आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेगळ्या चुलीचा प्रयत्न झांबड यांच्या अंगलट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ‘जनआंदोलन विकास समिती’च्या नावाखाली वेगळा दबावगट तयार करण्याचा प्रयत्न काँग्रेस आमदार सुभाष झांबड यांच्या अंगाशी आल्याचे दिसते. कारण ही समिती स्थापून विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्याच्या झांबड यांच्या भूमिकेला जिल्हाध्यक्ष आ. अब्दुल सत्तार यांनी आक्षेप घेतला आहे. यामुळे पक्षांतर्गत राजकारणात नव्या वादाला सुरुवात झाली आहे. हा वाद लवकर मिटेल, अशी चिन्हे नाहीत.
पक्षाचा आमदार पक्षात राहून वेगळ्या मार्गाने आंदोलन करणार असेल तर पक्ष त्याला खपवून घेणार नाही. या सर्व प्रकरणाचा अहवाल तीन दिवसांत प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यंच्याकडे देण्यात येणार असून त्यानंतरही झांबड जन आंदोलनात कायम राहिले तर त्यांच्यावर थेट कारवाई करण्यात येईल, अशा स्पष्ट शब्दांत सत्तार यांनी इशारा दिला आहे.

आमदार झांबड यांनी एका पत्रकार परिषदेत जन आंदोलन विकास समितीच्या स्थापनेची घोषणा केली. ते या समितीचे मुख्य प्रवर्तक असून काँग्रेसमधील अन्य पदाधिकाऱ्यांकडे त्यांनी समितीची अन्य पदे सोपवली आहेत. काँग्रेसचे पदाधिकारी राजेंद्र दाते पाटील यांच्याकडे या समितीचे अध्यक्ष असून माजी शहराध्यक्ष अॅड. सय्यद अक्रम यांच्यापासून सत्तार यांच्यावर नाराज असलेल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांनाच स्थान देण्यात आले आहे.

‘जन विकास आंदोलन समिती’ म्हणजे झांबड यांची ‘प्रतिकाँग्रेस’ असल्याचे सर्वांच्याच लक्षात आले होते. त्याची दखल सत्तार यांनी घेतली. सत्तार हे बाहेरगावाहून परतल्यानंतर लगेच त्यांनी कारवाईची प्रक्रिया सुरू केली.

शहराध्यक्षपद मिळाल्याची नाराजी :
दरम्यान,सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार झांबड यांना शहराध्यक्ष व्हायचे होते. परंतु त्यांच्या जागी माजी आमदार नामदेव पवार यांची नियुक्ती करण्यात आली. तसे करताना पक्षाने झांबड यांना प्रदेश कार्यकारिणीवर स्थान दिले होते. परंतु शहरावर आपली पकड मजबूत असावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. पवार यांच्या नियुक्तीमुळे नाराज झालेल्या सर्वांनी मिळून ही समिती गठित केली. त्याचा फटका पक्षालाच बसणार हे नक्की आहे.

पुढे काय होऊ शकते?
या समितीचा राजकारणाशी काहीही संबंध नाही, हे झांबड यांना पक्षाला पटवून द्यावे लागेल. अन्यथा मुख्य प्रवर्तक या पदावरून दूर होऊन पडद्यामागून सूत्रे हलवावे लागतील. असे केले नाही तरी अडचणी वाढतील.

पक्षाकडे खुलासा करू
ही समिती अराजकीय आहे, त्याचा पक्षाच्या धोरणांशी संबंध नाही. असे झांबड यांनी पूर्वीच स्पष्ट केले होते. तरीही पक्ष नेतृत्वाकडे खुलासा करून त्यांच्या आदेशानुसार पुढील निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...