खुलताबाद- तालुक्यातील देवळाणा वस्तीवर मुलांना शाळेत जाण्यासाठी रस्ता नसल्याने मोठी अडचण होत आहे. मुलांनी थेट तहसीलसमोर उपोषण सुरू केले . तर चिंचोली ते घाटनांद्रा रस्ता तळ्याचा झाला असून बोरगाव अर्ज फाटा ते गावादरम्यानचा रस्ता चिखलमय झाला आहे.
वस्तीवरून शाळेत जाण्या-येण्यासाठी रस्ता नसल्याने रस्त्याच्या मागणीसाठी देवळाणा रमाईनगर वस्तीवरील सर्वच विद्यार्थी पालकांसह तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसले असून जोपर्यंत रस्ता मिळत नाही तोपर्यंत उपोषण उठणार नसल्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.
खुलताबाद तालुक्यातील देवळाणा गावापासून दोन किलोमीटर अंतरावर रमाईनगर वस्ती असून या वस्तीवर १० ते १२ कुटुंबे राहतात. रमाईनगर वस्तीवर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी देवळाणा येथील जिल्हा परिषद शाळेत दररोज ये-जा करावी लागते.
वस्तीवरून ते देवळाणा शाळेवर जाण्यासाठी विद्यार्थ्यांना गट नं. १९ मधून जावे लागते. विद्यार्थी गट नंबर १९ मधून जात असताना संबंधित जागेचे मालक विद्यार्थ्यांची अडवणूक करत रस्ता बंद केला असल्याने शाळेतील विद्यार्थ्यांनी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे. या उपोषणात पँथर रिपब्लिकन पार्टी तालुका सचिव सुरेश भागाजी बनकर यांनी खुलताबाद तहसीलदारांना निवेदन दिले. तहसील कार्यालयासमोर पालकांसह विद्यार्थी उपोषणाला सुरुवात केली आहे. तहसीलदार अरुण जऱ्हाड यांच्यासह माजी उपसभापती दिनेश अंभोरे यांनी विद्यार्थी- पालकांची भेट घेऊन समस्या जाणून घेतल्या.