आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भटक्या श्वानांच्या नसबंदीसाठी ‘रोटरी’चा निधी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरातील कुत्र्यांच्या नसबंदी शस्त्रक्रियेसाठी रोटरी क्लबने कायमस्वरूपी निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद मेट्रो आणि महानगरपालिका औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (२३ ऑक्टोबर) मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जातिवंत (प्युअर ब्रीड) श्वानांचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. तेथे श्वानांचे खाद्य तसेच त्यांच्या वापरासाठीच्या विविध वस्तूंचे स्टॉलही लावले जाणार आहेत. या प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळणारा सर्व निधी नसबंदीसाठी दिला जाणार आहे.
या प्रदर्शनामध्ये विविध जातींच्या दीडशे श्वानांची हजेरी असेल. सकाळी साडेसात ते नऊपर्यंत श्वानमालक श्वान घेऊन येतील. साडेनऊपासून श्वान परीक्षण सुरू होईल. दिवसभर हे प्रदर्शन चालेल. याच दिवशी महाराष्ट्र पोलिसांच्या श्वानपथकालाही प्रदर्शनासाठी आमंत्रित केले असून त्यांनी त्यास संमती दिली आहे. या प्रदर्शनात श्वानांच्या वस्तू विविध औषधींचे खाद्याचे स्टॉल उभारले जाणार आहेत. भाग घेणाऱ्या सर्व श्वानांसाठी फिडेल कंपनी खाद्याच्या बॅग्ज भेट म्हणून देणार आहे. तसेच पेडिग्री, द्रूल्स , वीरबॅक, सावावेट, पेट केअर, वेंकी, इंट्स, मेरील, इंडियन इम्युनॉलॉजिकल्स, कास्टर अँड पुलोक या कंपन्यासुद्धा सहभाग नोंदवत आहेत. मुंबईची केनेल ही श्वानांच्या वस्तूंची कंपनी ४० श्वानांसाठी गिफ्ट द्यायचे ठरवून येत आहे. ऑक्टोबर महिना असल्यामुळे श्वान पालकांना ऊन लागू नये यासाठी तंबू उभारला जाणार आहे.
डॉग शोमध्ये सहभागासाठी प्रवेशिका डॉ. भादेकर, डॉ. आशिष महाजन, डॉ. नीलेश जाधव, डॉ. नीती सिंग तसेच पेट पॅशन, पेट झोन, बी. आर. डिस्ट्रिब्युटर्स, कामधेनू, पेट वर्ल्ड या दालनांमधून उपलब्ध आहेत. अर्जाबरोबर रेबीज प्रतिबंधक लस टोचल्याचे प्रमाणपत्र जोडावे लागणार आहे.

भटक्या श्वानांच्या शस्त्रक्रियांचा प्रकल्प
या प्रदर्शनाच्या माध्यमातून उपलब्ध होणारा निधी आणि क्लब सदस्यांच्या वर्गणीतून पाच लाख रुपये उभे करून दिले जाणार आहेत. रोटरी इंटरनॅशनलच्या ग्लोबल ग्रँटच्या माध्यमातून ३० हजार डॉलर्स म्हणजे जवळपास २१ लाख रुपयांच्या कायमस्वरूपी ठेवीतून शहरातील भटक्या श्वानांच्या नसबंदीचा कायमस्वरूपी प्रकल्प साकारला जाणार आहे. याअंतर्गत महापालिकेच्या सहकार्याने दरवर्षी जवळपास तीन हजार श्वानांची नसबंदी होऊ शकेल. प्रतिश्वान सहाशे रुपये असा खर्च रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद मेट्रो उचलणार आहे.

बातम्या आणखी आहेत...