आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक मत जास्तचा प्रयत्न राठोडांच्या अंगलट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महापौरपदाच्या शिवसेना उमेदवारापेक्षा एक मत जास्त मिळवून दाखवतो, असे म्हणत उपमहापौरपदाचे उमेदवार प्रमोद राठोड तीन दिवसांपासून कामाला लागले होते. याची भणक सेनेबरोबरच भाजपलाही लागली. भाजपमधील निष्ठावंत कामाला लागले. दोन्हीही पक्ष मिळून सर्वांगीण प्रयत्न झाले अन् प्रत्यक्षात राठोड यांना महापौरपदाच्या सेना उमेदवारापेक्षा एक मत कमीच मिळाले. पालिकेत शिवसेनाच मोठा पक्ष असल्याचे शिवसेनेने या निमित्ताने दाखवून दिले.

महापौरपदाचे उमेदवार त्र्यंबक तुपे यांना ७१ मते मिळाली. एमआयएमच्या उमेदवारापेक्षा ४५ मते अधिक होती. उपमहापौरपदाच्या निवडणुकीत राठोड यांना ७० मते मिळाली. युती असतानाही असे का घडले, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता महापौरपदाच्या सेना उमेदवारापेक्षा एक मत जास्त मिळवण्यासाठी राठोड यांनी केलेले प्रयत्न त्यांच्या अंगलट आल्याचे स्पष्ट झाले.

सोमवारी सायंकाळी युतीचा फॉर्म्युला निश्चित झाला. या पाच वर्षांतील पहिला महापौर हा सेनेचाच असणार हेही नक्की झाले. शिवसेनेने उपमहापौरपदासाठी उमेदवारच दिला नसल्याने राठोड उपमहापौर होणार हे पूर्वीच स्पष्ट झाले होते. मात्र २६ एप्रिलपासून राठोड यांनी शिवसेनेपेक्षा एक मत जास्त मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. स्पष्ट बहुमत असल्याने राठोड यांना आपणहून जास्तीचे मत मिळवण्याची काहीही गरज नव्हती, परंतु त्यांच्याकडून असे प्रयत्न सुरू झाल्याचे भाजपच्या नगरसेवकांबरोबर शिवसेनेलाही समजले अन् सर्वांनी मिळून राठोड यांचे एक मत कसे कमी होईल, यासाठी प्रयत्न केले. त्यानुसार बुधवारी झालेल्या निवडणुकीत राठोड यांना महापौरपदाचे उमेदवार तुपे यांच्यापेक्षा एक मत कमी पडले. दरम्यान, राठोड यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, महापौरपदाच्या उमेदवारापेक्षा मला एक मत शिल्लक मिळावे, असे मला मुळीच वाटले नाही. असे कोणी सांगत असेल तर चुकीचे आहे. राहिला प्रश्न एक मत कमी का पडले तर उपमहापौरपदासाठी मतदान न करणारा तो सदस्य अपक्ष आहे आणि लोकशाहीत कोणाला मतदान करायचे की नाही, हे ठरवण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, असा युक्तिवाद त्यांनी केला.

मोठा भाऊ होण्याचा प्रयत्न...
महापौरपद शिवसेनेकडे गेले असले तरी पालिकेत आम्हीच मोठा भाऊ आहोत, हे दाखवले जाऊ शकते, असे राठोड यांनी वरिष्ठांना सांगितल्याचे समजते. पक्षाचा पाठिंबा मिळेल हा त्यांचा समज चुकीचा ठरला. दुसऱ्या पक्षातून आल्यानंतर लगेचच उपमहापौरची संधी देण्यात आल्याने पक्षातील नाराज निष्ठावंतांनी शिवसेनेच्या मदतीने हा गेम केल्याचे समजते.