आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादचा मूकबधिर खेळाडू सागर बडवेची यशोगाथा, ‘एनआयएस’ करणारा देशात पहिला ठरला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - अंगभूत जिद्द, चिकाटीच्या बळावर मूकबधिर जलतरणपटू सागर बडवेने उत्तुंग यश मिळवले. भारतीय क्रीडा प्राधिकरणाचा (साई) जलतरणातील डिप्लोमा इन स्पोर्ट्स कोचिंग (एनआयएस) कोर्स त्याने पूर्ण केला. ‘एनआयएस’ प्रशिक्षक होणारा तो देशातील एकमेव मूकबधिर खेळाडू ठरला. वर्गातील लेक्चर्सचे आॅडिओ रेकाॅर्ड करून तो घरी आणायचा आणि आई कांचन हातांच्या इशाऱ्यावर त्याला ते समजावून सांगत असत.

सागरने (२५) अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, साहसी समुद्र स्पर्धा गाजवल्या. एनआयएस करण्याआधी त्याने त्रिवेंद्रमला प्राथमिक कोर्स केला. मूकबधिर असल्याने प्रवेश देण्यास संस्थेने फारसा रस दाखवला नाही. पतियाळाहून संमती मिळाल्याने प्रवेश मिळाला. सागरला मराठीशिवाय अन्य भाषा येत नव्हत्या. त्यामुळे विषय समजावून घेण्यात अडचणी होत्या.
मूकबधिरांसाठी प्रशिक्षण केंद्र उघडण्याचा मानस लेक्चर्समध्ये काय शिकवतात हे समजत नसल्याने सागरसमोर ते समजावून घेणे हेच मोठे आव्हान होते. त्यासाठी तो लेक्चरचे रेकॉर्डिंग करून घेत असे आणि नंतर ते आई कांचन यांच्याकडून हातांच्या इशाऱ्यावर समजावून घेत असे. वर्षभरात तीनही परीक्षांत त्याने यश मिळवले. त्यापूर्वी त्याने बी.पी.एड. अभ्यासक्रम पूर्ण केला. एनआयएस केल्याने सागरने प्रशिक्षक म्हणून करिअर करण्याचे ठरवले आहे. मूकबधिर खेळाडूंसाठी नियमित स्वरूपाचे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा सागरचा मानस आहे.
अडथळ्यांवर मात : सागरने पतियाळात एक वर्षाचा एनआयएस कोर्स करण्याचे ठरवले व प्रवेश, प्रात्यक्षिक परीक्षा व मुलाखत या कसोट्या पार केल्या. सर्व अडथळ्यांवर मात करत त्याने हा अभ्यासक्रम ६०.१२ टक्के गुण मिळवत पूर्ण केला. त्यामुळे त्याच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला गेला.

प्रमुख विषय जलतरण
अभ्यासक्रमात सागरचा जलतरण हा प्रमुख विषय आणि स्पोर्ट्स मेडिसिन, फिजिओलॉजी, स्पोर्ट्स सायकॉलॉजी, जनरल थिअरी अँड मेथड्स ऑफ ट्रेनिंग, बायोकेमिस्ट्री असे विषय होते. जलतरणात वॉटरपोलो, डायव्हिंग, तलावाचे बांधकाम व निगा तांत्रिक माहितीचे विश्लेषण करणे असे विषय होते. पतियाळा केंद्राचे संचालक एस. एस. रॉय, अकॅडमिक इन्चार्ज गुप्ता, औरंगाबाद साईचे उपसंचालक वीरेंद्र भांडारकर यांनी त्याला मार्गदर्शन केले.