औरंगाबाद - शहरातील विद्यार्थ्यांनी मंगळवारी अनोखा इतिहास रचला. जगातील सर्वांत लहान सोलार कुकर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि वजनाने केवळ दीडशे ग्रॅम असलेल्या फोल्डेबल सोलार कुकरवर ३७ शाळांतील ५७६० विद्यार्थ्यांनी नूडल्स शिजवून त्यांचा आस्वाद घेतला. अवघ्या ३५ मिनिटांत नूडल्स शिजले. एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जेवर अन्न शिजवण्याचा विक्रम या माध्यमातून करण्यात आला आहे.
पारंपरिक ऊर्जेची बचत करण्याचा संदेश देण्यासाठी एमआयटीच्या मैदानावर भरलेल्या सूर्यकुंभ उपक्रमांतर्गत हा इतिहास रचला गेला. यापूर्वी मुंबईच्या केशवनगरी ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये ३९३९ विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन गेल्या वर्षी विक्रम नोंदवला होता. सूर्यकुंभाचे उद््घाटन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी शिक्षण आयुक्त पुरुषोत्तम भापकर, विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, पोलिस आयुक्त अमितेशकुमार, खासदार चंद्रकांत खैरे, उपमहापौर प्रमोद राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाहीर सुरेश जाधव यांनी पोवाडे सादर केले.
तिरंग्याच्या रंगांत विद्यार्थी मैदानात : एमआयटीमहाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी आठपासूनच बच्चे कंपनीचे आगमन होत होते. त्यांच्यात मोठा उत्साह आणि कार्यक्रमात सहभागी होण्याची उत्सुकता दिसून येत होती. बहुतांश विद्यार्थी शाळेच्या बसने, काही पायी, तर काहींना पालकांनी सोडले. "भारत माता की जय'च्या घोषणा देतच विद्यार्थ्यांची मैदानाकडे कूच सुरू होती. केशरी, पांढरा आणि हिरवा टी शर्ट आणि टोपी (तिरंग्याचा रंग)अशी विद्यार्थ्यांची वेशभूषा होती. आयोजकांतर्फे प्रत्येक विद्यार्थ्याला पाण्याची बाटली, १५० ग्रॅम वजनाचे फोल्डेबल सोलर कुकर देण्यात आले. त्यानंतर नूडल्सची पाकिटे, अॅल्युमिनियमचा डब्बा, गाजर वटाण्याच्या शेंगा देण्यात आल्या.
३५ मिनिटांत नूडल्स तयार
सुरुवातीला विद्यार्थ्यांना भव्य शामियान्यात बसवण्यात आले. तिथे त्यांना इस्काॅनची खिचडी खायला दिली. नंतर लगेचच मैदानावर आखलेल्या दोन बाय दोनच्या बॉक्समध्ये विद्यार्थ्यांना ड्रेसकोडप्रमाणे बसवण्यात आले. सर्वांना साहित्य पुरवण्यात आल्यावर आयोजकांच्या सूचनेनुसार सोलार कुकरची जोडणी दहा मिनिटांत केली. या वेळी आयोजकांनी ध्वनिक्षेपकावरून कुकरच्या जोडणीबद्दलची माहिती दिली. ३३० स्वयंसेवकांच्या माध्यमातून प्रत्येक रांगेतल्या विद्यार्थ्यांना सोलार कुकर जोडता आला की नाही याची खात्री केली. नंतर विद्यार्थ्यांनी टोप्या उंचावून जोडणी झाल्याची खूण दिली. त्यानंतर अॅल्युमिनियमच्या डब्यात किसलेले गाजर, वटाणे टाकून तो डब्बा एका प्लास्टिकच्या बॅगमध्ये टाकून तो सोलार कुकरवर ठेवण्यात आला. एरवी या कुकवर २० ते २५ मिनिटांत शिजणारे नूडल्स ढगाळ वातावरणामुळे शिजण्यासाठी ३५ मिनिटे लागली.
उद्योजक बनले शिक्षक : सीएमआयएच्या आणि एमआयटीच्या माध्यमातून आयोजित उपक्रमात उद्योजक एखादा शिक्षकाप्रमाणे विद्यार्थ्यांना सूचना देत होते. त्यांना समजावून सांगत होते. एम.पी.शर्मा, सुनील रायठठ्ठा, प्रशांत देशपांडे, मुकुंद कुलकर्णी, आशिष गर्दे, मुनीष शर्मा, प्रसाद कोकीळ, उमेश दाशरथी, सुनील देशपांडे, मिलिंद कंक अशी सर्व मंडळी विद्यार्थांभोवती व्यग्र होती.
काय शिजवता येईल...
याकुकरमध्ये सर्वच अन्न घटक शिजवता येणार नाहीत. पण जे पदार्थ झटपट शिजू शकतील त्यासाठीच हा कुकर वापरात येईल. उदा: सर्व प्रकारचे नूडल्स, भाज्या, दूध, अंडी, शिरा, केक, ढोकळा, सूप या सारखे पदार्थ यात तयार करता येतील, असे विवेक काबरा यांनी सांगितले.
ढोलताशाचा दणदणाट
सकाळपासूनच बच्चे कंपनीचा किलकिलाट सुरू होता. त्यात भर पडली शाहीर सुरेश जाधव यांचे पोवाडे आणि ढोलताशाच्या दणदणाटाची. ध्वनिक्षेपकावरून सूचना दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी उंचावलेल्या टोप्या बगळ्यांच्या रांगेसारख्या दिसत होत्या.
हे कुकर कुठे मिळेल
१५०ग्रॅम वजनाचे हे मल्टिपर्पज सोलार कुकर जालना येथील सिम्प्लिफाइड टेक्नॉलॉजी कंपनीने तयार केले आहे. ते ऑनलाइन अॅमेझॉन डॉटकॉमवर मिळेल. शहरात सीएमआयए कार्यालय, रेल्वेस्टेशन रोड तसेच गुलमंडीवरील तपस्या स्टेशनर्स येथे मिळेल. ऑनलाइन किंमत ७०० रुपये असून औरंगाबाद किंवा जालना शहरातून खरेदी केल्यास ते केवळ ५०० रुपयांना मिळेल.
सौर कुकर, ओव्हन घरीच तयार करण्याचे उद्या प्रशिक्षण
दीपशिखाफाउंडेशनतर्फे सौर ऊर्जेचे उपकरण घरीच कमीत कमी खर्चात कसे तयार करावे आणि त्यात खाद्यपदार्थ कसे शिजवावेत, याची माहिती दिली जाणार आहे. हळदी-कुंकवासह हा कार्यक्रम १४ जानेवारी रोजी दुपारी वाजता मीनाताई ठाकरे हॉल, झांबड इस्टेट, दर्गा रोड येथे आयोजित केला आहे. लाभ घेण्याचे आवाहन फाउंडेशनच्या अध्यक्षा मनीषा चौधरी यांनी केले आहे.