आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोकाट कुत्र्यांच्या झुंडीच्या पाठलागाने उडते गाळण !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - उघड्यावर होणारी मांसविक्री अन् कचराकुंड्यांतील शिळ्या अन्नावर पोसणार्‍या मोकाट कुत्र्यांच्या शहर आणि परिसरात टोळ्या तयार झाल्या आहेत. गुंडांच्या टोळ्यांना लाजवतील अशा या टोळ्या असून रस्त्यावरून ये-जा करणार्‍यांचा हे कुत्रे थेट पाठलाग करतात. यामुळे लहान मुले, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि नोकरदारांना दररोज जीव मुठीत घेऊन बाहेर पडावे लागत आहे. ‘आमच्या भागातील कुत्रे पकडा’ अशा 20 ते 25 तक्रारी पालिका प्रशासनाला रोज प्राप्त होतात. प्रत्यक्ष कारवाई होत नसल्यामुळे कुत्र्यांचा उच्छाद वाढतच चालला आहे.

मोकाट कुत्र्यांची संख्या 40 हजारांपेक्षा अधिक असून ते टोळ्यांमध्ये विभागले गेले आहेत. चौकाचौकात, गल्ली-बोळात, मटण शॉपजवळ कुत्र्यांच्या झुंडी उभ्या असतात. सायंकाळी आणि रात्रीच्या वेळी कुत्र्याच्या टोळ्या रस्त्यावरच ठाण मांडतात. यामुळे पादचारी, दुचाकी वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत आहे. या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी मनपाने नगरच्या संकल्प प्राणी सेवा संस्थेशी करार केलेला होता. तो संपुष्टात आल्याने चार महिन्यांपासून पालिकेकडूनच निर्बीजीकरण करण्यात येते.

या भागात कुत्र्यांच्या टोळ्या
औरंगपुरा, सिल्लेखाना, सर्मथनगर, किराडपुरा, रहेमानिया कॉलनी, झोपडपट्टी भाग, मुकुंदवाडी, रेल्वेस्टेशन परिसर, सिल्क मिल कॉलनी, कामगार चौक, विर्शांतीनगर, उल्कानगरी, गारखेडा परिसर, पुंडलिकनगर, सिटी चौक. बहुतांश गल्ल्यांमध्ये 5 ते 10 कुत्र्यांची टोळी असते.


कुत्र्यांची टोळी धावत येते
मी औरंगपुर्‍यात राहतो. सध्या राज्यसेवा परीक्षेची तयारी करत आहे. अभ्यास करण्यासाठी बाहेर वेळ होतो. रात्री घरी पायी जात असताना कुत्र्यांची टोळी धावतच येते. सावधपणे रस्ता ओलांडावा लागतो. मनपा प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. भास्कर पठाडे, औरंगपुरा


समर्थनगरमध्ये मोकाट कुत्र्यांचा उपद्रव खूपच वाढला आहे. लहान मुलांच्या मागे ही कुत्री धावतात. यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याचा मनपा प्रशासनाने वेळेत बंदोबस्त करावा. सतीश टिळक, सर्मथनगर
शहरात गल्लोगल्ली मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. रस्त्याने जाताना-येताना कुत्रे धावतच येतात. यामुळे अंगाचा थरकाप उडतो. छाती धडधडते. या टोळक्याच्या तावडीत लहान मूल सापडल्यास त्याचे काही खरे नाही. याकडे लक्ष देण्याची गरज आहे. सखाराम निर्वळ, सातारा परिसर
निर्बीजीकरण केलेल्या कुत्र्यांची संख्या : 2013- 3092,2012 - 1852. 2011 -3275.