आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘जनआंदोलन विकास समिती’च्या नावाखाली नवी काँग्रेस?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबाद-जालनास्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील आमदार सुभाष झांबड यांनी ‘जनआंदोलन विकास समिती’ची स्थापना केल्याची घोषणा बाहेर आली अन् अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. त्याचे कारणही तसेच आहे. झांबड सध्या विरोधी बाकावर आहेत आणि मागण्या मंजूर करून घेण्यासाठी रस्त्यावर येण्याकरिता त्यांना वेगळ्या व्यासपीठाची गरज नाही, परंतु तरीही त्यांनी हा निर्णय घेतला. त्यामुळेच ही समिती चर्चेचा विषय झाली आहे. समितीच्या नावाखाली झांबड यांनी जिल्ह्यात नवी काँग्रेस तर स्थापन केली नाही ना, अशीही चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे.
चर्चेची काही कारणे आहेत. एक म्हणजे जिल्हा काँग्रेसमधील आपले स्थान त्यांना वाढवायचे आहे. दुसरे म्हणजे मराठा मुक्ती मोर्चामुळे मराठा समाज एकवटल्याचे दिसते. त्यामुळे भविष्यात वैजापूर विधानसभेची निवडणूक लढवताना या समितीचा फायदा होऊ शकणार आहे. काँग्रेसच्या नावाखाली मराठे मतदान करणार नाही, तेव्हा समितीच्या झेंड्याखाली त्यांना आपल्याकडे वळण्याचा प्रयत्न झांबड यांच्याकडून होताना दिसतो. त्यामुळेच या समितीच्या नावांवर नजर टाकली तर तेथे मराठ्यांची संख्या जास्त दिसते.

हा तर गांधीवादी मार्ग
राज्यात मराठा समाज लाखोंच्या संख्येत शांततेत रस्त्यावर उतरला आहे. लोकशाहीत मागणी मांडण्याचा हा गांधीवादी मार्ग आहे. त्याच मार्गाने आमच्या समितीला जायचे आहे. ते काँग्रेसमध्ये कदाचित मला शक्य नव्हते, असे ते म्हणाले.

मी काँग्रेसचाच
^काँग्रेसमध्येमीराजकारण करणार हे नक्की आहे, परंतु विकासाच्या किंवा विरोधाच्या मुद्द्यावर काँग्रेसच्या झेंड्याखाली सर्वजण एकत्र येऊ शकत नाहीत. सर्व पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन विकासासाठी आंदोलन करावे म्हणून ही समिती गठित करण्यात आली आहे. मी काँग्रेसचा आहे, माझी वेगळी काँग्रेस कशी असेल? -सुभाष झांबड, आमदार तथा मुख्य मार्गदर्शक, जनआंदोलन विकास समिती.

कशामुळे वाटते झांबड काँग्रेस ?
पत्रकारपरिषदेत झांबड यांनी या समितीच्या अध्यक्षापासून ते सदस्यांपर्यंत सुमारे दीडशे जणांची नावे जाहीर केली. यात सर्व काँग्रेसचेच चेहरे आहेत. येत्या काळात अन्य पक्षातील चेहरे यात दिसतील, असा दावा झांबड यांनी केला असला तरी हे कितपत शक्य होईल याबाबत ते स्वत: साशंक आहेत. तूर्तास तरी ही समिती म्हणजे काँग्रेसचाच एक गट वाटतो. खास करून जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांच्या गटातील कोणीही यात नाही. शहराध्यक्ष नामदेव पवार यांच्या समर्थकांचीही नावे दिसत नाहीत. त्यामुळे काँग्रेसमधील मी एक मोठा गटधारी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न यातून साध्य करण्यात येत असल्याचीही चर्चा काँग्रेसमध्ये आहे. त्यामुळे ही समिती म्हणजे ‘झांबड काँग्रेस’ असा प्रचार लगोलग सुरूही झाला आहे.
बातम्या आणखी आहेत...