आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Successful Surgery Done By Dr On Small Child In Aurangabad

आर्याचे बोबडे बोल ऐकताच पित्याच्या डोळ्यांत तरळले अश्रू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - कन्यारत्न झाले म्हणून इतका आनंद झाला की, गगनही ठेंगणे वाटू लागले; पण मुलीच्या टाळूला भेग असल्याने ती बोलू शकणार नाही, हे कळल्यावर पायाखालची जमीनच सरकली. एकेदिवशी रस्त्याने जाताना इंग्लंडची टीम मोफत शस्त्रक्रिया करणार हे वाचनात आले आणि आशेचा किरण दिसला. हेडगेवार रुग्णालयात गेल्या वर्षी शस्त्रक्रिया झाली अन् चार वर्षांच्या आर्याचे बोबडे बोल ऐकून अश्रूच तरळले, अशी भावुक प्रतिक्रिया कन्नड येथील सोमनाथ सोनवणे यांनी दिली.

आर्याच्या टाळूला जन्मत: भेग असल्यामुळे तिला बिलकुल बोलता येत नव्हते. शिवाय संपूर्ण आहार मिळत नसल्याने शारीरिक वाढ खुंटली होती. पण गेल्या वर्षी नॉदर्न क्लाॅफ फाउंडेशनचे इंग्लंडस्थित व मूळ पुदुचेरीचे डॉ. जॉर्ज तेतूरस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरांच्या पथकाने आर्याची शस्त्रक्रिया केली आणि तिच्या बोलण्यातील अडचण दूर झाली. शनिवारी आर्या वडिलांसोबत हेडगेवार रुग्णालयात तपासणीसाठी आली होती. स्पीच थेरपी घेतल्यानंतर ती सामान्य मुलांप्रमाणे बोलेल, असा विश्वास डॉक्टरांनी व्यक्त केला. गेल्या वर्षी इंग्लंडहून आलेल्या २७ डॉक्टरांच्या टीमने ८४ यशस्वी शस्त्रक्रिया केल्या होत्या. यंदा ३८ डॉक्टरांची टीम आली असून १०० शस्त्रक्रिया ७ दिवसांत करण्यात येणार आहेत.

सुविधा आहेत, जागृती नाही
इंग्लंडमध्ये मूल जन्मल्यानंतर पहिल्या अाठवड्यातच सर्व तपासण्या केल्या जातात. काही दोष आढळल्यास पहिल्या सहा महिन्यांत शस्त्रक्रिया करून ते दूर केले जातात. टाळूची भेग जितक्या लवकर दूर केली जाईल तितके बाळाचे पोषण उत्तम होते. भेगेचे अंतर लवकर भरून आल्याने बोलणे सुरू होण्याआधीच सर्व सुरळीत होते, असे डॉ. तेतूरस्वामी यांनी सांगितले. ते म्हणाले, इंग्लंडप्रमाणे भारतातही सर्व अत्याधुनिक सोयी-सुविधा व तज्ज्ञ डॉक्टर आहेत; परंतु अर्थसाह्य करणाऱ्या संस्थांचा पुढाकार आणि जनजागृतीअभावी येथे एक वर्ष अलीकडील रुग्णांवर वेळीच उपचार होत नाहीत.

पालकांच्या आनंदात समाधान
^नॉदर्न क्लॉफ फाउंडेशनतर्फे मागील १६ वर्षांपासून हा कार्यक्रम राबवला जात आहे. आपल्या मुलाचे बोलणे ऐकणे हा प्रत्येक पालकाच्या आयुष्यातील भावुक क्षण असतो. शस्त्रक्रियेनंतर मुलांचे बोलणे ऐकून पालकांच्या चेहऱ्यावरील आनंद मला समाधान देऊन जातो. डॉ. जॉर्ज तेतूरस्वामी.