आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Student Complaint Of University Hostel To Mla Chavan

आमदार साहेब, मी चार महिन्यांपासून एकवेळ जेवत आहे.!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- ‘आमदार साहेब, माझ्याकडे दोनवेळ जेवणाच्या मेससाठी पैसे नाहीत. त्यामुळे मी मागील चार महिन्यांपासून एकवेळच जेवण करते व रात्री उपाशी झोपते.!’ हे वाक्य आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रियदर्शिनी मुलींच्या वसतिगृहातील गीता उगले या विद्यार्थिनीचे. पदवीधर आमदार सतीश चव्हाण शनिवारी (19 जानेवारी) दुष्काळी परिस्थितीतील समस्यांच्या सोडवणुकीसाठी वसतिगृहात आले, त्या वेळी तिने ही कैफियत मांडली.

बीसीयूडीचे माजी संचालक आणि विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळांवर कार्यरत डॉ. भागवत कटारे, व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या डॉ. प्रतिभा पाटील, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. वाल्मीक सरवदे, प्रा. डॉ. स्मिता अवचार, रासेयोचे समन्वयक डॉ. राजेश करपे, पूर्वार्शमीचे विद्यार्थी नेते उल्हास उढाण, नगरसेवक अभिजित देशमुख आणि विद्यार्थी संसद सचिव वर्षा खेडकर यांच्यासोबत आमदार चव्हाण यांनी दुपारी दोन वाजता प्रियदर्शिनी वसतिगृह गाठले. त्या वेळी ते म्हणाले, ‘दुष्काळी परिस्थितीतील काही प्रश्न मी मार्गी लावण्यासाठी आलो, त्यामुळे तुम्ही खुलेपणाने समस्या सांगा. ज्या तातडीने सोडवण्यासारख्या आहेत, त्या सोडवू. प्रशासकीय पातळीवरील समस्यांसाठी मी विद्यापीठाला सूचना करीन.’

आमदारांचे झाल्यानंतर एका विद्यार्थिनीने उन्हाळ्याच्या सुटीत वसतिगृहात राहण्याची परवानगी मागितली, तर सुटीच्या काळात ग्रंथालय सुरू ठेवण्याचीही मागणी केली. त्यानंतर चव्हाण यांनी जूनपर्यंत मुलींची राहण्याची सोय करण्याची सूचना डॉ. सरवदे यांना केली. उन्हाळ्यात मुलींनी आपल्याला लागणार्‍या पुस्तकांची यादी तयार करून डॉ. प्रतिभा पाटील यांच्याकडे द्यावी. तेवढी पुस्तके ग्रंथालयातून स्थलांतरित करून वसतिगृहातच अस्थायी ग्रंथालय सुरू करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी मुलींना दिले. त्यानंतर कैफियत मांडण्यासाठी उठलेल्या मुलीचे म्हणणे ऐकून सर्व जण अवाक् झाले. टोपेंच्या अंबड-घनसावंगी मतदारसंघातील रावळपिंप्री गावच्या या मुलीचे नाव गीता उगले. ती म्हणाली, आमदार साहेब, मी एम. ए. राज्यशास्त्राची विद्यार्थिनी असून मला आठ बहिणी आहेत. त्यापैकी मी एकटीच विद्यापीठात शिकते. घरची परिस्थिती अत्यंत बिकट असून मेसवाल्या बाईंना दोन वेळच्या जेवणाला लागणारे पैसे माझ्याकडे नाहीत. त्यामुळे मागील चार महिन्यांपासून मी एकवेळचेच जेवण करत आहे, रात्री जेवण न करता मी उपाशी झोपते.’ हे भीषण वास्तव सांगत असताना कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे, बीसीयूडी संचालक डॉ. मुरलीधर शिनगारे, कुलसचिव डॉ. धनराज माने यांच्यासह अन्य अधिकारीही हजर झाले. आमदारांनी कुलगुरूंना मुलीची कैफियत मोजक्या शब्दांत सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी ऐकून घेण्याऐवजी ‘माझ्यासहित काही अधिकार्‍यांनी 30 मुलींना दत्तक घेतल्याचे सांगितले.’ ज्या मुलींची शिक्षण घेण्याची ऐपत नाही, त्यांचा जेवण आणि राहण्याचा खर्च आम्ही उचलत असल्याचे सांगून एका बैठकीचे निमित्त करून निघून गेले. दरम्यान, चव्हाण यांनी याप्रमाणे एकवेळ जेवणार्‍या सात मुलींच्या जेवणाचा प्रश्न सोडवल्याचे जाहीर केले. त्यानंतर त्यांनी मुलांच्या वसतिगृहालाही भेट दिली.