आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस- राष्ट्रवादीला हद्दपार करा: मुनगंटीवार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खुलताबाद - भाजपवर आरोप करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यातून हद्दपार करा, असे प्रतिपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ते खुलताबाद येथे आयोजित भाजपच्या गट- गणातील उमेदवारांच्या प्रचारार्थ सभेत मंगळवारी बोलत होते. या वेळी आमदार प्रशांत बंब, गदाना गटाचे उमेदवार प्रा. सुरेश सोनवणे, बाजारसावंगी गटाचे उमेदवार एल. जी. गायकवाड, वेरूळ गटाच्या उमेदवार हिंदवी खंडागळे यांच्यासह गणांतील उमेदवारांची उपस्थिती होती.    

काँग्रेस- राष्ट्रवादी हे पक्ष खोटारडे असून ते भाजपविरोधात मुस्लिम बांधवांना भडकावतात. या पक्षांना आता ग्रामीण भागातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांतून हद्दपार करा. आघाडीच्या काळात ग्रामीण भागासाठी त्यांच्यापेक्षा आम्ही अडीच वर्षांत सर्वाधिक निधी दिला असून शेतकरी हा केंद्रबिंदू मानून योजना तयार करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. सध्या मुख्यमंत्री भाजपचा, भागातील आमदार भाजपचा, मग तुम्ही काँग्रेस - राष्ट्रवादीवाल्याकडे कशाला जाता रस्ता मागायला.
 
मतदारांनी विकासाच्या बाजूने राहून विकासालाच साथ द्यावी, असे आवाहन मुनगंटीवार यांनी केले. शेतकऱ्यांची सर्वात मोठी फसवणूक आघाडीच्या काळात झाली आहे. त्यामुळे सी फॉर काँग्रेस तसेच सी फॉर चिटिंग म्हटले तर वावगे ठरणार नाही, असा टोलाही मुनगंटीवार यांनी लगावला.  काँग्रेसच्या राज्यात शेतकऱ्यांसाठी १३ हजार ५ कोटी शेवटचा आकडा आहे. आणि भाजपने मागच्या वर्षी २६ हजार ९८१ कोटी दुप्पट पैसा शेतकऱ्यांच्या योजनांसाठी ठेवला, असे प्रतिपादन मुनगंटीवार यांनी केले.  
 
या वेळी आमदार बंब व उमेदवार प्रा. सुरेश सोनवणे यांच्या उपस्थितीत हजारो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपच्या वतीने निवडणुकांचा जाहीरनामा मतदारांसमोर मांडत आगामी काळात मोठ्या प्रमाणावर विकासकामांसाठी निधी खेचून आणणार असून अर्थमंत्री येथे आल्याने आता आपल्याला विकासाची चिंता नसल्याचेही उमेदवारांनी भाषणात सांगितले.
बातम्या आणखी आहेत...