आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साखर सहसंचालकांना चपलांचा हार, हक्काच्या मोबदल्याच्या रकमेची प्रतीक्षा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- माजीमंत्री बबनराव पाचपुते यांच्या हिरडगाव येथील साईकृपा फेज-२ या खासगी कारखान्याकडे असलेला थकीत एफआरपी मिळावा, या मागणीसाठी जामखेड तालुक्यातील संतप्त शेतकऱ्यांनी सलग तिसऱ्या दिवशी आंदोलन केले.
साखर सहसंचालक मिलिंद भालेराव यांना चपलांचा हार घालण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला. गेल्या हंगामातील एफआरपीची थकीत रक्कम मिळावी, या मागणीसाठी शेतकरी आंदोलन करत आहेत. दिलगिरी व्यक्त करून येत्या डिसेंबरपर्यंत थकीत रक्कम देण्याचे आश्वासन कारखाना प्रशासनाकडून देण्यात आल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

साईकृपाला गेल्या हंगामात ऊस दिलेल्या, मात्र एफआरपीची रक्कम मिळालेल्या जामखेड तालुक्यातील नायगाव, घोडेगाव येथील शेतकऱ्यांनी १८ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. १९ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहन करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मात्र, प्रश्न मार्गी लागत नसल्याचे लक्षात येताच आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी त्यांनी येथील साखर सहसंचालक कार्यालय गाठले. थकीत एफआरपी तातडीने देण्याची मागणी करत संतप्त शेतकऱ्यांनी साखर सहसंचालक भालेराव यांना चपलांचा हार घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलक त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली. भालेराव यांनी कारखान्याच्या विरोधात कार्यालयाकडून झालेली कार्यवाही सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. दरम्यान, विक्रमसिंह पाचपुते यांनी दिलगिरी व्यक्त करणारे येत्या डिसेंबरपर्यंत थकीत एफआरपी देण्याचे लेखी आश्वासन इ-मेलद्वारे सहसंचालक कार्यालयात पाठवले. त्यानंतर आंदोलकांनी पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषणस्थळी दाखल होत आंदोलन स्थगित करत असल्याचे जाहीर केले. आश्वासनानुसार थकीत रक्कम मिळाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. कांतिलाल उगले, हनुमंत उगले, जयसिंग उगले, आश्रू उगले, संभाजी डिसले, राजेंद्र उगले, भागचंद उगले, शिवाजी उगले, राहुल उगले, शिवाजी डिसले, बापूसाहेब राऊत यांच्यासह दोन्ही गावांतील ऊस उत्पादक शेतकरी यावेळी उपस्थित होते.

साईकृपा फेज- कारखान्याने गेल्या हंगामात लाख ६० हजार ५५१ टन उसाचे गाळप केले. गाळप झालेल्या उसाच्या मोबदल्यापोटी तोडणी वाहतूक खर्च वजा जाता प्रतिटन १५९६ रुपये ८१ पैसे कारखान्याने ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना अदा करणे बंधनकारक होते. गाळप उसाचा एकूण एफआरपी ८९ कोटी ५० लाख ९३ हजार रुपये होतो. ऊस दर नियंत्रण आदेशानुसार गाळपासाठी ऊस गेल्यानंतर १५ दिवसांच्या आत एफआरपी शेतकऱ्याला अदा करणे कारखान्यांना बंधनकारक आहे. मात्र, साईकृपा कारखान्याने एकूण एफआरपीच्या तुलनेत ५२ कोटी २१ लाख ६३ हजार रुपये अदा केले. ३७ कोटी २९ लाख ३० हजार रुपये थकीत आहेत. गेल्या वर्षभरापासून ही रक्कम थकीत आहे. कारखान्याला ऊस दिलेल्या शेतकऱ्यांनी गेल्या सहा ते आठ महिन्यांपासून आंदोलनाला सुरुवात केली. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पाचपुते यांच्या निवासस्थानासमोर, तसेच श्रीगोंदे तहसील कार्यालयासमोर आंदोलने केली. मात्र, उपयोग झाला नाही.

साडेतीन महिन्यांपूर्वी साखर आयुक्तांनी कारखान्याची मालमत्ता विकून थकीत एफआरपी अदा करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी श्रीगोंदे तहसीलदारांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्तीही केली. तहसीलदारांकडून कार्यवाहीची नोटीस कारखाना प्रशासनाला बजावण्यात आली. मात्र, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी साखर आयुक्तांच्या आदेशाला २९ सप्टेंबरपर्यंत स्थगिती दिली. यासंदर्भातील सहकारमंत्र्यापुढील सुनावणी नोव्हेंबरला झाली. कार्यवाहीला त्यानंतर स्थगिती मिळाली नसली, तरी प्रशासनाने मालमत्ता विक्रीसाठीची कार्यवाही थांबवली आहे. दुसरीकडे सॉफ्ट लोनच्या माध्यमातून थकीत एफआरपी अदा करण्याचा प्रयत्न कारखान्याकडून सुरू असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, हा प्रयत्नही फोल ठरला. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रशासनाला लक्ष्य केले असून थकीत रक्कम मिळाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

