आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंधत्वावर मात करत स्पर्धा परीक्षेद्वारे मिळवले यश, ऑफिसर पदाचीही परीक्षा केली उत्तीर्ण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शालेय जीवनातच अंधत्वाचे दु:ख वाट्याला येऊनही त्यावर मात करीत तो उच्चविद्याविभूषित बनला. स्पर्धा परीक्षेद्वारे युनियन बँकेची नोकरी मिळवली. तीन पदव्युत्तर पदव्यांचा थक्क करणारा त्याचा प्रवास डोळसांनाही तोंडात बोटे घालायला लावणारा आहे. अमर गजानन दांदळे अशी या २६ वर्षीय जिद्दी तरुणाची ही कहाणी आहे.
 
समर्थनगरातील ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ.ए.ए. देशपांडे यांच्या नॅब संस्थेतील कार्यक्रमात अंध विद्यार्थ्यांना अमरने स्मार्टफोन हाताळण्याचे प्रशिक्षण दिले तेव्हापासून त्याची सर्वांना ओळख झाली. त्याची यशकथा जाणून घेण्यासाठी ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने बँकेत भेट घेतली तेव्हा अंध असल्याची पुसटशीही जाणीव होऊ देता तो अत्यंत आत्मविश्वासाने बोलत होता. दहावीत असताना दृष्टी कमी झाली. काही दिवसांत शंभर टक्के अंधत्व आले. त्याने मदतनिसाच्या साहाय्याने दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली. पुढे अकरावीत तो ब्रेल शिकला. बारावीनंतर विवेकानंद कॉलेजमधून बी.ए. केले. बी.एड, एम.ए. मराठी आणि एम.ए. संगीतशास्त्र या पदव्या त्याने चांगल्या गुणांनी मिळवल्या. स्पर्धा परीक्षेद्वारे युनियन बँकेत कारकुनाची नोकरी मिळवली. या बँकेच्या समर्थनगर शाखेत संगणकावर कुणाचीही मदत घेता तो ग्राहकांचे आधार नंबर अकाउंटशी लिंक करण्याचे काम करतो.
 
संगीताने खूप मोठी ऊर्जा मिळाली : शासकीयज्ञान-विज्ञान महाविद्यालयातील प्रा. कळसणे यांच्या मार्गदर्शनाने अमरने एम.ए. संगीत केले. संगीताने खूप मोठी ऊर्जा मिळाली. त्याचा फायदा दररोज होतो, असे तो सांगतो. एम.ए. संगीत हा विषय खूप कठीण आहे, पण यात ७४ टक्के गुण मिळवले. ७६ टक्क्यांसह बीएड केले. ६५ टक्के गुणांसह एम.ए. मराठी ही पदव्युत्तर पदवी मिळवली.
 
अंधांसाठी मदत केंद्र उघडणार : अंधांसाठीपुण्याएवढी मदत केंद्र मराठवाड्यात नाहीत. परीक्षा देताना दरवेळी बोर्डाची परवानगी घ्यावी लागते. कधी मदतनीस मिळतो तर कधी नाही. प्रत्येक गोष्टीत अंध विद्यार्थ्यांना संघर्ष करावा लागतो. त्यामुळे अंधांसाठी कायमस्वरूपी मदत केंद्र उभारायचे आहे. तेथे त्यांना शिक्षणासाठी सर्व मदत मिळेल.

अधिकारीपदाचीपरीक्षा केली उत्तीर्ण :अमर युनियन बँकेत एक वर्षापासून कारकून म्हणून काम करतो. स्पर्धा परीक्षेतून तो २०१६ मध्ये युनियन बँकेत लागला. बँकेत तो इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे काम करतो. दुसऱ्या बँकेची अधिकारीपदाची परीक्षा नुकतीच उत्तीर्ण झाला. या प्रवासात आई, वडील, भाऊ आणि मित्रांची खूप मदत झाली.
 
स्मार्टफोनही सरावानेच हाताळतो
तूसंगणक किंवा स्मार्टफोन इतका छान कसा काय वापरू शकतोस? कुठे शिकलास हे सगळं? या प्रश्नावर तो म्हणाला, मित्रांकडूनच शिकलो. गुगलमध्ये अनेक सॉफ्टवेअर आहेत. ते आपल्याशी बोलतात, सूचना देतात. ते एेकून मी काम करतो. ग्राहकांचे नंबर घेऊन त्यांना कॉल करणे, त्यांचे आधार लिंक करणे हे काम मी करतो. स्मार्टफोनही आपल्याशी बोलतो. त्यामुळे अंधांना तो सहजपणे हाताळता येण्यासारखा आहे. मी अंध विद्यार्थ्यांना स्मार्टफोन कसा हाताळावा, याचे प्रशिक्षण देत असतो.
बातम्या आणखी आहेत...