आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघर्ष कथा: दोन्ही किडन्या निकामी झाल्याने मुलगा बिछान्यावर, आईचा जीव टांगणीला!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शेख जाहेदा बेगम(वय 45 वर्षे) या महिलेच्या वाट्याला दु:ख आणि संघर्ष आला आहे. पतीचे छत्र हरपल्यावर तीन मुले आणि एका मुलीसह संसाराचा गाडा ओढताना तिच्याच आयुष्याची धूळधाण होत आहे. पंधरावर्षीय मुलगा मजहरच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या असून त्यावरच उपचार करण्यात अधिक खर्च होत असल्याने तिच्या मुलांनी शिक्षण अर्धवट सोडले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्रियदर्शिनी मुलींच्या वसतिगृहातील खानावळ चालवणार्‍या महिलेची ही संघर्षकथा..

विद्यापीठात विद्यार्थिनींना दोन वेळचा घास भरवणार्‍या जाहेदा बेगम यांच्या वाट्याला हालअपेष्टा आणि उपेक्षा आल्या आहेत. पती महंमद युसूफ यांचे 2 जानेवारी 2010 रोजी अपघाती निधन झाले. त्यांच्यानंतर मोना, परवेज, आवेस आणि मजहर अशा चार अपत्यांना घेऊन जाहेदा खानावळीच्या पैशांतून चरितार्थ चालवत आहेत. धाकटा मुलगा मजहरच्या (15) दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत. त्याच्यामुळे घरातील सर्वांना आर्थिक विवंचनेचा सामना करावा लागत आहे. मोठी मुलगी मोनाचे शिक्षण बीसीएस्सीपर्यंत झाले असून आता तिला एमएस्सी (संगणकशास्त्र) करायचे आहे. मात्र तिच्यावर शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ आली आहे. नववी उत्तीर्ण मजहरच्या दोन्ही किडन्यांवर सर्मथनगर येथील जानकी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

आठवड्याला सात हजार रूपये खर्च
मजहरवर आठवड्याला डायलिसिस ट्रीटमेंट सुरू आहे. त्यासाठी सात हजार तीनशे रुपयांचा खर्च येतो. विद्यापीठाची खानावळ तोट्यात असली तरी त्यांना एकत्रित रक्कम प्राप्त होत असल्यामुळे मेसचे काम करावेच लागत आहे. परवेज ज्ञानेश्वरी विद्यालयातून नववीत प्रथम र्शेणीत उत्तीर्ण झाला आहे. मोठी बहीण मोना हिने बीसीएसचे शिक्षण घेतले असून आता कॉम्प्युटर सायन्समध्ये एमएस्सी करायचे आहे. मात्र भावाच्या उपचारांसाठीच पैसा नाही तर उच्च शिक्षण कसे घ्यायचे, असा यक्षप्रश्न तिच्यासमोर आहे. तरीही ती एका शाळेमध्ये लिपिक म्हणून पार्टटाइम काम करत आहे. त्याशिवाय परवेज आईला खानावळीत मदत करत असतो, तर आवेस हा टाटा इंडिकॉममध्ये वसुलीचे काम करून आईचा आर्थिक भार उचलण्याचा प्रयत्न करतो आहे.

माझी काय चूक झाली..
खेळण्या-बागडण्याच्या वयातच मला गंभीर आजार झाला आहे. शिक्षणाची अतीव इच्छा असतानाही मी अंथरुणावर खिळून पडलो आहे. त्यामुळे मी आईला नेहमी विचारत असतो की, आपले काही चुकले आहे का.? म्हणून देवाने मला हा आजार दिला आहे. घरची परिस्थितीही अत्यंत बिकट आहे. आई माझ्यासाठी किती संघर्ष करत आहे, याची मला जाणीव आहे, अशी व्यथा पीडित शेख मजहरने व्यक्त केली.

खानावळ तोट्यात
खानावळ आर्थिकदृष्ट्या परवडणारी नाही, तरीही वसतिगृहातील मुलींना घरच्यासारखे सांभाळते. त्यांना कमी पैशात जेवू घालते. प्रसंगी मी दोन वेळा कर्जही घेतले आहे. मुलाला कायमस्वरूपी बरे करण्यासाठी आर्थिक मदतीची किंवा किडनीदात्याची नितांत गरज आहे. कुणीतरी पुढे यावे, अशी विनंती शेख जाहेदा बेगम यांनी केली आहे.