औरंगाबाद - तीन दिवसांपूर्वीच रसिकाने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र, सहा वर्षांच्या जिगीषाने आईचेे मन वळवले होते. त्यानंतर तिच्या आई-वडिलांनीही समजून सांगितले. मात्र, दु:ख एवढे मोठे होते की हे समजावणेदेखील तोकडे पडले. अखेर शुक्रवारी (१७ जून) मृत्यूला कवटाळणे तिला जगण्यापेक्षा सोपे वाटले, अशी माहिती रसिकाचे वडील शिवकरण हेळंबकर यांनी दिली.
जून २००८ रोजी रसिकाचे लग्न कालिदाससोबत झाले होते. लग्नात सात लाख रुपये हुंडा दिला होता. लग्नानंतर रसिकाच्या दिसण्यावरून तो तिला हिणवू लागला. दीड वर्षानंतर या दोघांना एक गोंडस मुलगी झाली. त्यानंतर मात्र रसिकाच्या आयुष्याला ग्रहण लागले. मुलगा झाला नाही म्हणून तिचा छळ सुरू झाला. सासू, सासरे, नणंद रसिकाला हिणवत होते असे तिचा भाऊ उत्सव याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. वंशाला दिवा हवा होता, मात्र तू मुलीला जन्माला घातलं, तू करंटी आहे, असे म्हणत तिच्या सासरची मंडळी आणि नवरा तिला त्रास देत होते. लग्नाच्या वेळी रासिकाच्या वडिलांनी हुंड्यात फड कुटुंबीयांना सात लाख रुपये दिले होते. त्यानंतरदेखील सातारा परिसरात प्लॉट घेण्यासाठी दोन लाख रुपये दिले होते. मात्र, कालिदास अजून पाच लाखांची मागणी करत होता. तिच्या वडिलांकडे पैसे नसल्यामुळे ते अपेक्षा पूर्ण करू शकले नाहीत. तक्रारीनंतर नवरा कालिदास फड, सासरा दिनकर, सासू कौशल्या (रा. गंगाखेड, जि परभणी) नणंद रेखा (रा. गंगाखेड) यांच्याविरोधात कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक रवींद्र बागूल यांनी कालिदासला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनवण्यात आली.
अक्काकडे जायचे होते : जिगीषाचे गल्लीतील एका काकूसोबत अधिक जिव्हाळ्याचे सबंध होते. आजी-आजोबांची ती लाडकी होती. मला सकाळी सव्वापाचच्या सुमारास आईने अक्काकडे जायचे, असे सांगितले. म्हणून मी आईसोबत गेले. मात्र, विहिरीजवळ आल्यानंतर तिने मला पाण्यात टाकून दिले. मी दोरीचा आधार घेऊन कसेतरी थांबले. पेपरवाल्या काकांनी माझा आवाज ऐकला. मग बाबांनी मला बाहेर काढले, असे सात वर्षांची जिगीषा म्हणाली. आईच्या मृत्यूने तिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
जिगीषाला वाचवणाऱ्या गायकेंचा सत्कार
सोमवारी सकाळी जिगीषाला तिच्या आईने शाळेत सोडले. मात्र, ती बेचैन होती. दुपारी तिला परत आणले आणि विहिरीत उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, जिगीषाने आईला घरी परत येण्यास भाग पाडले. ही गोष्ट रसिकाच्या आई- वडिलांना कळाली. त्यांनी तिला खूप समजून सांगितले. मात्र, चौथ्या दिवशी तिने आत्महत्या केली. कालिदास हा रसिकाच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याची माहितीही पोलिसांनी दिली.
शाळेतून परत आणले
वृत्तपत्र विक्रेता परसराम गायके यांच्या सतर्कतेमुळे जिगीषाचे प्राण वाचले. याबद्दल वृत्तपत्र विक्रेता संघटना सभागृहनेते राजेंद्र जंजाळ यांनी त्यांचा सत्कार केला. या वेळी अध्यक्ष अण्णासाहेब जगताप, नीलेश फाटके, गणेश भोसले, स्वागत मानकर, प्रकाश वाघ आदी उपस्थित होते.