आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टाळ्या अन् जल्लोषाने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद-जिल्हा महिला- बालविकास विभागाच्या वतीने आयोजित चाचा नेहरू बाल महोत्सवाच्या मैदानी स्पर्धांना शनिवारी (3 जानेवारी) प्रारंभ झाला. कबड्डी, खो-खो, किक्रेट अशा विविध स्पर्धा मैदानावर रंगताच प्रेक्षकांनी टाळ्या आणि जल्लोषाने बालगृह आणि निरीक्षणगृहातील मुलांना प्रोत्साहन दिले.


जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी यांच्या हस्ते एमजीएमच्या क्रीडांगणावर स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी महिला-बालकल्याण विभागाचे विभागीय उपायुक्त जी. आर. शिंदे आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप देशमुख आणि जिल्हा महिला बालविकास अधिकारी संजय कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्ह्यातील 28 विविध संस्थांच्या 1 हजार विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला. कालबाह्य होणारे मैदानी खेळ खेळण्यात बालगृहातील मुले दंग झाली. लहान गटांसाठी चमचा लिंबू, संगीत खुर्ची या स्पर्धा घेण्यात आल्या. मोठ्या गटात कबड्डी, खो-खो, क्रिकेट आदी स्पर्धा घेण्यात आल्या. प्रेक्षकांनी मोठ्या आवाजात स्पर्धकांना चिअरअप केले. या महोत्सवात विद्यार्थ्यांमधील कल्पतेला वाव मिळावा म्हणून शुद्धलेखन, निबंध आणि चित्रकला स्पर्धाही संबंधित शाळांतून घेण्यात आल्या. महोत्सवाच्या शेवटच्या टप्प्यात
सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात येणार असल्याचे महिला बालविकास अधिकारी कदम यांनी सांगितले. नृत्य, नाटक, संगीत, गायन अशा विविध स्पर्धांचा यामध्ये समावेश आहे.

स्पर्धांतून व्यक्तिमत्त्व घडते : दीपक चौधरी
विविध प्रकारच्या स्पर्धांमधून व्यक्तिमत्त्व घडते. निरीक्षण गृहे आणि बालगृहातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धेच्या माध्यमातून सामाजिकता रुजवण्याचे काम व्हावे, हा या स्पर्धा आयोजनामागील उद्देश आहे. अशा स्पर्धांतूनच उत्तम नागरिक, खेळाडू आणि कलावंतांची निर्मिती होणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने अशा स्पर्धांमध्ये आवर्जून सहभाग घ्यायला हवा, असेही ते म्हणाले.