आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sudhir Rasal Speech On Marathi Literature In Aurangabad

सांस्कृतिक एकात्मतेसाठी भाषांतर चळवळ आवश्यक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - युरोपात एका भाषेच्या साहित्यातील असंख्य प्रवाह अन् परिणाम दुसर्‍या भाषेतील साहित्यावर होतात. त्यातूनच संपन्न युरोपीय वाड्मयीन कूळ तयार झाले आहे. दुर्दैवाने भारतीय भाषांतील वाड्मयाचे फार कमी आदान-प्रदान झाले. त्यामुळेच आजही भारतीय वाड्मयीन कूळ अस्तित्वात नाही. सांस्कृतिक-राजकीय एकात्मतेसाठी आणि अस्सल भारतीय साहित्यातील नवनवीन प्रवाहांसाठी असे कूळ आवश्यक आहे. त्यासाठीच देशात भाषांतराची चळवळ मोठय़ा प्रमाणावर राबविणे आवश्यक असल्याचे मत प्रख्यात समीक्षक सुधीर रसाळ यांनी व्यक्त केले.

राज्य शासनाच्या जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड झाल्याचे अधिकृत पत्र रसाळ यांना नुकतेच प्राप्त झाले. मराठवाड्यातील ज्येष्ठ आणि विख्यात समीक्षकाशी ‘दिव्य मराठी’ने यानिमित्त संवाद साधला आणि रसाळ यांनीही साहित्यापासून राजकारणापर्यंत विविध विषयांवर परखड मते व्यक्त केली.

गेल्या 56 वर्षांच्या वाड्मयीन सेवेची पावती मिळाली, याचा आनंद झाल्याचे सांगून सुधीर रसाळ म्हणाले, 1957 पासून साहित्यविषयक लेखन, समीक्षा लेखन, संपादन तसेच वेगवेगळे उपक्रम सुरू आहेत. साहित्य परिषदेचा कार्यवाह व अध्यक्ष, तर मराठी साहित्य मंडळाचा अध्यक्ष म्हणूनही काम करण्याची संधी मिळाली. शिक्षक म्हणून केलेल्या कार्याचीही दखल घेण्यात आली व आदर्श शिक्षक म्हणून गौरविण्यात आले. मात्र निझाम राजवटीमुळे माझे दहावीपर्यंत मराठीचे रीतसर शिक्षण झाले नाही. त्याकाळी आठवीला ऐच्छिक विषय घ्यावा लागे आणि मी गणित ऐच्छिक विषय घेतला होता. त्यामुळे मराठीचे शिक्षण शाळेतून खंडित झाले. मात्र घरात वाड्मयीन वातावरण होते. वडील स.भु.मध्ये शिक्षक तसेच लेखक होते. वा. रा. कांत यांच्यासारखी साहित्यिक मंडळी घरी येत होती, पुस्तके येत होती. म्हणून वाचनही भरपूर झाले. ‘बीए’ला उस्मानिया विद्यापीठात दुसरा, तर ‘एमए’ला पहिला क्रमांक मिळाला. या काळात म. भि. चिटणीस, डॉ. नांदापूरकर, डॉ. भगवंत देशमुख, भालचंद्र कहाळेकर यासारख्या नामवंतांचे मार्गदर्शन मिळाले. पुढे 1957 ते 60 पर्यंत शहरातील शासकीय महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून, तर 60 ते 94 पर्यंत विद्यापीठामध्ये विभागप्रमुखापर्यंत विविध पदांवर कार्य केले याबद्दल रसाळ यांनी समाधान व्यक्त केले.

निर्मितीचा प्रांत आपला नाही : सुरुवातीच्या काळात काही कथा प्रसिद्ध झाल्या; पण साहित्य निर्मिती हा आपला प्रांत नाही, हे लवकरच कळाले आणि मी समीक्षेकडे वळलो, असे रसाळ म्हणाले. समीक्षा ही ज्ञानशाखा आहे आणि समीक्षण हे एक बौद्धिक कार्य आहे. अर्थातच, जसा वाड्मय निर्मितीचा आनंद आहे तसाच समीक्षेचाही. समीक्षेला लोकप्रियता नसली तरी वाड्मयशास्त्र समजून घेण्यासाठी समीक्षा महत्त्वाचीच आहे, असे ते म्हणतात.

वाचकसंख्या कमी झालेली नाही : संपूर्ण जगामध्ये करमणूक प्रधान साहित्य वाचणार्‍यांची संख्या नेहमीच जास्त होती आणि आहे. शेक्सपियर किंवा ज्ञानेश्वरी वाचणारे किती आहेत? पण हॅरी पॉटर वाचणार्‍यांची संख्या फार मोठी आहे. अलीकडे शहरांमधील करमणूकप्रधान साहित्याचा वाचक कमी झाला. विशेषत: स्त्रीवाचकांची संख्या लक्षणीय घटली. मात्र त्याचवेळी ग्रामीण भागातील नवशिक्षितांचे प्रमाण वाढले आणि हा वर्ग साहित्याकडे वळला आहे. त्यामुळेच वाचकांची कमी झालेली संख्या जाणवत नाही. मात्र गंभीर वाचक पूर्वीही कमीच होता व आजही र्मयादितच आहे. तरीही पाश्चात्त्य देशात गंभीर वाचकांची संख्या तुलनेने जास्त असल्याचे रसाळ म्हणतात.

भाषांतराचा शॉर्ट टर्म अभ्यासक्रम सुरू करा

आज दुसर्‍या भारतीय भाषेतून मराठीत भाषांतर होणारे साहित्य अत्यल्प आहे. या भाषांतर चळवळीचा प्रसार फार मोठय़ा प्रमाणावर होणे गरजेचे आहे. त्यासाठी विद्यापीठामध्ये इंडियन लँग्वेज डिपार्टमेंट निर्माण होणे गरजेचे आहे. त्याद्वारे भाषांतराचे शॉर्ट टर्म कोर्सेस सुरू केले पाहिजेत. दुर्दैवाने नेहरूंनी दूरदृष्टीने सुरू केलेल्या नॅशनल बुक ट्रस्ट या संस्थेचा व्यापक विकास होऊ शकला नाही. आजघडीला सरकार कल्याणकारी पॅटर्न राबवण्याऐवजी सरळ सरळ अमेरिकन पॅटर्न राबवते आहे आणि त्यामुळे देशात अनेक गहन-गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याची खंतही रसाळ यांनी बोलून दाखवली.