आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांची धोकादायक वाहतूक सुरूच, मनविसेकडून गुलाबाचे फूल देऊन गांधीगिरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करत एका रिक्षात दहा ते पंधरा मुलांना बसवून वाहतूक सुरू आहे. विशेष म्हणजे पोलिसांच्या समोरून ही वाहतूक सुरू असते. पोलिस कारवाई करत नसल्यामुळे रिक्षाचालकांची हिंमत वाढली आहे. "दिव्य मराठी'ने याबाबत पोलिस आणि रिक्षाचालकांचे गांभीर्य तपासण्यासाठी सर्वेक्षण केले असता ही बाब समोर आली.
शहरातील बहुतांश शाळांत विद्यार्थी रिक्षांनी येतात. या विद्यार्थ्यांना अक्षरश: कोंबून आणले जाते. हे कमी की काय म्हणून रिक्षाचालक आपल्या बाजूला पाचवी-सहावीच्या मुलींना बसवून रिक्षा चालवतात. पालकांना रिक्षाशिवाय दुसरा पर्याय नसल्यामुळे पालक या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते. याकडे शाळेचेही लक्ष नसते. वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवून रिक्षाचालक शालेय वाहतूक करतात. पोलिसांकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात येत नसल्याने विद्यार्थ्यांचा जीव मात्र धोक्यात आला आहे.
मनविसेची गांधीगिरी : शहरातीलऔरंगपुरा भागात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी रिक्षाचालकांच्या या मुजोरीला उत्तर म्हणून गांधीगिरी केली. जे चालक ड्रायव्हर सीटवर बसवून विद्यार्थ्यांची ने-आण करतात अशा चालकांना गुलाबाचे फूल देऊन त्यांचे स्वागत केले. पालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी कार्यकर्ते जागोजागी पोस्टर घेऊन उभे होते. या वेळी जिल्हा सचिव संदीप कुलकर्णी, अमोल खडसे, अनिकेत निलावार, विजय बरसमवार, शुभम रगडे, प्रतीक गायकवाड, आशिष कुलकर्णी, शुभम गव्हाण, राहुल लाटे, चेतन पाटील, रवी बनकर, मंदार खोचे, विजय लाळे, आकाश गोंडे आदींची उपस्थिती होती.