आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेशनच्या साखरेची चव गोड होईना; दोन महिन्यांपासून औरंगाबादकर हैरान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शासनाच्या आदेशानुसार स्वस्त धान्य दुकानांसाठी साखर देणे बंधनकारक असले तरी काही कारखाने हा आदेश पाळत नाहीत. त्यामुळे औरंगाबादकरांना ही साखर अधूनमधूनच मिळते. दोन महिन्यांचा कोटा अजून प्राप्त झालेला नसून जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा कारवाईचा इशारा दिला आहे.

रमजानच्या महिन्यातही औरंगाबादकरांना साखर मिळाली नव्हती. त्यानंतर काही कारखान्यांनी कोटा दिल्याने काही दिवस साखर आली आणि नागरिकांना याची माहिती होण्यापूर्वीच ती संपली. गणपतीच्या काळात ही साखर मिळण्याची शक्यता होती. मात्र तसे झाले नाही. जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचा कोटा कारखान्यांनी थकवल्यामुळे या महिन्यात स्वस्त धान्य दुकानांवर साखर उपलब्ध नाही. याप्रकरणी पत्रव्यवहार करण्यात येत असून संबंधितांवर कारवाईची शिफारस करण्यात आल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी संजीव जाधवर यांनी सांगितले. यापूर्वीही सहा कारखान्यांविरुद्ध कारवाईची शिफारस प्रशासनाने केली होती. सहकार आयुक्तांच्या आदेशाला केंद्र शासनाकडून स्थगिती देण्यात आली. प्रत्यक्ष कारवाई होत नसल्याने कारखानदार साखर देण्यास चालढकल करतात. साखरेचा पुरवठा केल्यानंतर शासनाकडून मोबदला देण्यास विलंब होतो हेही साखर न देण्याचे प्रमुख कारण आहे.