औरंगाबाद- आमची बेकारी दूर करा, नोकर भरती बंदचा आदेश काढू नका, अशा घोषणा देत बेरोजगार तरुणांनी बुधवारी आंदोलन केले. मागण्यांचे निवेदन विभागीय आयुक्तांना महाराष्ट्र विद्यार्थी कृती समितीच्या वतीने देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, सरकार बदलल्यानंतर तरुणांना रोजगाराच्या संधी मिळतील, अशी आशा होती; परंतु तरुणांनाच समजून घेणारे मागच्या सरकारप्रमाणेच हे सरकार आहे, असा आरोपही तरुणांनी केला आहे. सातव्या वेतन आयोगाला स्थगिती द्यावी, असेही समितीने म्हटले आहे. निवेदनावर महाराष्ट्र राज्य विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष राज आव्हाड्, आशिष फोकाटे, अभिजित भोसले, विजय शेळके, अंकुश चोरे, नागनाथ पवार, डॉ.उमाकांत मुंडे, कुंडलिक खेत्री, बालाजी मुंडे, रमेश जोशी यांच्या सह्या आहेत.
अशा आहेत मागण्या
- नोकर भरती बंदीसंदर्भात अध्यादेश काढू नये
- अनुशेष लवकरात लवकर भरावा.
- सातव्या वेतन आयोगाला स्थगिती द्यावी.
- सरकारी भरती नियमितपणे करण्यात यावी.