली नाही, कर्जबाजारी झालो. सर्वत्र माझी अवहेलना होत होती. मात्र, मी मद्यपीडितांच्या सभेला यायला लागलो. तेव्हापासून माझा तिथे सन्मान व्हायला लागला. पहिल्यांदा सभेला गेलो तेव्हा सर्वांनी माझे टाळ्या वाजवून स्वागत केले आणि माझ्यासारख्या दारुड्याचाही सन्मान झाल्याने थोड्या वेळापुरते बरे वाटले. नंतर सर्व सदस्यांनी मला मित्र बनवले. एरवी मला सगळ्यांनी वाळीत टाकले होते. एका सदस्याने सांगितलेल्या अनुभवातील प्रत्येक क्षण मला आपलाच वाटत होता. विशेष म्हणजे इथे आपले नाव सांगण्याचे कोणतेच बंधन नसल्यामुळे मी नेहमी बिनधास्त राहिलो. एकमेकांच्या अनुभवातून खरे जीवन कळाले. दोन वर्षे झाले दारू सोडून. या काळात कधीच पुन्हा दारू प्यावी वाटली नाही.

कुटुंबाप्रमाणे वागणूक मिळाली
माझेनाव अनंत. वयाच्या २३ व्या वर्षापासून मी दारू पीत होतो. सलग २० वर्षे हे व्यसन होते. घरात भांडणे, कामावरही परिणाम झाला. रोज सायंकाळी घरी आल्यावर हातपाय थरथर कापत होते. आई-वडिलांचेही मी कधीच ऐकत नव्हतो. खूप प्रयत्न केले, पण दारू सुटली नाही. रात्री २-२ वाजता उठून पीत होतो. एका मित्राचा फोन आला, सभांबद्दल सांगितले. मात्र, सभेला जाण्यापूर्वी मनामध्ये भीती होती. बांधून तर ठेवणार नाहीत ना? इंजेक्शन तर देणार नाहीत ना? असे सवाल वारंवार मनात यायला लागले. तिथे गेल्यावर सर्व गैरसमज दूर व्हायला लागले. हे सारे आपल्यासारखेच आहेत याची अनुभूती आली. दारूमुळे आपला संसार कसा उद््ध्वस्त झाला याबाबत ग्रुपच्या एका सभासदाचे अनुभव ऐकून मला माझा भूतकाळ आठवला. इथे आल्यावर एका कुटुंबाप्रमाणे मला वागणूक मिळत गेली. इथे कोणतेच समुपदेशन केले जात नाही किंवा उपदेशही दिला जात नाही. मी नियमितपणे सभा अटेंड करत गेलो आणि गेल्या तीन महिन्यांपासून मी दारूला स्पर्शही केला नाही. आता माझा संसार सुरळीत सुरू आहे. घरात वाद होत नाहीत, मनाची शक्तीही वाढली आहे.
पुढे वाचा...
> ...आणि माझे अंधकारमय जीवन दिसायला लागले
>मी ठार वेडा झालो होतो आणि...
>सहानुभूती मिळाली
>‘एए’च्या १२ पायऱ्या
>समूहांच्या सभांद्वारे मद्यमुक्ती
>या ठिकाणी घेतल्या जातात दररोज सभा
>कुटुंबांसाठीसुद्धा सभा
>काय आहे अल्कोहोलिक्स अॅनॉनिमस?
बातम्या आणखी आहेत...