प्रशासनाचीच चूक
साखरआयुक्तांच्या आदेशाप्रमाणे प्रशासनाने कारखान्याची मालमत्ता विकून थकीत एफआरपी अदा करणे आवश्यक होते. मात्र, कार्यवाहीवरील स्थगितीची मुदत संपूनही प्रशासनाने मालमत्ता विक्रीची प्रक्रिया थांबवली. परिणामी वर्षभरापासून हक्काच्या पैशांची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध तुटत आहे. यातून उद्भवलेल्या भविष्यात उद्भवणाऱ्या परिस्थितीला प्रशासनच जबाबदार आहे. अनिलघनवट, शेतकरीसंघटना.

एफआरपीची स्थिती
गतहंगामातील गाळप ऊस : ५,६०,५५१ टन
एफआरपीची रक्कम : ८९,५०,९३,००० रुपये
अदा केलेली रक्कम : ५२,२१,६३,००० रुपये
थकीत एफआरपी : ३७,२९,३०,००० रुपये
थकीत रकमेची टक्केवारी : ४१.६६ टक्के

दुष्काळात त्रास
गेल्यावर्षीदुष्काळी परिस्थिती असताना पोटच्या मुलांप्रमाणे ऊस वाढवला. गेल्या वर्षभरापासून आज ना उद्या उसाची थकीत रक्कम मिळेल, या अपेक्षेत होतो. आतापर्यंत चारदा आंदोलने केली. मात्र, थकीत रक्कम मिळाली नाही. यंदा गेल्यावर्षीपेक्षा अधिक बिकट परिस्थिती आहे. पिण्याच्या पाण्याची बोंबाबोंब असून दोन्ही हंगाम वाया गेले आहेत. या पार्श्वभूमीवर तातडीने पैसे मिळणे आवश्यक आहे.'' देवसिंगउगले, आंदोलक.

पाचपुतेंची दिलगिरी
आंदोलकांनीशुक्रवारी दुपारी बारा वाजता साखर सहसंचालक कार्यालयात पोहचून घंटानाद धरणे आंदोलन केले. आंदोलकांच्या संतप्त भावना कारखान्याचे सर्वेसर्वा विक्रमसिंह पाचपुते यांच्यापर्यंत पोहचवण्यात आल्या. त्यांनी तातडीने इ-मेल पाठवून दिलगिरी व्यक्त केली. पाचपुते यात म्हणतात, "माझ्याकडून शेतकऱ्यांना जो त्रास झाला, त्याबद्दल दिलगिर आहे. थकीत रक्कम डिसेंबरपर्यंत अदा केली जाईल.'

कारखाना यंदा बंदच
नगरजिल्ह्यातील २२ सहकारी खासगी साखर कारखान्यांमध्ये साईकृपा फेज-२ या कारखान्याची दररोजची गाळप क्षमता सर्वाधिक आहे. दररोज ७५०० मेट्रिक टन ऊस गाळप करण्याची या कारखान्याची क्षमता आहे. जिल्ह्यातील सर्व खासगी कारखान्यांचे गाळप सुरू झाले असले, तरी या कारखान्याचे गाळप अजूनही सुरू झालेले नाही. या गळ‌ीत हंगामात हा कारखाना बंद राहण्याचीच शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पाचपुतेंना मिळेना मदत
अडचणीतअसलेल्या कारखान्यांची अडवणूक होत असल्याचे कारण पुढे करून बबनराव पाचपुते यांनी सव्वा वर्षापूर्वी राष्ट्रवादीला रामराम ठोकला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार अजित पवार यांच्याकडून अडवणूक झाल्याचे पाचपुते यांनी त्यावेळी म्हटले होते. भाजपात प्रवेश करून त्यांनी विधानसभाही लढवली. मात्र, त्यांचा पराभव झाला असला तरी भाजप सर्वाधिक जांगा जिंकत सत्ताधारी पक्ष बनला. सहकार खातेही भाजपकडेच आहे. मात्र, पाचपुते यांच्या अडचणीत पूर्वीपेक्षा अधिक वाढ झाल्याचे चित्र आहे.

वर्गणीतून आंदोलन
सलगदुष्काळाने परिसरातील शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. यंदा एकही पीक हाती लागले नाही. त्यामुळे हक्काचे पैसे तातडीने मिळण्याची आवश्यकता आहे. आंदोलनाला येण्यासाठीही अनेकांकडे पैसे नव्हते. त्यामुळे वर्गणी करून आंदोलनासाठी पैसे उभारण्यात आले. आश्वासनानुसार आता पैसे मिळाले नाहीत, तर आत्मदहन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही.'' संतोषपवार, आंदोलक.