आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Story Of Person Who Is Helping Others Despite Him Being Poor

कफल्लक असूनही अनाथांचा पोशिंदा, मोलमजुरी करून 14 जणांचा सांभाळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खिशात पैसा असला की दानधर्म, समाजसेवा करणारे खूप सापडतात. अनेक जण पैसा असूनही इतरांना मदत करण्यास कचरतात, पण एक कफल्लक स्वत:कडे काहीच नसताना घरोघरी दान मागून इतरांना दान देत आहे. त्यांनी आजारी, वृद्ध व बेवारस लोकांसाठी मोफत अनाथाश्रम सुरू केला असून 14 गरजू येथे आनंदात राहत आहेत. या कामात मोलमजुरी करणारी दोन मुले आणि भांडीकाम करणारी पत्नीही सहभागी झाली आहे. कामातील प्रामाणिकपणा पाहून आता अनेक व्यक्ती व संस्थाही मदतीसाठी सरसावल्या आहेत.

महेमूद शहा सांडू शहा असे या वल्लीचे नाव. मूळ भोकरदन तालुक्यातील पारध खुर्द गावचे. लहानपणापासूनच अडचणीतील लोकांची मदत करण्याची त्यांना सवय होती. घरातील उत्पन्नाचे साधन म्हणजे गुर्‍हाळ आणि पाच एकर शेती. समाजसेवेच्या नादात गुर्‍हाळ चालले नाही. घरखर्च आणि इतरांच्या मदतीसाठी तुकडा-तुकडा करत जमीनही विकून टाकली. मग शहा यांनी 18 वर्षांपूर्वी औरंगाबाद गाठले. पीर बाजारात भाड्याची खोली घेऊन राहू लागले. ते जुने कपडे घेऊन भांडे देण्याचे काम करू लागले, तर पत्नी रुखसाना यांनी धुणी-भांड्याचे काम सुरू केले. त्यांना तीन मुले. जावेद, इक्बाल मातीकाम करतात, तर तिसरा सोहेल एका हॉटेलवर कामाला आहे. स्वत:चा जगण्यासाठी संघर्ष सुरू असतानाही इतरांना मदत करण्याची वृत्ती कायम आहे.

अनाथालयाचा निर्णय

महेमूद यांना रस्त्यावर अनाथ, आजारी, वृद्ध आणि असहाय लोक दिसायचे. त्यांच्यासाठी आपण काही तरी केले पाहिजे, असे त्याना वाटत असे. यातूनच मग त्यांनी या गरिबांसाठी अनाथालय सुरू करण्याचे ठरवले.