आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अक्षरमोत्यांनाच दृष्टी बनवत विशालने गाठले यशाचे शिखर!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- अंगाने धडधाकट असतानाही आपण अनेकदा चाचपडत असतो. हे नाही, ते नाही म्हणून नेहमी किरकिर करतो, परंतु आपल्यात एखादी गोष्ट कमी आहे याचा बाऊ करता त्या कमतरतेलाच आपली ताकद मानत जन्मत:च अंध असलेल्या विशाल ढेपेने अक्षरमोत्यांनाच आपली दृष्टी बनवत बारावीच्या परीक्षेत ७३.८४ टक्के गुण मिळवून सर्वांसमोर एक आदर्श ठेवला आहे. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारची शिकवणी लावता विशालने हे यश मिळवले आहे.
मुकुंदवाडी, संजयनगर येथील रहिवासी पंडित आणि सुनीता ढेपे यांच्या पोटी विशालचा जन्म झाला. विशाल जन्मत:च पाहू शकत नाही, हे कळताच सुनीताताईंच्या पायाखालची जमीन सरकली. इतर मुलांप्रमाणे खेळू-बागडू शकणार नाही. अनेक गोष्टींत त्याला मर्यादाही येतील म्हणून त्या काळजीने खचल्या होत्या, असे सुनीताताई सांगतात. परंतु विशालची ध्येय गाठण्याची जिद्द पाहून त्याच्यातील कमतरतेलाच त्याची ताकद बनवण्याचा निर्धाराने वडील कामाला लागले.

त्यांनी विशालला ब्रेललिपीचे प्रशिक्षण देण्यासाठी तारामती बाफना अंध विद्यालयात प्रवेश घेऊन दिला. पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण इथे घेतल्यावर पुण्यात सर्वसामान्य मुलांच्या शाळेत त्याने दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. दहावीत त्याने ७४ टक्के गुण मिळवले. नंतर मात्र आपण सर्वसामान्य मुलांच्याच महाविद्यालयात शिकायचे, यावर ठाम असलेल्या विशालने देवगिरी महाविद्यालयात प्रवेश घेतला. मित्रांची मदत, शिक्षकांची साथ आणि रिक्षावाल्या काकांचा सहवास अन् पुस्तकांसाठी कधीही आपली परिस्थिती आड येऊ दिली नाही.
प्राध्यापक व्हायचे आहे
बारावीच्या परीक्षेत मिळालेल्या यशाने पुढे ज्या साक्षरतेने आणि अक्षरमोत्यांनी माझ्या आयुष्यात प्रकाश निर्माण केला, त्या साक्षरतेलाच सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी मराठी, समाजशास्त्र विषयाचा शिक्षक होण्याचे ध्येय विशालने बाळगले आहे.
- आधार नको, प्रोत्साहन हवे : माझ्यासारख्याविद्यार्थ्यांना सहानुभूती अथवा आधाराची नाही, तर प्रोत्साहनाची गरज आहे. संधी मिळाली तर माझ्यासारखी सर्व मुले आपल्या कमतरतेवर मात करत यश मिळवू शकतील, असे तो सांगतो.
बातम्या आणखी आहेत...