आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दांडी मारणारे विद्यार्थी आणि महाविद्यालयांवर कारवाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शिकवणी वर्गांना अधिक वेळ देत शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना दांडी मारणार्‍या विद्यार्थ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. केंद्रीय शिक्षण मंडळाच्या नव्या नियमानुसार (सीबीएसई) विद्यार्थ्यांची वर्गात 75 टक्के हजेरी बंधनकारक असेल. दहावी ते बारावीतील वर्गात कमी उपस्थिती आढळल्यास शाळातील तुकड्यांची मान्यताही रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील 15 पेक्षा अधिक सीबीएसई शाळांना हा नियम लागू झाला आहे.

अलीकडील काळात मेडिकल व इंजिनिअरिंगच्या प्रवेशपूर्व परीक्षांची तयारी करण्यासाठी बारावीचे विद्यार्थी शाळेत भरणार्‍या वर्गांना दांडी मारून खासगी शिकवणी वर्गांना उपस्थित राहत आहेत. परिणामी महाविद्यालयांचे वर्ग कायम ओस पडलेले दिसतात. हे चित्र बदलण्यासाठी सीबीएसईने नवा फंडा अमलात आणला. याबाबत सीबीएसईच्या संकेतस्थळावरही माहिती देण्यात आली आहे. सीबीएसई संलग्नित विद्यालये, महाविद्यालयांत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबतच्या नियमांची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. ज्या शाळेत अथवा कनिष्ठ महाविद्यालयातील तुकडीत 75 टक्क्यांपेक्षा कमी विद्यार्थिसंख्या असेल त्या तुकडीची मान्यता रद्द करण्यात येईल. एखाद्या विद्यार्थ्याची वर्षभरात 75 टक्क्यांपेक्षा कमी हजेरी असल्यास त्या विद्यार्थ्याला परीक्षेला बसू दिले जाणार नाही.

नियमाच्या अंमलबजावणीसाठी केंद्रीय शिक्षण मंडळाने शाळांच्या तपासणीसाठी एक समिती नेमली आहे. ही समिती दहावी ते बारावीच्या वर्गांची तपासणी करणार आहे. यात सर्व सीबीएसईचे अधिकारी आणि शिक्षक असतील.

प्रगतीबाबत माहिती मिळेल
शाळांची वेळोवेळी तपासणी होणे आवश्यक आहे. यामुळे पालकांना विद्यार्थ्यांच्या उपस्थिती व प्रगतीबाबत माहिती मिळेल. सीबीएसईच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत वाढ तर होईलच, शिवाय ते धाकातही राहतील. खासगी शाळांच्या मनमानीलाही आळा बसेल. आशा कुरवाडे, शिक्षिका, रियान इंटरनॅशनल

सततच्या तक्रारींमुळे बोर्डाचा निर्णय
गेल्या दोन-तीन वर्षांपासून दहावी आणि बारावीच्या वर्गांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी आणि खासगी क्लासेसमध्ये जास्त दिसून येत असल्याची तक्रार बोर्डाकडे सातत्याने येत होती. त्यामुळे 75 टक्के उपस्थिती बंधनकारक असणार आहे.