आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यावर आता "नागपुरी' अन्याय ! "मुख्यमंत्री हाय हाय'च्या घोषणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( आयआयएमसाठी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर साखळी उपोषणास बसलेले उद्योजक आणि विविध संघटनांचे पदाधिकारी. छाया : रवी खंडाळकर)

औरंगाबाद - "मुख्यमंत्रीहाय हाय, आयआयएम औरंगाबादला झालेच पाहिजे' अशा घोषणांनी रविवारी विभागीय आयुक्त कार्यालय परिसर दणाणून गेला. मुख्यमंत्र्यांचा निषेध करणारे विरोधी पक्षाचे कार्यकर्ते नव्हते, तर ते होते शहरातील उद्योजक आणि व्यावसायिक. आयआयएम अर्थात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट शहरातच झाले पाहिजे या आग्रही मागणीसाठी ते रविवारी रस्त्यावर उतरले. ३० संघटनांच्या प्रतिनिधींनी साखळी उपोषणात सहभागी होऊन आयआयएम नागपूरला नेण्याचा प्रयत्न करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध केला. एवढे दिवस राज्याच्या सत्तेत असलेले पश्चिम महाराष्ट्रातील नेते मराठवाड्यावर अन्याय करीत होते. आता नागपूरच्या माध्यमातून मराठवाड्यावर अन्याय होत आहे, असा आरोप उद्योजकांनी केला आहे. आयआयएमची मागणी मान्य झाल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सीएमआयएचे अध्यक्ष मुनीश शर्मा यांनी या वेळी दिला.
आयआयएम औरंगाबादलाच व्हावे यासाठी उद्योजकांसह जवळपास ३० संघटनांच्या प्रतिनिधींनी रविवारी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले. दोन दिवस चालणाऱ्या या आंदोलनाची राज्यातील फडणवीस सरकार तसेच केंद्रातील मोदी सरकारने दखल घेतली नाही तर आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा उद्योजक आणि संघटनांच्या प्रतिनिधींनी दिला आहे.
सगळे काही नागपूरला कसे नेता?
केंद्रीय अर्थसंकल्पात नागपूरला एम्स स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली. आता आयआयएमही नागपूरला नेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे सगळ्याच संस्था नागपूरला कशासाठी नेणार, असा सूर उद्योजकांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री नागपूरचे असल्यामुळे तेच आयआयएम नागपूरला नेण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा थेट आरोपही उद्योजकांनी केला आहे. यापूर्वी विविध विकास योजनांचा निधी पश्चिम महाराष्ट्रात जात असल्यामुळे मराठवाड्यावर अन्याय होत होता. मात्र आता नागपूरच्या माध्यमातून तो होत आहे, अशा प्रतिक्रिया उद्योजकांनी व्यक्त केल्या.
या संघटनांचा सहभाग
याआंदोलनात औरंगाबाद बिल्डर्स अँड डेव्हलपर्स असोसिएशन, औरंगाबाद इंडस्ट्रियल सप्लायर्स असोसिएशन, जिल्हा व्यापारी महासंघ, औरंगाबाद मॅनेजमेंट असोसिएशन, बजाज व्हेंडर्स असोसिएशन, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मटेरियल मॅनेजमेंट, मराठवाडा स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर (मसिआ), मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड कॉमर्स, मराठवाडा जनता विकास परिषद, जिल्हा वकील संघ, वाळूज इंडस्ट्रीज असोसिएशन यासह अनेक संघटना सहभागी झाल्या होत्या.
उपोषणाला दिग्गजांचा पाठिंबा
उपोषणस्थळीखासदार चंद्रकांत खैरे, आमदार सतीश चव्हाण, माजी आमदार कल्याण काळे, डॉ. जितेंद्र देहाडे, अॅड. प्रदीप देशमुख, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. अण्णासाहेब मुळे, "आयसा'चे अध्यक्ष नितीन सोमाणी आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मटेरियल मॅनेजमेंटचे अध्यक्ष जितेश गुप्ता यांनी भेट देऊन आंदोलनाला आमचाही पाठिंबा असल्याचे सांगून सहभाग नोंदवला.

-डीएमआयसी होत असल्यामुळे आयआयएम होणे गरजेचे आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्याच्या विकासाविरोधी भूमिका घेऊ नये. भारतमोतिंगे, अध्यक्ष,मसिआ
-"आयआयएम'साठी जर मराठवाड्यावर आंदोलन करायची वेळ येत असेल तर महाराष्ट्रात राहायचे कशासाठी? अजयशहा, अध्यक्ष,जिल्हा व्यापारी महासंघ
-"आयआयएम'साठी औरंगाबाद योग्य ठिकाण आहे. त्यासाठी केंद्रीय स्तरावर पत्रव्यवहारही केला आहे. आता लोकसभेत लक्षवेधी मांडू. चंद्रकांतखैरे, खासदारऔरंगाबाद
-नागपूरला आयआयटी आणि एम्सही मिळाले आहे. यापूर्वी पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यावर अन्याय करत होता. आता ती भूमिका नागपूरने पार पाडू नये. मुनीशशर्मा, अध्यक्ष,सीएमआयए
-मराठवाड्याच्या शैक्षणिक प्रगतीसाठी राष्ट्रीय दर्जाच्या संस्था येणे आवश्यक आहे. डीएमआयसीलादेखील हे पूरक ठरेल. एम.पी.शर्मा,उपाध्यक्ष,व्हेरॉक
-आयआयएम नागपूरला व्हावे अशी सरकारची मानसिकता आहे. मात्र ते मराठवाड्यालाच मिळायला हवे. त्यामुळे याविरोधात तीव्र लढा उभारण्याची गरज आहे. सतीशचव्हाण, आमदार,राष्ट्रवादी काँग्रेस