आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुस्तकांवरून विद्यार्थ्यांचा धुडगूस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - व्यवस्थापनाने पुस्तक खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी धुडगूस घातला. प्राचार्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील खुर्च्यांची पळवापळव केली आणि खिडक्यांची तावदाने फोडत धुडगूस घातला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून प्राचार्यांनी पोलिसांना पाचारण केले. "प्राचार्य हाय हाय... नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी' अशी नारेबाजी करण्यात आली. हा प्रकार गुरुवारी दुपारी दीड ते दोन तास सुरू होता.
महाविद्यालयाने विद्यार्थी आणि प्राध्यापकांना अंधारात ठेवत आवश्यक पुस्तकांऐवजी केवळ संदर्भ पुस्तकांची खरेदी केली, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला. या कारणावरून व्यवस्थापन आणि विद्यार्थ्यांमध्ये चांगलीच जुंपली. दीड तासाच्या गोंधळानंतर प्राचार्यांनी आश्वासन दिल्याने तणावाची परिस्थिती निवळली. शासकीय कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात ऑगस्ट महिन्यात पदवी आणि पदव्युत्तर तसेच कनिष्ठ महाविद्यालयासाठी पुस्तक खरेदी करण्यात आली. पावणेचार लाख रुपयांत केवळ २७२ पुस्तकेच खरेदी करण्यात आली, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला.

शैक्षणिक वर्ष संपत आले, तरी शैक्षणिक साहित्य मिळाले नाही. विद्यार्थ्यांनी वारंवार मागणी केली, पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. सर्वच पुस्तके खरेदी करता येत नाहीत. त्यामुळे ग्रंथालयाच्या पुस्तकांचा वापर केला जातो. ठरलेल्या पब्लिकेशनचीच पुस्तके खरेदी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी सुचवलेल्या पुस्तकांऐवजी निम्मीदेखील पुस्तके खरेदी केली नाहीत. एका विषयाचेच आठ ते दहा सेट घेण्यात आले आहेत. तसेच हिंदी आणि इंग्रजीतील केवळ संदर्भ पुस्तकेच घेण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांचा राग अनावर झाला. विद्यार्थी प्रतिनिधी प्राचार्यांकडे गेले. मात्र, प्राचार्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे विद्यार्थी संतापले आणि प्राचार्यांच्या विरोधात नारेबाजी सुरू झाली. खुर्च्यांची पळवापळव आणि खिडक्यांची तावदाने फोडण्यात आली. विद्यार्थ्यांचा रोष लक्षात घेत प्राचार्यांनी बेगमपुरा पोलिसांना कळवले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीपाद परोपकारी ताफ्यासह महाविद्यालयात पोहोचले. त्यांनी विद्यार्थी आणि प्राचार्यांशी चर्चा करून प्रकरण मिटवण्याचा सल्ला दिला. पुस्तक खरेदीची चौकशी केली जाईल, असे आश्वासन प्राचार्यांनी दिल्यानंतर गोंधळ निवळला.
खरेदी केलेली पुस्तके
डॉ. शिव गजराणी यांचे "आधुनिक भारत का इतिहास विश्वकोश' तीन प्रती, रश्मी शर्मा यांचे "विश्व का इतिहास'च्या ५ प्रती, आर. बी. पटेल यांचे "अर्थशास्त्र के सिद्धांत' एक प्रत, डॉ. घनश्याम स्वर्णकार यांचे "समाजशास्त्र शब्दकोश' सहा प्रती, १९७१ भारत पाकिस्तान युद्धावरील आणि "तोफा धडाडल्या' या ग्रंथाच्या चक्क २० प्रती खरेदी केल्या आहेत.

सर्व काही विद्यार्थ्यांसाठी
-विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे सुविधा पुरवण्याचा आमचा उद्देश आहे.विद्यार्थी, प्राध्यापकांना हवी तीच पुस्तके आणण्यात आली. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार टेक्स्टबुकची मागणी पूर्ण करण्यात येईल. आज झालेला हा प्रकार माझ्याविरुद्ध षड्यंत्र आहे. मी विद्यार्थिहिताचेच काम करतो आहे.
डॉ. जे. एस. लाड, प्राचार्य