आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गजानननगरात कुत्र्यांनी तोडले १४ जणांचे लचके, मनपाचे पथक आले, बांधलेले कुत्रे घेऊन गेले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पुंडलिकनगर वॉर्डातील गजानननगरमध्ये शुक्रवारी (१० जून) मोकाट कुत्र्यांनी चार बालकांसह चौदा जणांचे लचके तोडले. गल्ली क्रमांक तीन, सहा आणि नऊमध्ये सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत तब्बल पाच तास कुत्र्यांचा धुमाकूळ सुरू होता. लोकांनीच धाडस करत तीन कुत्री पकडून दिली. ती घेऊन महापालिकेचे पथक निघून गेले. या प्रकारामुळे या भागात दहशतीचे वातावरण होते.
गजानननगर मध्यमवर्गीयांची वसाहत असून येथील निमुळत्या गल्ल्यांमध्ये दाटीवाटीने घरे बांधली आहेत. या गल्ल्यांमध्ये कायम मोकाट कुत्र्यांचा वावर असतो. यापूर्वी काही जणांच्या अंगावर कुत्री धावून जाण्याचे प्रकार घडले. मात्र, शुक्रवारी कळस झाला. सकाळी नऊ वाजेपासूनच दहा-पंधरा कुत्री झुंडीने गल्ल्यांमध्ये फिरू लागली. लोकांनी त्यांना हाकलण्याचा प्रयत्न केला. पण तो अयशस्वी झाला. या झुंडीतील कुत्र्यांनी गल्लीत खेळणाऱ्या शंतनू पवार, अरिहंत त्रिभुवन यांच्यासह एका तीन वर्षांच्या आणि एक पाच वर्षाच्या मुलीला चावा घेतला. याशिवाय मटकी विक्रेत्याला महिला आणि हातगाडीचालकाच्या पायाचा लचका घेतला. हा धुमाकूळ पाहून नागरिकांनी कुत्र्यांवर लाठ्या-काठ्यांचा वर्षाव केला. दोरखंडाने चार कुत्री पकडली. सर्वाधिक लचके तोडणाऱ्या कुत्र्याला ठार केले. तर उर्वरितांना बांधून ठेवले. दरम्यान, या प्रकाराची माहिती मिळताच नगरसेविका मिना गायके, आत्माराम पवार यांनी मनपाच्या श्वानपथकाला बोलावले. मात्र, लोकांनी पकडलेली कुत्री घेऊन पथक निघून गेल्याने लोक संतापले. सर्व मोकाट कुत्री पकडा असे त्यांचे म्हणणे होते. कर्मचाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले, असे नागरिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, मांसविक्रीच्या अवैध दुकानांमुळे मोकाट कुत्री वाढली आहेत. तक्रारी केल्यावरच पथक येते. पुंडलिकनगरच्या आरोग्य केंद्रात औषधी नसल्याने लोकांना घाटीत जाण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही, असे नगरसेविका मीना गायके यांनी सांगितले.

कुत्र्यांच्या हल्ल्यातील जखमी : देवयानी जयवंत सूर्यवंशी, शंतनू रवींद्र पवार, आर्या सोमनाथ त्रिभुवन, विकास मगन चोंडिये, अंजली सहाणे,अरिहंत त्रिभुवन, गणेश विठोरे, गणपत जगदाळे , अनिता अदमाने जखमी झाले. उर्वरितांची नावे कळू शकली नाहीत.

चार कुत्र्यांनी झडप घातली
गल्लीक्रमांक १० मधील माझ्या घराजवळ दुपारी साडेबाराच्या सुमारास अरिहंत सोमनाथ त्रिभुवन (वय १०) खेळत होता. तेवढ्यात लगतच्या नाल्यातून चार कुत्र्यांनी त्याच्यावर झडप मारली. त्याला खाली पाडून डोक्याला, पायाला चावे घेऊ लागले. त्याच्या अंगातील जीन्सची पँट खेचू लागले. त्याने आरडाओरड केल्यावर दीपक शेजूळ, आबासाहेब मोकासे आणि काही जण धावत आले. त्यांनी कुत्र्यांवर दगडांचा वर्षाव केला. तेव्हा ती पसार झाली. जाताना त्यांनी मटकी विकणाऱ्या एका महिलेच्या पायाला चावा घेतला. अरिहंतच्या पोटाला, डोक्याला नऊ चावे आहेत. मी साबण लावून जखम स्वच्छ केली आणि त्याला घाटीत घेऊन गेले. - वत्सलाराऊत, नागरिक,गल्ली नं. १०

तोंडून शब्दही फुटत नव्हता
गल्लीतील लहान मुले हनुमान मंदिराजवळ खेळत होती. खेळता खेळता नऊ वर्षांचा शंतनू पवार मुख्य रस्त्यावरून धावत गल्लीमध्ये आला. त्याच्यापाठोपाठ आलेल्या कुत्र्याने झडप घालत त्याच्या डाव्या हाताचा लचका घेतला. शंतनूच्या तोंडातून शब्दही फुटत नव्हता. हा प्रकार पाहून पंधरा-वीस जणांनी काठ्यांनी कुत्र्यावर हल्ला करताच त्याने शंतनूचा हात सोडला. त्याला पुंडलिकनगरच्या आरोग्य केंद्रात नेले. परंतु तेथे रेबीजचे इंजेक्शन नसल्यामुळे घाटीत नेले. या कुत्र्याने गल्ली क्र. सातमधील तीनवर्षीय मुलीच्या पाठीला चावले. शकुंतला पवार, नागरिकगल्ली नं.
बातम्या आणखी आहेत...