आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Success Of Pre Ias Training Center Student In Competitive Exam

‘प्री आयएएस ट्रेनिंग सेंटर’ने फडकवली यशाची पताका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मागील वर्षीप्रमाणे यंदाही शहरातील विभागीय राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेच्या ‘प्री आयएएस ट्रेनिंग सेंटर’ने यूपीएससी परीक्षेत यशाची पताका फडकवली आहे. नुकत्याच लागलेल्या यूपीएससी अंतिम परीक्षेच्या निकालात सेंटरचे सहा विद्यार्थी यशस्वी झाले असल्याची माहिती सेंटरच्या संचालिका डॉ. हेमलता वानखेडे यांनी दै. ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने एप्रिल-मे महिन्यात घेण्यात आलेल्या यूपीएससी अंतिम परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. देशभरातील 998 विद्यार्थी या परीक्षेत यशस्वी झाले आहेत. शहरातून चांगले अधिकारी घडावेत या उद्देशाने 1986 मध्ये शहरात ‘प्री आयएएस ट्रेनिंग सेंटर’ सुरू करण्यात आले. तज्ज्ञ अधिकारी आणि प्राध्यापकांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि त्याचबरोबरच विद्यार्थ्यांच्या मेहनतीमुळे आज विविध क्षेत्रांत या सेंटरचे विद्यार्थी यशस्वी होत आहेत. या विद्यार्थ्यांवर घेतली जाणारी मेहनत आणि त्याचे फलित म्हणजे नुकताच लागलेला यूपीएससीचा निकाल होय. यात कौस्तुभ दिवेगावकर 15 वी रँक, भरत मरकड 445, संदीप सोनटक्के, स्नेहल भापकर 998, स्वप्नील सावंत 170 आणि गणेश राख याने 522 वी रँक मिळवली आहे, असेही डॉ. वानखेडे यांनी सांगितले.

प्रशस्त इमारतीसाठी शासनाकडून 4 कोटी

आगामी काळात सेंटरची प्रशस्त अशी स्वतंत्र इमारत उभारली जाणार आहे. त्यासाठी शासनाच्या वतीने 4 कोटी रुपये निधी सेंटरला मिळाला असून यात खास 40 मुले आणि 40 मुलींची राहण्याची व्यवस्था असेल. स्पर्धा परीक्षेत विद्यार्थ्यांना चांगले यश मिळवण्यासाठी शासनाच्या वतीने औरंगाबादसह नागपूर, कोल्हापूर, मुंबई येथेही ‘प्री आयएएस ट्रेनिंग सेंटर’ उभारण्यात आले आहेत. यात दरवर्षी स्पर्धा परीक्षेतून करिअर घडवू पाहणार्‍या 70 विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून प्रवेश दिला जातो. स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या होतकरू विद्यार्थ्यांना शासनाच्या वतीने दरमहा 2000 रुपये विद्यावेतनही देण्यात येते.

मॉक इंटरव्ह्यू : दिवसेंदिवस वाढत जाणार्‍या स्पर्धेद्वारे विद्यार्थ्यांनी गुणवत्ता सिद्ध करावी, या हेतूने सेंटरच्या वतीने मुख्य परीक्षेस पात्र ठरणार्‍या विद्यार्थ्यांचे मॉक इंटरव्ह्यूदेखील घेतले जातात. शहरातील आयएएस अधिकारी या मुलांच्या मुलाखती घेऊन त्यांना मार्गदर्शन करतात. विद्यार्थ्यांना त्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी व्हिडिओ शूटिंगही केले जाते, अशी माहितीही वानखेडे यांनी दिली. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी सातत्य आणि नियमित अभ्यासाची जोड हवी. कोणतेही यश सहज मिळत नाही, असेही या वेळी डॉ. वानखेडे यांनी सांगितले.

गुणवत्ताही महत्त्वाची : यशवंतांचे बोल
स्पर्धा परीक्षेत सहज यश मिळत नाही. त्यासाठी विद्यार्थ्यांनी जिद्द, मेहनत, चिकाटी आणि त्याबरोबरच वेळेचे महत्त्व लक्षात घेता गुणवत्तापूर्ण अभ्यास करण्याची गरज आहे. त्यावरच आम्ही हे यश मिळवू शकलो. क्वांटिटी नव्हे, तर क्वालिटी स्टडी अत्यंत महत्त्वाची आहे, अशी प्रतिक्रिया यूपीएससीच्या अंतिम परीक्षेत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांनी दिली.

गुणवत्तेवर भर देणे गरजेचे
कोणतेही यश तुम्ही तयारी केली आणि लगेच मिळाले, असे होत नाही. त्यासाठी मेहनत व नियमित सरावाबरोबरच गुणवत्तेवर भर देणे आवश्यक आहे. मी एलआयसीमध्ये अधिकारी असतानाही काम आणि गुणवत्ता तसेच वेळेला महत्त्व देत अभ्यास केला. तारांबळ व्हायची, पण चिकाटी सोडली नाही. त्यामुळेच हे यश मिळाले. संदीप सोनटक्के

कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर विद्यार्थ्यांनी संकल्पनात्मक अभ्यासावर भर दिला पाहिजे. त्यामुळे विषय समजून घेणे सोपे होते. त्याच पद्धतीचा अवलंब मीदेखील स्पर्धा परीक्षेची तयारी करताना केला. त्यामुळेच हे यश मिळवू शकलो. कौस्तुभ दिवेगावकर

मेहनतीची तयारी हवी
मी अभियांत्रिकी शाखेतील अँग्रीकल्चरचा विद्यार्थी आहे. यामुळे वेळेबरोबरच गुणवत्तापूर्ण अभ्यास करण्यावर नेहमी भर दिला. रोज तुम्ही किती तास अभ्यास करता यापेक्षा तुम्ही काय अभ्यास करताय, याला महत्त्व आहे. प्रथम प्रयत्नातच हे यश मी मिळवू शकलो. माझ्या कुटुंबात कोणीही प्रशासकीय अधिकारी नाही. वडील शेती करतात, तर आई गृहिणी आहे. मेहनत करण्याची तयारी ठेवा, यश तुमचेच आहे. भरत मरकड