आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्ञात-अज्ञात रक्तदात्यांचे शेकडो रुग्णांना जीवनदान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- अपघात, गंभीर आजारी रुग्णांना अनेकदा तातडीच्या रक्ताची गरज भासते. ब-याचदा गंभीर रुग्णांना हवे त्या गटाचे रक्त उपलब्ध होत नाही. ऐनवेळी डॉक्टरांसह रुग्णांच्या नातेवाइकांची मोठी धावपळ उडते. अशा वेळी शहरातील सामाजिक संस्थांद्वारे आयोजित रक्तदान शिबिरे व स्वेच्छा रक्तदानाचा मोठा फायदा होतो. या माध्यमातून जमा झालेले रक्त शेकडो रुग्णांचे प्राण वाचवून रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांच्या जीवनात आनंद निर्माण करतात. वर्षभरात विविध सामाजिक संस्थांनी शिबिरांच्या माध्यमातून तब्बल 12 हजार 500 बाटल्या रक्त घाटीच्या रक्तपेढीस उपलब्ध करून दिले आहे. याचा हजारो रुग्णांना
लाभ झाला आहे.

घाटी रुग्णालयात कॅन्सर, जळालेले रुग्ण, अपघातात गंभीर जखमी झालेल्या रुग्णांना अचानक रक्ताची गरज भासते. अशा रुग्णांना शासकीय रक्तपेढीतून तातडीने रक्त उपलब्ध करून दिले जाते. ब-याचदा हव्या त्या गटाच्या रक्ताचा तुटवडा असतो किंवा ऐनवेळी ते उपलब्ध होत नाही. अशा वेळी शहरातील विविध सामाजिक संस्था रुग्णांच्या मदतीसाठी धावून येतात. दिनविशेष, वाढदिवस अन्य प्रसंगी रक्तदान शिबिरांचे आयोजन करून ते रक्त घाटीच्या रक्तपेढीस दिले जाते.

या वर्षी विविध सामाजिक संघटनांच्या वतीने शहरात 205 रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येऊन 12500 बाटल्या रक्त संकलन करण्यात आले. यात ऐच्छिक रक्तदात्यांचे प्रमाण 10 हजार होते. 2500 जणांनी बदली रक्त दिले. या रक्तातूनच प्लेटलेट्स, प्लाझ्मा, पीसीव्ही हे घटक वेगळे करून रुग्णांना उपलब्ध करून दिले जाते. दिवाळी, उन्हाळ्याच्या सुटीत बºयाचदा रक्ताचा तुटवडा भासतो. अशा वेळी सामाजिक संस्थांनी शिबिरांद्वारे रक्त उपलब्ध करून दिल्यास मोठा फायदा होतो.

सामाजिक संस्थांचा पुढाकार
सामाजिक संस्था दिलेल्या बाटल्या
संत निरंकारी संस्था 833
जमाते इस्लामी हिंद 453
श्री जगद्गुरू नरेंद्राचार्य 403
महाराज भक्त सेवामंडळ
अल फरहान मेडिकल फाउंडेशन 309
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय 233
औरंगाबाद एज्युकेशन अँड 178
वेल्फेअर सोसायटी
एनसीसी, छावणी 166
बीकेटी टायर्स 150
बडवे इंजिनिअरिंग 144
सिद्दिकी वेल्फेअर सोसायटी 115


स्वेच्छा रक्तदानावर भर हवा

रक्तदानाविषयी समाजात अजून गैरसमज आहेत. त्यासाठी जनजागृतीची गरज आहे. एका रक्तदानाने आपण तिघांचे प्राण वाचवू शकतो. ग्रामीण भागात स्वेच्छेने रक्तदान करणा-यांचे प्रमाण अतिशय कमी आहे. यासाठी आम्ही शिबिरे घेऊन रक्तदानाचे महत्त्व पटवून देत आहोत. वाढदिवस आणि पुण्यतिथीनिमित्त रक्तदान करून रुग्णांना मदत करा.
डॉ. के. एस. भोपळे, अधिष्ठाता, घाटी

रक्तदान केल्याने रक्तप्रवाह चांगला राहतो. नवीन रक्तपेशी तयार होतात. विशेष म्हणजे यामुळे एखाद्याचे प्राण वाचू शकतात. आम्ही विविध कार्यक्रमांद्वारे रक्तदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी जनजागृती करत आहोत.
सुनीता बनकर, समुपदेशक, शासकीय रक्तपेढी, घाटी

इस्लाम धर्मामध्ये एखाद्या माणसाचा जीव वाचवण्यास मदत करणे म्हणजे संपूर्ण मानवजातीस मदत करण्यासारखे आहे. रक्तदानाचे महत्त्व लक्षात घेऊन मुस्लिम समुदायाने स्वेच्छा रक्तदानावर भर द्यावा. हीसुद्धा एकप्रकारे ईश्वरसेवाच आहे. -मौलाना हाफिज इलियास फलाही