आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तहसीलकडून नांमकाचा पंचनामा, पाच कर्मचारी गैरहजर, रिकाम्या खुर्चीला हार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर - येथील तहसील कार्यालयाच्या पथकाने बुधवारी दुपारी अचानक नांदूर मधमेश्वर कालवा विभागास भेट देऊन पाहणी केली असता कार्यकारी अभियंता आर. पी. फुलंब्रीकर यांच्यासह पाच जण गैरहजर आढळून आले. याप्रकरणी तहसील प्रशासनाने पंचनामा केला असून कामचुकार अधिकारी व कर्मचाऱ्यांचा अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्यात आला आहे. यामुळे नांमकाचा भोंगळ कारभार आज पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. फुलंब्रीकर कार्यालयात नसल्याने संतप्त नागरिकांनी त्यांच्या खुर्चीस हार घालून राग व्यक्त केला.

बुधवारी दुपारी काही नागरिक कामानिमित्त नांदूर मधमेश्वर कालवा विभागाच्या कार्यालयात गेले होते. मात्र, त्या वेळी कार्यकारी अभियंता आर. पी. फुलंब्रीकर व अन्य कर्मचारी गैरहजर आढळून आल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी हा प्रकार तहसील कार्यालयात दूरध्वनीद्वारे कळवला. त्यानुसार मंडळाधिकारी व तलाठी शौकत शेख यांनी तत्काळ नांमकाच्या कार्यालयात दुपारी दोन वाजेच्या सुमारास जाऊन पाहणी केली असता कार्यकारी अभियंता आर.पी.फुलंब्रीकर यांच्यासह एल.एस.देशपांडे, टी. डी.लोकाक्ष, एम.ए.फारुकी व एस.एस.सुरडकर हे पाच अधिकारी गैरहजर आढळून आले.

या वेळी कार्यालयातील हजेरी पुस्तिका तपासली असता त्यात १५ पैकी ५ कर्मचारी प्रशिक्षण व प्रतिनियुक्तीवर असल्याचे दिसून आले. मात्र, याबाबतचा कोणताही लेखी पुरावा देण्यात आला नाही व या पाच कर्मचा-यांच्या हजेरी पुस्तिकेवर स्वाक्ष-या दिसून आल्या नाहीत. या प्रकरणी पथकाने पंचनामा करून कामचुकार अधिकारी व कर्मचा-यांचा अहवाल वरिष्ठांकडे सादर केला आहे.

दरम्यान, नांदूर मधमेश्वर कालवा विभागात अधिकारी व कर्मचारी हजर राहत नसल्याच्या अनेक दिवसांपासून तक्रारी आहेत. परंतु निर्ढावलेले अधिकारी व कर्मचारी कोणाला जुमानायला तयार नाहीत. विशेष म्हणजे दस्तुरखुद्द कार्यालयप्रमुखच नेहमी दांड्या मारीत असल्याने अन्य कर्मचाऱ्यांबाबत न बोललेच बरे. त्यांच्या गलथान कामाबाबत तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर बोंब होत असताना वरिष्ठांकडून त्यांना अभय मिळत असल्याचे बोलले जात आहे.

फुलंब्रीकर हटावसाठी आमदारांनी केले उपोषण
नांमकाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या मनमानी कारभाराला शेतकरीच नव्हे, तर लोकप्रतिनिधीही जाम वैतागले आहेत. बेजबाबदार अधिकारी फुलंब्रीकर हटाव या मागणीसाठी दस्तुरखुद्द आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी उपोषण केले होते. मात्र, तरीही त्यांच्या वर्तनात कोणताही बदल झाला नाही. एखाद्या अधिकाऱ्याविरुद्ध आमदारावर जर उपोषण करण्याची वेळ येत असेल तर सर्वसामान्यांची काय स्थिती असेल, याची कल्पनाच न केलेली बरी.

शेतक-यांनीही पुकारला एल्गार
मागील काही दिवसांपूर्वी वैजापूर तालुक्यातील सावखेड गंगा येथील नांमकाच्या लाभधारक शेतक-यांनी फुलंब्रीकर यांच्या गलथान कारभाराला वैतागून त्यांच्याच कार्यालयासमोर सतत दोन दिवस आंदोलन केले. नांमकाच्या पाण्याचे नियोजन चुकल्याने सावखेड गंगा येथील शेतकरी पाण्यापासून वंचित राहिल्याने संतप्त शेतक-यांनी फुलंब्रीकर यांच्या विरोधात एल्गार पुकारला होता. त्यामुळे या पाण्याचे योग्य पद्धतीने नियोजन करून गावांना देण्यात यावे, असा मानसही या वेळी शेतकऱ्यांनी बोलून दाखवला.
बातम्या आणखी आहेत...