आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कफल्लकाच्या ‘दानत’मुळे गरिबांची ईद मुबारक!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - खिशात पैसा असला तर दानधर्म, समाजसेवा करणारे अनेक आहेत. त्याविरुद्ध पैसा असूनही इतरांना मदत करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. पण एक कफल्लक असा आहे की तो दान मागून गरजू, गरिबांना हजारो रुपयांची मदत करत आहे. गरिबांची ईद खऱ्या अर्थाने मुबारक व्हावी यासाठी महेमूद शहा सांडू शहा महिनाभरापासूनच कामाला लागले आहेत. गरिबांना जकात (दान) मिळवून देण्यासाठी ते घरोघरी धान्य आणि जुने कपडे मागत अाहेत. जुलै रोजी बडा रोजाच्या निमित्ताने शहरातील गरिबांमध्ये याचे वाटप करणार आहेत.
भोकरदन तालुक्यातील पारध खुर्द गावचे महेमूद शहा सांडू शहा १८ वर्षांपूर्वी कामाच्या शोधात औरंगाबादेत आले. जुने कपडे घेऊन भांडी देण्याचा व्यवसाय करू लागले. तर पत्नी रुखसाना धुणी-भांडी करतात. मुले जावेद, इकबाल मातीकाम तर सोहेल हॉटेलवर कामाला आहे. बाबर कॉलनीतील या कुटुंबाचा दररोज जगण्यासाठी संघर्ष सुरू असताना ते गरजूंना मदतीचा हात देतात. फुलंब्री रोडवरील नायगाव-टी पाॅइंट येथे त्यांनी दयावान बेसहारा अनाथाश्रम सुरू केले. येथे १६ महिला पुरुष राहतात. अनाथालयाचा खर्च भागवण्यासाठी शहा घरोघरी जाऊन एक रुपया जकात मागतात. पैशांबरोबरच अनेक जण गहू, पीठ, तेल, तांदूळ, जुने कपडे देतात. त्यांचे हे समाजकार्य पाहून गरवारे पॉलिस्टरचे निवृत्त अध्यक्ष अनिल भालेराव, अपंग रिक्षाचालक श्रीराम फुकटे, इलेक्ट्रिशियन सरवर शहा, प्रयास ग्रुपचे रवी चौधरी, युवाशक्ती सोशल ग्रुप त्यांना मदत करतात.

ईदसाठी लगबग : ईदला आपल्या कमाईतील एक भाग गरिबांना जकात रूपात देण्याची परंपरा आहे. अनेक गरीब, निराधारांना ईदच्या आनंदापासून वंचित राहावे लागते. त्यामुळे शहा पाच वर्षांपासून ईदनिमित्त गहू, साखर, तांदूळ, तेलासह जुने कपडे संकलित करतात. हे साहित्य ते जकात म्हणून बडा रोजाच्या दिवशी बसस्टँड, रेल्वे स्टेशन, सेव्हन हिल उड्डाणपूल अशा ठिकाणी गरिबांमध्ये वितरित करतात. केवळ मुस्लिम बांधवांनाच नव्हे तर सर्वांनाच ते मदत देऊ करतात. यंदा जुलै रोजी बडा रोजा असून त्यासाठी त्यांनी साहित्य गोळा केले आहे.
त्यांचीही ईद मुबारक व्हावी
गरिबांनाही ईदच्या आनंदात सहभागी होता यावे, असा आमचा हा प्रयत्न आहे. समाजात अनेक दानशूर आहेत. पण त्यांच्यापर्यंत काेणी पाेहोचत नाही. अशा दानशूरांच्या मदतीवरच बडा रोजाच्या दिवशी अनाथ, गरिबांची ईद मुबारक करणार आहे. महेमूदशहा सांडू शहा, दयावान बेसहारा अनाथाश्रम
बातम्या आणखी आहेत...