आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्री पंकजांना फटका; निलंगेकर, लोणीकर, खोतकरांनी गट राखले (महाकौल)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या परळीचा कौल भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांना पराभवाची धूळ चारणारा ठरला आहे. त्यांच्या पिंपरी बुद्रुक गट व पांगरी गणावर राष्ट्रवादी काँग्रेसने विजयाचा झेंडा रोवत भाजपचा सफाया केला. इकडे  मंत्री बबनराव लोणीकर, संभाजी पाटील निलंगेकर व  राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी आपल्या होमपीच गट  व गणावर आपल्याच पक्षाचा उमेदवार निवडून आणला. विशेष म्हणजे निलंगेकरांनी लातूर जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता उलथवून भाजपला स्पष्ट बहुमताने सत्तेवर बसवले आहे.  
   
मराठवाड्यात लातूर वगळता एकाही जिल्हा परिषदेत एकाही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. उस्मानाबाद, परभणीत राष्ट्रवादी, नांदेडला काँग्रेस तर जालन्यात भाजप सत्तेसमीप पोहोचली असून हिंगोलीत मात्र त्रिशंकू अवस्था झाली आहे. ३ अपक्षांच्या हाती सत्तेच्या चाव्या असून प्रचंड घोडेबाजाराची शक्यता हिंगोलीत वर्तवण्यात येत आहे. औरंगाबाद, परभणी आणि नांदेड येथे एका अंकावर असलेल्या भाजपने मुसंडी मारत दोन अंकी संख्या गाठली आहे. विशेष म्हणजे हिंगोलीतील भोपळा फोडून भाजप थेट १० वर पोहोचली आहे.
 
मराठवाड्यात सत्ताधाऱ्यांना यश मिळेल, असा अंदाज बांधला जात होता. यातील निम्मा अंदाज भाजपने खराही ठरवला. मात्र, शिवसेनेच्या जागा तब्बल १८ ने घटल्या आहेत. शिवसेना मुंबईतच अडकल्याने भाजपने याला कॅश केले. विरोधक काँग्रेस आणि राष्ट्रवादीला नोटाबंदी मुद्दा प्रभावीपणे मांडता न आल्याने त्यांच्या पदरी निराशा पडली.  
 
बीडची निवडणूक गाजली ती अजित पवारांच्या वक्तव्याने.  एका वृत्तवाहिनीला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मुलाखत देऊन स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मतारखेचा मुद्दा उपस्थित केला होता. जन्मतारखेच्या वादामुळे बीडसह सबंध महाराष्ट्रातून पवार व धनंजय मुंडेवर टीकेची झोड उठवली गेली. या वादाने अजित पवारांनी धनंजय मुंडेंना अडचणीत आणल्याचा होरा काही राजकीय विश्लेषकांचा होता. मात्र, धनंजय मुंडे यांनी होमपीच राखल्याच्या या निकालाने तो साफ चुकीचा ठरवला.
 
चारपैकी ३ मंत्र्यांनी होमपीच राखले
- पंकजा  मुंडे, ग्रामविकास मंत्री. (नाथरा), पिंपरी बुद्रुक गण व पांगरी गटात भाजपचा पराभव  
- बबनराव लोणीकर, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री, (लोणी), कोकाटे हदगाव गण व गोळेगाव गटावर भाजपचा विजय  
- संभाजी पा. निलंगेकर (निलंगा) कामगार मंत्री, औराद शहाजानी गण, गटावर भाजप विजयी  
- अर्जुन खोतकर, वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धविकास राज्यमंत्री (गाढे सावरगाव), भाटेपुरी गण, कारला गटावर सेनेचा विजय
 
योगायोग : राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा भाजपने घेतल्या
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मराठवाड्यात भाजप नंबर १ चा पक्ष ठरला आहे. मागील टर्मला (२०१२) राष्ट्रवादी १३२ जागा घेऊन मराठवाड्यात पहिल्या स्थानावर होता. या वेळी भाजपने १३२ जागांवर विजश्री खेचली आहे.
 
मागील आणि या टर्मची भाजप अन् राष्ट्रवादीच्या एकूण सदस्य आकड्यांची अदलाबदल झाली आहे. अन्य पक्षीय बळ असे. कंसात मागील टर्मची संख्या. काँग्रेस ९८ (११८), राष्ट्रवादी ११८(१३२), शिवसेना ८५ (१०४), भाजप १३२(६५) इतर २७(३१) आणि एकूण जिल्हा परिषद सदस्य ४६० (४५०). 
बातम्या आणखी आहेत...