आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Students Islamic Movement Of India News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘सिमी’ बंदीवर औरंगाबादेत सुनावणी;दिल्ली हायकोर्टाच्या न्यायमूर्तींचा लवाद शहरात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया अर्थात ‘सिमी’ संघटनेवरील बंदीला मुदतवाढ द्यायची किंवा ही बंदी हटवायची यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात केंद्र सरकारच्या विशेष लवादामार्फत सुनावणी सुरू आहे. त्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयातील वरिष्ठ न्यायाधीश सुरेश कैट यांच्या नेतृत्वाखालील तीन जणांचा लवाद चार दिवसांपासून शहरात आहे. सोमवारी ही सुनावणी पूर्ण होणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. मात्र या लवादाने अटकेतील आरोपींच्या नातलगांचे आक्षेप नोंदवल्याचे गुप्तचर यंत्रणेने म्हटले आहे.

घातपाती कारवायांत हात असल्याच्या आरोपावरून केंद्रातील तत्कालीन रालोआ सरकारने 27 सप्टेंबर 2001 रोजी सिमी संघटनेवर बंदी घातली. वेळोवेळी दोन वर्षांसाठी त्यात मुदतवाढ करण्यात आली. 2012 मधील दोन वर्षांच्या मुदतवाढीनंतर 7 फेब्रुवारी 2014 रोजी केंद्रातील तत्कालीन यूपीए सरकारने सिमीवर पुन्हा पाच वर्षांसाठी बंदी वाढवली. बंदी वाढवावी की मागे घ्यावी यासाठी मोदी यांच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकार फेरविचार करत आहे. त्यासाठीच केंद्रीय गृह मंत्रालयाने नेमलेल्या लवादामार्फत सुनावणी सुरू आहे. 27 जूनपासून खंडपीठात सुरू असलेले हे कामकाज 30 रोजी आटोपणार आहे. त्याच दिवशी लवाद दिल्लीला परत जाईल. दर दोन वर्षांनी जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात अत्यंत गोपनीय पद्धतीने औरंगाबादेत सुनावणी घेतली जाते. बंदीला मुदतवाढ किंवा बंदी हटवण्याची शिफारस करण्यासाठीच हा लवाद असल्याचे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे.

साईदर्शनही आटोपले : लवादाने शनिवारी शिर्डीत जाऊन साईदर्शन घेतले. त्याचबरोबर अजिंठा, वेरूळ लेण्यांनाही भेट दिली. हॉटेल ताजमध्ये त्यांचा मुक्काम असून बेगमपुरा पोलिसांचा ताफा त्यांच्या संरक्षणासाठी तैनात करण्यात आलेला आहे.
सिमीचे मराठवाडा कनेक्शन..
2010 : पुणे र्जमन बेकरी स्फोटाचा कट मराठवाड्याच्या उदगीरमध्ये शिजला. आरोपी हिमायत बेगने नेट कॅफेत बसून हे कारस्थान रचले.
2012 : हिमायतबागेत एन्काउंटर झाले. मारला गेलेला अझहरसह त्याचे साथीदार सिमीसाठी भरती व चंदा जमवण्याचे काम करत.
2006 : वेरूळ येथे स्फोटके व शस्त्रसाठय़ासह सिमी अतिरेक्यांना अटक. यात पकडले गेलेले तिघे औरंगाबादचे होते. दोघे फरार.
2008 : मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड जबिउद्दीन अन्सारी बीडचा. वेरूळ स्फोटकाचाही तोच सूत्रधार.
1999 : औरंगाबाद मनपासमोरील आझाद मैदानावर सिमीची इख्वान परिषद झाली. सदस्यांखेरीज कोणालाही प्रवेश नव्हता.
1999 : औरंगाबाद पोलिस मुख्यालयात 6 डिसेंबरला दंगल उसळली. यात एका तरुणाचा मृत्यू. अनेक सिमी कार्यकर्ते जखमी.

- मागील 13 वर्षांपासून बंदी आहे.
- अलिगड विद्यापीठातील वृत्तपत्रविद्या विभागाचे प्रा. महंमद अहमदुल्ला सिद्दिकी यांनी 25 एप्रिल 1977 रोजी सिमीची स्थापना केली.
- विविध उपक्रम राबवत मुस्लिम विद्यार्थ्यांच्या पुनरुत्थानासाठी सिमीचे तीन दशके काम. देशभर जाळे.
- 1990 ते 2000 या दहा वर्षांत अनेक दहशतवादी व घातपाती कारवायांत कनेक्शन असल्याचा सिमीवर ठपका.
- केंद्राने 2001 मध्ये प्रिव्हेन्शन ऑफ टेररिझम अँक्टनुसार सिमीच्या पदाधिकार्‍यांना पकडले.
(फोटो - औरंगाबाद उच्च न्यायालयाचे संग्रहित छायाचित्र)