आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंधारे बांधल्याने डबडबल्या विहिरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - बाराही महिने पाणीटंचाईने त्रस्त असल्याने लोकसहभागातून खाम नदीवर टाकलेल्या बंधाऱ्यांमुळे वाळूजलगतच्या मेंदीपूर, इमामपूर, पिंपरखेडा व गाढेगाव - गंगापूर या चार गावांच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. शासनाच्या मदतीची अपेक्षा न करता तीनशेपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी एकत्र येत टाकलेल्या आठ बंधाऱ्यांमुळे ४ किलोमीटर अंतरातील सव्वाशेंवर विहिरी तर दोनशेंवर इंधन विहिरी डबडबल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर कामाचे ‘चीज’ झाल्याचे समाधान ओसंडून वाहत आहे. ही किमया साधली गेली, गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व पिंपरखेड्याचे माजी सरपंच नंदकुमार गांधिले व गाढेगाव-गंगापूर येथील सुदामराव हुले यांच्या मार्गदर्शनामुळे.
वाळूज भागाला परिसरातून वाहणाऱ्या खाम नदीमुळे वरदान लाभलेले आहे. ही नदी बनवाडी, गोलवाडी, वळदगाव, पाटोदा, नायगाव, नेहरी गंगापूर, हनुमंतगाव, वाळूज, नारायणपूर, लांझी, पिंपरखेडा, मेंदीपूर, इमामपूर, गाढेगाव-गंगापूर, शेंदुरवादा परिसरातून वाहते. या नदीवर लांझीपर्यंतच्या गावातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कृषिपंप बसवून नदीतील पाणी शेतीसाठी घेतले आहे. शेकडोंच्या संख्येत कृषिपंप असल्याने नदीतील पाणी लांझी गावापासून पुढे अत्यल्प प्रमाणात येते. त्यामुळे मंेदीपूर, इमामपूर, पिंपरखेडा व गाढेगाव-गंगापूर या चार गावांना बाराही महिने पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. या गावातील अनेक शेतकऱ्यांनी नदीच्या कडेला विहिरी खोदून बघितल्या. मात्र, त्यांनाही पाणी लागत नव्हते. पाण्याअभावी परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ कायम चिंतेत व काळजीत असायचे. त्यात जनावरांच्या पाण्याची तर बिकट अवस्था व्हायची. शिवाय त्यात भर म्हणून मागील चार वर्षांपासून परिसरात अत्यल्प पाऊस होत आहे. त्यामुळे कायम या गावांवर दुष्काळी परिस्थिती उभी राहते.
शेतकऱ्यांची बैठक : वर्षभर भेडसावणाऱ्या पाणीटंचाईमुळे परिसरातील बागायती शेती धोक्यात आली. त्यामुळे बागायतदार शेतकरी उद्ध्वस्त होण्याची चिन्हे निर्माण झाली. त्यामुळे गाढेगाव- गंगापूर येथील सुदामराव हुले आणि गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व पिंपरखेड्याचे माजी सरपंच नंदकुमार गांधिले यांनी निवडक शेतकऱ्यांची बैठक घेतली. सर्वांच्या मार्गदर्शनातून व चर्चेतून खाम नदीवर बंधारे बांधण्याचा पर्याय समोर आला. त्यावर सर्वांचे एकमत झाले.
लोकवर्गणीतून प्रारंभ
बैठकीत ठरल्याप्रमाणे ४ गावांसाठी अर्धा किलोमीटरच्या अंतरात एक याप्रमाणे ८ बंधारे टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या दृष्टीने नियोजन करून लोकवर्गणी करण्यात आली. पिंपरखेडा गावापासून कामाला प्रारंभ करण्यात आला. खाम नदीत जेसीबी यंत्राच्या मदतीने नदीच्या दोन्ही बाजूंना जोडून हे बंधारे घालण्यात आले. बंधाऱ्यांची उंची जवळपास १२ ते १५ फूट ठेवण्यात आली. अशा पद्धतीने आठवडाभरात ८ बंधाऱ्यांची कामे युद्धपातळीवर करण्यात आली. मात्र, प्रारंभीचा बंधारा वगळता कोणत्याही बंधाऱ्यात पाण्याचा थेंब लागला नाही. त्यामुळे शेतकरी हादरले होते.
आणि बंधाऱ्यात पाणी आले
बंधारे टाकून तीन दिवसांचा कालावधी उलटला. मात्र पाणी येण्याची चिन्हे दिसत नसताना आशेचा किरण दिसला. नदीपात्राच्या एका बंधाऱ्यातील वाळूमध्ये फूटभर खोलीचा खड्डा खोदला, तेव्हा त्यात पाणी आलेले दिसले. त्यानंतरच्या दोन दिवसांनी सर्व बंधाऱ्यांमध्ये पाणी डबडबले. तेव्हा शेतकऱ्यांनी एकच जल्लोष केला. बंधारे पाण्याने भरल्यानंतर ते फुटू नयेत, यासाठी त्यातील अतिरिक्त पाणी वाहून जाण्याची सुविधा ठेवण्यात आली होती. त्यामुळे हळूहळू सर्व बंधाऱ्यांमध्ये पाण्याचा झिरपा होऊन पाण्याची साठवणूक झाली. बंधाऱ्यांमध्ये आता साडेपाच ते आठ फूट खोलींपर्यंत पाणी साचले आहे. नंदकुमार गांधिले,
सुदाम हुले, रमेश पवार, भरत मुळे, केशव लघाने, भागवत मुळे, अंकुश शेळके, दिलीप हुले अादींनी या कामात पुढाकार घेतला
सव्वाशे विहिरी डबडबल्या
मंेदीपूर, इमामपूर, पिंपरखेडा व गाढेगाव- गंगापूर गावातील शेतकरी वर्गात सध्या आनंदाचे वातावरण आहे. बंधाऱ्यांच्या लगत असलेल्या शेतीतील सव्वाशेंवर विहिरी, दीडशेंवर इंधन विहिरी सध्या पाण्याने भरल्या आहेत. त्यामुळे कोमेजलेली परिसरातील बागायती पुन्हा फुलणार आहे.

शेतकऱ्यांच्या मेहनतीचे फळ
आता शेतकऱ्यांनी घेतलेल्या परिश्रमाचे फळ त्यांना मिळाले आहे. शासनाने याची दखल घेत तेथे सिमेंट बंधारे बांधावेत. जेणेकरून पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाय निघू शकेल.
नंदकुमार गांधिले, माजी सरपंच