आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाविद्यालयांत सायकललाही पार्किंग शुल्क ही कुठली सामाजिक बांधिलकी? विद्यार्थ्यांचा सवाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महाविद्यालयांमध्ये होणाऱ्या पार्किंग शुल्क वसुलीचा विद्यार्थ्यांना त्रास होतो. त्यांच्या मनात त्याबद्दल चीड आहे. एकदा प्रवेश शुल्क भरल्यानंतर दररोज बळजबरीने होणारी पार्किंग शुल्क वसुली अन्यायकारक आणि अनैतिकही आहे, असे त्यांना वाटते. पोटाला चिमटा देऊन सायकलवर महाविद्यालयात शिकायला येणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांकडूनही दररोज पाच-पाच रुपये उकळणे ही कुठली नैतिकता आणि सामाजिक बांधिलकी? असा सवालही ते करतात. आम्ही विद्यार्थी आहोत, ग्राहक नव्हे, याचे भान ठेवून महाविद्यालयांनी पार्किंग शुल्क वसुली बंद करावी, अशी त्यांची मागणी आहे. 
 
पार्किंग सुविधा मोफतच हवी 
महाविद्यालयांत खूप मोठ्या प्रमाणात शैक्षणिक शुल्क घेतले जाते. आम्ही विद्यार्थी आहोत, शिकायला येतो. त्यामुळे महाविद्यालयांत पार्किंगची सुविधा मोफतच असायला हवी. 
- भाग्यश्री देशमुख, विद्यार्थिनी 
 
बळजबरीचा त्रास 
आम्ही शुल्काबरोबरच विकास शुल्कही भरतो. तरीही कॉलेजमध्ये विनापावती बेकायदेशीरपणे पार्किंग शुल्क उकळले जात आहे. बळजबरीने होत असलेल्या पार्किंग शुल्क वसुलीचा खूपच त्रास होतो. 
- राहुल गायकवाड, विद्यार्थी 
 
गरिबाला का लुटता? 
सायकलसाठीचे पार्किंग शुल्क बंद करायलाच पाहिजे. कारण गरीब विद्यार्थीच सायकल वापरतात. त्यांच्याकडे पैसेही नसतात. कॉलेजमध्ये आल्यावर वेगळे पैसे कशासाठी? 
- सिद्धांत मोगली, विद्यार्थी 
 
दाद मागायची कुणाकडे? 
महाविद्यालय शुल्क,ओळखपत्र शुल्क, वैद्यकीय शुल्क, आयटी शुल्क,युवक महोत्सव अशा विविध नावांनी महाविद्यालय भरपूर शुल्क घेते. ते देऊनही पार्किंगचे शुल्क उकळणे हा अन्याय आहे.
- कोमल बन्सवाल, विद्यार्थिनी 
 
शुल्क अनैतिकच 
महाविद्यालयात प्रवेशशुल्क भरले म्हणजेच त्यात पार्किंगसह अन्य सुविधाही आल्याच. त्यामुळे नंतर पार्किंग शुल्क उकळणे हा अन्याय आहे. सायकलवर येणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांकडून पार्किंग शुल्काच्या नावाखाली पैसे घेणे ही कुठली सामाजिक बांधिलकी? 
- संतोष जाधव, विद्यार्थी 
बातम्या आणखी आहेत...