आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऊसदर आंदोलन पेटणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज- मागील वर्षीचे अंतिम बिल दिल्याशिवाय व चालू वर्षाचा भाव जाहीर केल्याशिवाय उसाला कोयता लावू देणार नाही, असा एकमुखी निर्णय गंगापूर तालुक्यातील ऊसउत्पादक शेतकर्‍यांनी वाळूज येथील बैठकीत नुकताच घेतला आहे. त्यामुळे उसाच्या भावासाठीचे आंदोलन पेटण्याची चिन्हे आहेत.

वाळूज कामगार कल्याण केंद्र इमारतीच्या सभागृहात गंगापूर तालुक्यातील ऊसउत्पादकांची बैठक सकाळी साडेअकराला घेण्यात आली. मागील वर्षी दुष्कळ व पाणीटंचाईमुळे बहुतेक ऊसउत्पादक शेतकर्‍यांनी ऊस लागवडीकडे पाठ फिरवली. त्यामुळे उसाच्या लागवडीचे क्षेत्र घटले आहे. याचा अप्रत्यक्ष फटका यंदाच्या गळीत हंगामात साखर कारखान्यांना बसणार आहे. वाळूज, शेंदुरवादा परिसरात ऊस नेण्यावरून मोठी स्पर्धा होण्याची चिन्हे आहेत.

चांगल्या भावाची अपेक्षा

अत्यल्प पर्जन्यमानामुळे उसाचे क्षेत्र घटले आहे. हीच परिस्थिती सावखेडा, शेंदुरवादा, तुर्काबाद खराडी, कायगाव, जामगाव, दहेगाव परिसरातही आहे. या उसावर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा डोळा आहे, तर गंगापूर कारखाना बंद असल्याची संधी साधून धामोरीच्या मुक्तेश्वर शुगर इंडस्ट्रीज प्रा.लि.या कारखान्याने 2012-2013 या गळीत हंगामात ऊस नेला. मात्र, कमी भाव दिल्याने ऊस उत्पादक शेतकरी नाराज आहेत. त्यामुळे, ऊसउत्पादक शेतकर्‍यांनी यंदा ऊस दराबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे.

बैठतील ठराव

मुक्तेश्वर शुगर इंडस्ट्रीज प्रा.लि.साखर कारखान्याने मागील वर्षीचे अंतिम बिल जाहीर करावे. चालू हंगामात काय भाव देणार, हेही जाहीर करावे. इतर कारखान्यांनी चालू हंगामात पहिला हप्ता किती देणार याची घोषणा करावी, तरच उसाला कोयता लावावा, नसता, कोणत्याही कारखान्यास एक टिपरूही दिले जाणार नाही. ऊसउत्पादकांच्या बैठकीला विविध कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. शेतकर्‍यांनी मांडलेले मुद्दे व सूचना त्यांनीही लक्षात घेतल्या. गंगापूर साखर कारखान्याचे संचालक नंदकुमार गांधिले, बबनराव गायकवाड, उदय चव्हाण, विष्णू सटाले, कल्याण गायकवाड यांनी ऊसउत्पादकांचे प्रश्न मांडले. या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल सटाले, बाबासेठ गंगवाल,रामकृष्ण गायकवाड, कैलास शेंगुळे, राजू सूर्यवंशी, संतोष बोहरा, सुदाम हुले, कैलास बिलवाल, नानासाहेब आरगडे, एकनाथ साबळे, साहेबराव पवार, दत्तात्रय कदम, अंकुश काळवणेंसह साडेपाचशेंवर शेतकरी उपस्थित होते.


सहा नोव्हेंबरला इसारवाडी फाट्यावर शेतकर्‍यांची बैठक
ऊसउत्पादकांची पुढील बैठक 6 नोव्हेंबरला दहेगाव बंगल्यानजीकच्या इसारवाडी फाट्यावर सकाळी दहाच्या सुमारास आयोजित केली आहे. वाळूज, सावखेडा, शेंदुरवादा, कायगाव, तुर्काबाद खराडी, गाजगाव, जामगाव परिसरातील ऊसउत्पादक शेतकरी मोठय़ा प्रमाणावर उपस्थित राहणार असल्याचे या वेळी संयोजकांतर्फे सांगण्यात आले.

पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखाने ऊस पळवण्याच्या तयारीत
यंदा उसाचे क्षेत्र घटले आहे. साखर कारखान्यांना पुरेसा ऊस मिळणे दुरापास्त होणार आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रासह जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊस पळवण्यासाठी कंबर कसली आहे. जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील कारखान्यांनी परिसरात तंबू ठोकले आहेत. या पळवापळवीमुळे ऊसउत्पादक बागायतदारांचे मात्र, कधी नव्हे, एवढे ‘वजन’ वाढल्याचे दिसून येत आहे.