आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपंगत्वावर मात करून अतुल बनला संगणक अभियंता !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- पडेगाव येथील अतुल डहाळे या २७ वर्षीय तरुणाचा डावा हात जन्मत: अर्धा अपंग आहे. त्यामुळे उजव्या हातानेच त्याला सर्व दैनंदिन कामे करावी लागतात. अपंग असल्याचा त्याने कधीच कमीपणा वाटून घेतला नाही. उलट जिद्दीने अपंगत्वावर मात करून तो कॉम्प्युटर इंजिनिअर झाला. अतुल संगणकावर डिझाइन महावितरणमध्ये आऊटसोर्सिंग कामगार म्हणून काम करत आहे. दुचाकी, चारचाकी वाहन चालवण्यातही तो पटाईत आहे. सुंदर चित्रे रेखाटतोय.
पन्नासपेक्षा अधिक कविताही लिहिल्या आहेत. त्याचे कर्तृत्व तरुणांसाठी आदर्श ठरत आहे.
अतुलचे वडील प्रकाश डहाळे हे मूळचे परभणी जिल्ह्यातील आहेत. घरची परिस्थिती बेताचीच होती. नोकरीसाठी गाव सोडावे लागले. महावितरणमध्ये ते वित्त लेखा विभागात व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. आई उषा गृहिणी आहेत. अतुलचे शिक्षण औरंगाबादेतच झाले. एका हाताने अपंग असूनही सर्व खेळांत तो हिरीरीने सहभागी होतो. सायकल, मोटारसायकल, कार चालवण्यातही तो तरबेज आहे. मात्र, अपंग असल्याने वाहन चालवण्याचा परवाना मिळत नसल्याचे त्याला दु:ख आहे. तो दहावी, बारावी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला. हायटेक पॉलिटेक्निक्स कॉलेजमधून २०११ मध्ये कॉम्प्युटर इंजिअनिअरिंग ग्रेडमधून पूर्ण केले. जयपूर राष्ट्रीय विद्यापीठातून गतवर्षी बीएस्सी द्वितीय वर्षाच्या परीक्षेत ८० टक्के गुण मिळवले.
‘कमवा शिका’ या तत्त्वावर तो महावितरणमध्ये आऊटसोर्सिंग संगणक अभियंता म्हणून काम करून अंतिम वर्षाचा अभ्यासही करतोय. लहानपणापासून त्याला वाचन, चित्रे काढण्याची आवड आहे. त्याला आलेले अनुभव, बघितलेले वास्तव यातून त्याला कविता सुचल्या. त्याने पन्नासवर कविता लिहून ठेवल्या आहेत. शासकीय नोकरी मिळावी यासाठी तो स्पर्धा परीक्षांची तयार करत आहे. सामाजिक कार्यातही तो उत्साहाने सहभागी होतो.

डॉक्टर होऊ शकल्याची खंत
डॉक्टरहोण्याची अतुलची मनापासून इच्छा होती. पण एका हाताने रुग्णाला आपण इंजेक्शन देऊ शकणार नाही किंवा सर्जरी करू शकणार नाही याची जाणीव त्याला स्वत:ला झाली. शिवाय मित्र आणि परिवाराने त्याची समजूत काढली. यामुळे हताश होता त्याने संगणक अभियंता होण्यासाठी परिश्रम घेेतले. अपंग हाताने संगणक हताळण्यातही तो तरबेज झाला आहे. याशिवाय डिझाइन व्यवसाय ही तो कुशलतेने पार पाडत आहे. त्याच्या या कौशल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.