आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ऑपरेशन मुस्कान’अंतर्गत पोलिसांनी बेपत्ता आई-मुलीला शोधले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- एक जुलैपासून सुरू झालेले ‘ऑपरेशन मुस्कान’ यशस्वी करण्यासाठी शहरातील पोलिस अथक परिश्रम घेत आहेत. अल्पवयीन, हरवलेल्या, पळून गेलेल्या मुला-मुलींचा शोध घेण्याचे काम या ऑपरेशनमार्फत सुरू आहे. छावणी ठाण्याच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी या ऑपरेशनअंतर्गत एका हरवलेल्या मुलीसह तिच्या बेपत्ता आईलाही शोधून काढले.
जून २०१३ पासून प्रमिला सचिन हिवराळे (२२) आणि नम्रता सचिन हिवराळे या माय-लेकी बेपत्ता असल्याची तक्रार सचिन हिवराळे यांनी छावणी पोलिस ठाण्यात दिली होती. नवऱ्याच्या भांडखोर स्वभावामुळे प्रमिलाच मुलीला घेऊन घरातून निघून गेली होती. जुलै २०१४ रोजी प्रमिलाच्या वडिलांचे निधन झाल्याने ती वडिलांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र, प्रमिला कुठे राहत आहे, हे समजत नव्हते. ऑपरेशन मुस्कानदरम्यान पोलिसांनी शोध घेतला असता या माय-लेकी बेगमपुऱ्यात राहत असल्याचे पोलिसांना कळाले. मात्र, प्रमिलाने नवऱ्यासोबत राहण्यास तयार नसल्याचे पोलिसांना सांगितले.

दरम्यान, छावणी परिसरातील विद्यादीप बालसुधारगृहात ते १८ वर्षे वयोगटातील सुमारे ९२ मुले-मुली असून त्यांना नेमका त्यांच्या घरचा पत्ता किंवा पूर्ण नाव माहीत नसल्याने पोलिसांना त्यांच्या पालकांचा शोध घेण्यास अडचण येत आहे. यातील २० मे २०१४ पासून बेपत्ता असलेल्या निकिता उर्फ नेहा खाजा शेख (८) या मुलीचे वडील मातीकाम, तर आई धुणे-भांडी करत असल्याचे आणि मुकुंदवाडी परिसरातील एका मशिदीच्या आसपास तिचे घर असल्याचे ती मुकुंदवाडी पोलिसांना सांगते. या ठिकाणी छावणी पोलिस निकिताच्या पालकांचा शोध घेत आहेत. जीवन महाजन महेर (१३, कोमलनगर पडेगाव) हा मुलगा २९ जून रोजी बेपत्ता असल्याची तक्रार त्याची आई रेखाबाई महेर (३०) यांनी पोलिस ठाण्यात नोंदवली होती. त्यानंतर छावणी पोलिस ठाण्याचे कुरुंदकर यांनी तपास करून जीवन सिकंदराबादला असल्याची माहिती मिळवली. पोलिसांनी त्याला सिकंदराबादहून बोलावून आईच्या हवाली केले. या ‘ऑपरेशन मुस्कान’मध्ये छावणी ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत सावळे, पोलिस हवालदार आर. यू. खंडागळे, विनोद नितनवरे, महिला पोलिस एस. एच. पठाण, एस. पी. इंगळे यांचा समावेश आहे.

अशाचप्रकारे एका व्यक्तीने नगरमधून मनीषा बंडू (४) आणि चंदा बंडू (५) या दोन मुलींना फेब्रुवारी २०१४ रोजी या आश्रमात आणून सोडले. त्यांच्या आईचे नाव नीला आणि भावाचे नाव राहुल असल्याचे या मुली सांगतात. मात्र, त्यांना याव्यतिरिक्त काही माहीत नसल्याने पोलिसांना त्यांच्या पालकांचा शोध घेण्यास अडचण येत आहे.
बातम्या आणखी आहेत...