आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एमबीबीएसचा कालावधी वाढवण्‍यासाठी विद्यार्थ्यांचा मोर्चा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - एमबीबीएसच्या शिक्षणाचा कालावधी दोन वर्षांनी वाढवल्याच्या निषेधार्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. हा मोर्चा घाटी परिसरातून काढण्यात आला. जाचक निर्णय मागे घ्या अन्यथा देशव्यापी संप पुकारण्यात येईल, असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला. एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सध्या साडेपाच वर्षांचा कालावधी आहे. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने तो साडेसात वर्षांचा करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.


‘डॉक्टरांचे भविष्य वाचवा.. डॉक्टरांचे आयुष्य वाचवा..’ या घोषणेने घाटीचा परिसर दणाणून गेला होता. प्रत्येक विद्यार्थी एमसीआयच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत होता. एमसीआय विद्यार्थ्यांना नाहक कोंडीत धरण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला.


उत्स्फूर्तपणे मोर्चा : एमसीआयच्या निर्णयाच्या विरोधात घोषणाबाजीनंतर विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने अधिष्ठाता डॉ. के. एस. भोपळे यांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा करून निवेदन सादर केले. त्यानंतर शेकडो विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. विद्यार्थ्यांनी कॅन्सर हॉस्पिटलसमोर मोर्चा थांबवून जोरदार घोषणाबाजी केली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलिसांनी मोर्चा अडवला. साडेसात वर्षांमुळे विद्यार्थ्यांची कशी अवस्था होणार आहे यावर आधारित विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले.


वाढीव मुदतीला विरोध का..
सध्याच्या साडेपाच वर्षांच्या कालावधीमध्ये साडेचार वर्षे डिग्री आणि एक वर्ष इंटर्नशिपसाठी आहे. मात्र, नव्या निर्णयात साडेचार वर्षे डिग्री, दोन वर्षे इंटर्नशिप आणि एक वर्ष ग्रामीण भागात जाऊन सेवा करावी लागणार आहे. विद्यार्थ्यांनी यावर आक्षेप घेतला आहे. ग्रामीण भागात सेवा करण्यास विद्यार्थ्यांचा विरोध नाही, कालावधी पूर्वीचाच ठेवावा, अशी मागणी केली.

नवीन धोरण चुकीचे
ग्रामीण भागातील वैद्यकीय सुविधांचा अभाव व कमतरता भरून काढण्यासाठी मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांचा कोर्स साडेसात वर्षांचा केला आहे. एमसीआय भारतातील वैद्यकीय शिक्षणाचा कालावधी अमेरिकेतील शिक्षणासोबत तुलना करत आहे, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला.