आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शक्य तोवर सहन करू; जमलेच नाही तर एक घाव दोन तुकडे...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद : भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष सत्तेत एकत्र आहेत खरे, पण त्यांच्यातील नाते सवतीपेक्षाही बेकार आहे. आम्हीही शक्यतोवर सहन करू नाहीच जतले तर एका घावात दोन तुकडे करून मोकळे होऊ. सन्मानाने जगू लाचारी पत्करणार नाही, असा खणखणीत इशारा शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी दिला. 
 
संत तुकाराम नाट्यगृह सभागृहात गुरुवारी आयोजित शिवसंग्रामच्या वर्धापन दिन सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी शिवसंग्रामच्या वर्सोवाच्या आमदार डॉ.भारती लव्हेकर, प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रकाश पोकळे, शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष किशोर चव्हाण, सलीम पटेल, बाबूराव पवार, दिलीप गोरे, प्रकाश पोकळे, बाळासाहेब दौडतले व्यासपीठावर उपस्थित होते. 
 
या वेळी आमदार मेटे यांनी अनेकांवर तोफ डागली. ते म्हणाले, नियोजित शिवस्मारक हे जगातील एक आश्चर्य ठरणार आहे. नवीन इतिहास घडून पाहतोय. एक किल्ला निर्माण होणार आहे. मी शिवस्मारक समितीचा अध्यक्ष असूनही शिवस्मारकाच्या भूमिपूजनप्रसंगी मला डावलले, याचे दु:ख वाटते, ती बोच कायम राहील. 
 
राजकीय विजनवासात असणारे राज ठाकरे चर्चेत राहण्यासाठी खर्चावरून विधान करून मोकळे झाले. खासदार शरद पवार यांना जितेंद्र आव्हाड मुंब्रा येथे घेऊन गेले होते. तेथे पवारांनीही खर्चाचा ताळमेळ नसल्याचे विधान केले.
 
 महाराज हे भाजपचे नाहीत ते सर्वांचे आहेत. महाराजांचे नाव घेतले की ती बातमी बनते. त्यामुळे ते नाव घेतात हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. दरम्यान, मुख्यमंत्री म्हणतात, सर्व निर्णय दिल्लीतून घेतले जातात.
 
आम्हाला युती करताना भरभरून पाने लिहून दिली, एकही आश्वासन त्यांनी पाळले नाही.दिल्लीसह राज्यातील सरकार हे लबाडांचं सरकार आहे, अशी टीका शिवसंग्रामचे प्रदेश अध्यक्ष तानाजी शिंदे यांनी केली.
 
उद्घाटनप्रसंगी गोंधळ : आकाशवाणी चौकातील मराठा क्रांती माेर्चाच्या कार्यालयाचे गुरुवारी युवती, महिलांच्या हस्ते उद्घाटन  झाले. राज्यातील हे पहिले कार्यालय असून मुंबईतील मोर्चाची सूत्रे येथूनच हलवली जाणार आहेत. आमदार मेटे या कार्यक्रमात भाषणासाठी उभे राहताच कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. 
 
थोडे पुढे बसा : आम्ही माणसं जोडली, परंतु राजकीय गणित जुळवण्यात कमी पडलो. लबाडांच्या पंगतीत बसायचे असेल तर थोडे पुढे बसा, असा सल्ला मेटे यांना दिला. 
 
आम्ही १५ दिवसांत नवीन राजकीय पक्षाची घोषणा करू. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत त्या-त्या भागात कार्य असणाऱ्या पक्षाला जास्त जागा द्याव्यात. शिवसंग्रामसह रासप, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका लवकरच जाहीर करू, असेही मेटे म्हणाले. 
 
आरक्षण हवेच, तडजोड स्वीकारणार नाही 
मराठा समाजासह धनगर आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा आहे. आरक्षण मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही. ज्यांच्यामुळे मिळू शकेल त्यांच्यासोबत जाऊ, त्यासाठी कुणाला विरोध करण्याची वेळ आली तर तेही करू, तडजोड स्वीकारणार नाही, असेही त्यांनी सांगितले. 
 
 - शिवसंग्रामच्या मेळाव्यात अनेकांवर डागली तोफ 
-  शिवसेना अन् भाजपचे नाते सवतीपेक्षाही बेकार : आमदार मेटेंचा घणाघात 
 
बातम्या आणखी आहेत...