सिल्लोड- शिक्षण घेण्यासाठी धडपडणाऱ्या विद्यार्थ्यांची परवड थांबण्याची चिन्हे नसून, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहे. आज शाळेतून घरी जाण्यासाठी बसथांब्यावर विद्यार्थिनी आल्या असता थांब्यावर बस थांबत नसल्याने मुली हवालदिल झाल्या. अखेर मुलींनी थेट बस समोर अाडवे होऊन बस थांबवली. एकूणच या प्रकरणामुळे ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनला असून यात प्रशासनाने लक्ष घालावे, अशी मागणी जोर धरत आहे.
भराडी येथील सरस्वती भुवनच्या विद्यार्थी यांची शाळा सुटल्यानंतर बस थांबत नसल्याने शेवटी सिल्लोड-जांभई बस थांबविण्यासाठी आडवे व्हावे लागले. मुलगी वाचवा व शिकवा या घोषणा देत शासनाने ठरवून दिलेल्या मुहूर्तावर राजकीय, सामाजिक कार्यकर्ते व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी फोटो सेशन करण्यापुरते कार्यक्रम करायचे ही नित्याची बाब झाली आहे. वास्तविक पातळीवर ग्रामीण भागात, डोंगरदऱ्यात राहणाऱ्या विद्यार्थी यांना शिक्षणाच्या सुविधा उपलबद्ध करून दिल्या जात नाहीत. जळकी घाट तालुका सिल्लोड येथील विद्यार्थी यांना घरी जाण्यासाठी सिल्लोड-जांभई शेवटची बस असल्याने आडवे होण्याशिवाय त्यांच्याजवळ पर्यायच नव्हता.
गर्दीमुळे एसटी बस भराडीत थांबेना
भराडी हे सिल्लोड- कन्नड मार्गावरील वर्दळीचे गाव असून येथे परिसरातील गावाची मुले- मुली शिक्षणासाठी येतात. परंतु शाळा सुटल्यानंतर मार्गावर ४ ते सहा दरम्यान चार बसेस असून त्यातही गर्दीमुळे बसेस थांबत नाही.
दखल घेतली नाही
विद्यार्थी यांना होणारा त्रास लक्षात घेऊन या मार्गावर बसची संख्या वाढवण्यासंदर्भात सिल्लोड आगार प्रमुखांना पत्र देण्यात आलेले आहे. परंतु अद्यापपर्यंत कारवाई झालेली नाही.
- सुभाष साळवे ,मुख्याध्यापक स.भु.प्रशाला भराडी.