आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारावीत शिकणार्‍या मद्यधुंद तरुणाचा प्रताप; एटीएम फोडण्‍याचा प्रयत्‍न

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- सिडको एन-5 परिसरात युनियन बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणार्‍या चोरट्यास पकडण्यात पोलिसांना यश आले. शनिवारी पहाटे पावणेतीनच्या सुमारास पोलिसांनी या चोरट्यास पाठलाग करून पकडले. त्याचा साथीदार मात्र फरार झाला. या एटीएमचे संरक्षण करण्यासाठी तेथे सुरक्षा रक्षकही नव्हता. अक्षयला न्यायालयाने 4 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

सिडको पोलिस ठाण्याचे पोलिस हेड कॉन्स्टेबल रमेश हेकडे आणि संपत राठोड शनिवारी पहाटे सिडको एन-5 परिसरात बजरंग चौक ते चिश्तिया चौकाकडे गस्त घालत होते. त्या वेळी त्यांना एन-5 येथील युनियन बँकेच्या एटीएमसमोर एक युवक उभा असल्याचे दिसले. पोलिसांना पाहताच त्याने एटीएममधील दुसर्‍या साथीदाराला इशारा करत पळ काढला. हेकडे आणि राठोड यांनी त्या दोघांचा पाठलाग केला. राठोड यांनी हातातली लाठी फेकून मारली. त्यामुळे चोरट्यांच्या हातातील चाकू आणि मोबाइल खाली पडले. त्यानंतरही पोलिसांनी पाठलाग सुरू ठेवला त्या वेळी अक्षय चव्हाण (18, रा. सिडको, एन 6) याला पकडण्यात पोलिसांना यश आले. त्याच्याकडून एक टॉमीही पोलिसांनी जप्त केली आहे. चव्हाणने त्याच्या साथीदाराच्या मदतीने एटीएमचा पत्रा काढला होता, पण पोलिस वेळीच पोहोचल्यामुळे एटीएमची चोरी टळली.

अक्षयने याआधी केलेल्या चोर्‍यांचा तपास पोलिस निरीक्षक हेमंत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक र्शीकांत खटके, सुरेश वाघ, सुखदेव जाधव, समाधान काळे, दीपक शिंदे आदी करत आहेत. तपासासाठी पोलिसांनी अक्षयला शनिवारी दुपारी घटनास्थळी आणले होते. रात्री पळून गेला तेव्हा अक्षयने त्याच्या तोंडाला बांधलेला कपडा फेकून दिला होता. पोलिस त्यांचा शोध घेत होते. शानिवारी पोलिसांनी अक्षय चव्हाण याला न्यायालयात हजर केले. सहायक सरकारी वकील बालाजी आयनीले यांनी पोलिस कोठडीची मागणी केली. त्यावर न्यायालयाने त्याची 4 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली.

सिडको एन-8 आणि मुकुंदवाडी येथे एटीएम फोडण्याचे प्रयत्न झाल्याचे गुन्हे दाखल आहेत. शहरात एकूण पाच गुन्हे एटीएम फोडण्याच्या प्रयत्नाचे झाले होते.

अशी करणार होते चोरी
अक्षय त्याच्या साथीदारासह रात्री उशिरा लग्नाहून आला होता. त्यानंतर मद्यधुंद अवस्थेत घरातून लोखंडी पहार घेऊन ते दोघे निघाले. पहाटे अडीचच्या सुमारास युनियन बँकच्या एटीएमजवळ गेले. अक्षय लोखंडी सब्बल घेऊन आत गेला. त्याचा साथीदार बाहेर थांबला. अक्षयने एटीएमच्या खालचा पत्रा पहारीने उचकटवला. तेवढय़ात पोलिस आल्याने साथीदाराने इशारा केला. अक्षय बाहेर आला व पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण त्याला पोलिसांना पकडण्यात यश आले.अक्षय बारावीचा विद्यार्थी
सिडको एन-6 मधील रहिवासी असलेला अक्षय शहरातील एका प्रतिष्ठित महाविद्यालयात बारावीत कला शाखेचे शिक्षण घेत आहे. त्याचे वडील खासगी कंपनीत सुरक्षा रक्षक आहेत, तर आई महापालिकेच्या सेवेत आहेत.

दुसर्‍या चोराचा शोध
अक्षयच्या साथीदाराचा शोध घेण्यासाठी शनिवारी सकाळी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते, पण श्वान एन-6 मधील पालिकेच्या उद्यानापर्यंतच माग काढू शकले. पोलिसांनी आरोपीची दुचाकी (एमएच 20 सीसी 331), सब्बल, नोकिया कंपनीचा मोबाइल हँडसेट, चाकू आणि एक स्लिपर चप्पल जप्त केली आहे.

पोलिसांना बक्षीस
एटीएम फोडण्याच्या प्रयत्नातील आरोपींना पकडल्यामुळे हेकडे आणि राठोड यांना बक्षीस देण्यात येणार आहे. त्यांच्या कामगिरीचा अहवाल आला असून लवकरच दोघांनाही तो देण्यात येईल, अशी माहिती पोलिस उपायुक्त अरविंद चावरिया यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली आहे.