आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांचे होणार संगीतमय स्वागत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- उन्हाळी सुटीनंतर सोमवारपासून (१५ जून) शाळांना सुरुवात होते आहे. याही वर्षी शहर जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये प्रवेशोत्सव आयोजित करण्यात आला असून बँडबाजा आणि मंगलवाद्यांच्या निनादात गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले जाणार आहे.
विद्यार्थ्यांना शाळेची गोडी निर्माण व्हावी, शाळाबाह्य मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी शाळेचा पहिला दिवस प्रवेशोत्सव म्हणून राज्यभरात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त वाजत-गाजत रॅली काढण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळांमध्ये आकर्षक सजावट करून आनंददायी वातावरण निर्मिती केली जाणार आहे. लाऊड स्पीकरवरून प्रवेशपात्र विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पालकांना आवाहन करणे, सरपंचांसह शाळा व्यवस्थापन समिती, वॉर्ड सदस्य, युवक मंडळे, क्षेत्रीय अधिकारी आणि शिक्षकांनी ज्येष्ठ नागरिकांसह शाळा सुरू होत असल्याचा संदेश घेऊन १४ जून रोजी पदयात्रेद्वारे प्रत्येक घराला भेटीही द्यायच्या आहेत.
शाळेत प्रवेशद्वारावर रांगोळी काढून उपलब्ध पानाफुलांनी तोरणे बांधली जाणार आहेत. शाळेच्या फलकांवर वार्ता, सुविचार, दिनमानही उमटतील.
पहिल्याच दिवशी पुस्तके
शाळेच्यापहिल्याच दिवशी नवी पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांच्या हाती पडतील. बालभारतीच्या वतीने शाळांना पुस्तकांचा पुरवठा करण्यात आला असून सर्व शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी ही पुस्तके दिली जातील, अशी माहिती जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे आर. व्ही. ठाकूर यांनी दिली.
असा असेल शाळेचा पहिला दिवस
सकाळी 7 वाजता क्षेत्रीय अधिकारी, शिक्षक आणि गावकरी प्रांगणात जमतील. दररोज शाळेत बालकांना पाठवण्याचे नारे देत प्रभातफेरी काढतील. दुपारी विद्यार्थ्यांना गोड पदार्थ देण्यात येतील. तसेच सर्व क्षेत्रीय अधिकारी शाळांना भेट देतील.