आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Story Of Poor Mother Who Want Feed Milk To Daughter

पाया पडते, माझी एक मुलगी गेली, दुसरीला तरी दूध पाजू द्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मी येथे पहिल्यांदाच आले, या शहराने माझी मुलगी हिरावून घेतली. आता माझ्या सहा महिन्यांच्या दुसऱ्या मुलीला तरी दूध पाजू द्या, मी तुमच्या पाया पडते, कृपा करा माझी मुलगी परत द्या, अशी केविलवाणी विनवणी मृत आम्रीबालाची आई सूर्याशा पोलिसांकडे गुरुवारी दिवसभर करीत होती. मात्र कायद्याच्या बंधनामुळे पोलिसांसह प्रशासनाला चिमुकल्या मुलीला तिच्या आईकडे सोपवता आले नाही.

दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील चौकात सूर्याशा ही भिक मागताना पोलिसांना सापडली होती. तिच्या कडेवर असलेली तीन वर्षाची मुलगी मृत झाली होती. त्यानंतर अनेक शंका उपस्थित करण्यात आल्या. तिची सहा महिन्यांची मुलगी समाज सेवा केंद्रात ठेवण्यात आली आहे. ती केवळ आईच्या दुधावर आहे. मात्र चौकशी सुरू असल्यामुळे या कुटुंबातील इतर चारही मुलांना आई- वडिलांपासून दूर ठेवण्यात आले आहे. फक्त सहा महिन्यांच्या माझ्या मुलीला तरी दूध पाजण्यापुरते मला द्या, अशी केविलवाणी विनवणी ही आई पोलिसांकडे करत होती. ही मुले त्यांचीच आहेत हे सिद्ध करण्यासाठी राजस्थानहून त्यांचे नातेवाईक निघाले आहेत. त्यांना येण्यासाठी किमान दोन दिवस लागतील. तोपर्यंत या आईची आणि मुलीची भेट होईल का, प्रशासनाला त्यांची कीव येईल का, हा प्रश्न आहे. याविषयी तपास अधिकारी जयश्री कुलकर्णी यांना विचारले असता बाल कल्याण समितीच्या सूचनेनुसारच पुढील कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

गुरुवारी बेगमुपरा पोलिसांनी दीड तास तिचा जबाब घेतला. तेव्हा ती म्हणाली, गावाकडे आमची पाच बिगा जमीन आहे. घरात नवऱ्यासह तीन भावंडे आहेत. एक बहीण आणि भावाचे लग्न बाकी आहे. उन्हाळ्यात सांगोत (राजस्थान) येथे काहीच काम नसते. गेल्या तीन वर्षापासून माझा दीर औरंगाबादला येतो. कधी भिक मागतो तर कधी वस्तू विकतो. अशा प्रकारे त्याच्या कुटुंबाची गुजराण होते. गावात काहीच काम मिळाले नाही म्हणून आम्हीसुद्धा आलो होतो. तेवढ्यात माझी मुलगी आजारी पडली. जन्मापासून ती पांगळी होती. तीन वर्षाची झाली तरी तिला चालता येत नव्हते. अन्ननलिकेचाही त्रास होता. अखेर तिचा जीव गेला. हे सांगताना सूर्याशा धाय मोकलून रडत होती. तिला राजस्थानीशिवाय दुसरी भाषा येत नाही. पोलिसांनी त्या कुटुंबाला फोन करताच मुले परत मिळणार म्हणून अवघ्या काही मिनिटात धावत पळत ते पोलिस ठाण्यात आले. मात्र आजही त्यांना समाज सेवा केंद्रात असणाऱ्या मुलांना भेटता आले नाही. ही मुले त्यांचीच आहेत, हे सिद्ध करणारी कागदपत्रे जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत त्या सहा महिन्यांच्या मुलीला आईच्या कुशीची वाट पाहावी लागणार आहे.

मुलांची काळजी घेतो
ज्या ठिकाणी शंका निर्माण होते त्या प्रकरणात मुलांना आणि आई-वडिलांपासून वेगळे ठेवले जाते. अगदी एक दिवसाच्या बाळासंदर्भातदेखील हा निर्णय घ्यावा लागतो. मात्र समाज सेवा केंद्रात मुलांना सर्व सुविधा पुरवल्या जातात. - अॅड. रेणुका घुले, अध्यक्ष,बाल कल्याण समिती