आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक : पराभवाच्या अनुभवामुळे झांबड यांचे ‘आस्ते कदम’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - गेल्या दोन निवडणुकांत पराभवाचा सामना केल्यानंतर सुभाष झांबड यांनी पुन्हा एकदा औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत उतरण्याची पूर्ण तयारी केली होती. मात्र, मोठय़ा प्रमाणावर सुरू झालेला घोडेबाजार आणि काँग्रेसकडे बहुमत असतानाही विजयाची खात्री नसल्याने त्यांनी तूर्तास माघारीचा निर्णय घेतला. पक्षाच्या नेत्यांनी उमेदवारी देताना विजयासाठीही प्रयत्न करावेत, ही अट मान्य असेल तरच रिंगणात उतरण्यात स्वारस्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सध्या तरी झांबड रिंगणातून बाहेर पडल्यामुळे घोडेबाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या या निवडणुकीत तूर्तास तरी रस कमी झाला आहे.

2007 मध्ये झांबड हे याच मतदारसंघात भाजपच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून उतरले होते. राष्ट्रवादीचेही अनेक नगरसेवक त्यांच्यासोबत होते. मात्र, त्यांच्या उमेदवारीमुळे काँग्रेसचे अब्दुल सत्तार यांचा पराभव झाला आणि शिवसेनेचे किशनचंद तनवाणी आमदार झाले. त्यानंतर 2009 मध्ये झांबड यांनी अपक्ष म्हणूनच औरंगाबाद पूर्व मतदारसंघाची निवडणूक लढवली. त्या वेळीही राष्ट्रवादीचे त्यांना छुपे पाठबळ होते. तरीही त्यांना पराभव पत्करावा लागला. राजेंद्र दर्डा सहजपणे निवडून आले.

नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सूत न जमल्यामुळे दीड वर्षापूर्वी झांबड यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याच वेळी त्यांना औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून उमेदवारी देण्याचे आश्वासन मिळाले होते. या वेळी या मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादीचे स्पष्ट बहुमत असल्याने तेही काहीसे निवांत होते. माजी मंत्री अब्दुल सत्तार आणि शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनीही आपले वजन झांबड यांच्या पाठीशी लावले होते. त्यांची उमेदवारी निश्चित समजली जात असतानाच दोन दिवसांपूर्वी जिमखाना क्लबमध्ये झालेल्या काँग्रेस इच्छुकांच्या बैठकीत झांबड यांनी माघार घेत असल्याचे सूचित केले. घोडेबाजार होऊ नये, अशी इच्छा व्यक्त करतानाच काँग्रेसने उमेदवारी देण्याबरोबरच रसदही पुरवावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. झांबड मैदानात असल्यामुळे मतदारांना सोन्याचे दिवस आल्याची चर्चा होती; परंतु त्यांच्या माघारीमुळे काँग्रेसकडून कोण, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. दुसरीकडे झांबड मैदानात नसल्यामुळे फारसा फरक पडत नसल्याचे तनवाणी यांनी सांगितले.


कोटींची उड्डाणे थांबली
झांबड मैदानात असल्यामुळे प्रत्येक उमेदवाराचा खर्च काही कोटींत जाणार, अशी चर्चा होती. आताही हा खर्च कोटींतच जाणार असला तरी झांबड यांच्या माघारीमुळे ही उड्डाणे र्मयादित होण्याची शक्यता असल्याचे बोलले जाते.


पूर्णत: माघार घेतली नाही
घोडेबाजार होऊ नये, अशी अपेक्षा मी व्यक्त केली आहे. उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षाकडून घेतला जाईल. मी पूर्णत: माघार घेतलेली नाही; पण घोडेबाजार होऊ नये यासाठी मी प्रयत्न करत आहे. सुभाष झांबड, काँग्रेस इच्छुक उमेदवार.