आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साखरेचे उत्पादन वाढले, चार धुराडे थंडावले, संत एकनाथ १० दिवस चालणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करमाड - ऊस गळीत हंगाम संपल्याने जिल्ह्यातील चार साखर कारखान्यांनी आपले धुराडे बंद केले आहे. या साखर कारखान्यांनी मागच्या वर्षीच्या तुलनेत उसाचे पावणेतीन, तर साखरेचे तीनपट जास्तीचे उत्पादन करून एक विक्रम प्रस्थापित केला अाहे.

या वर्षी जिल्ह्यातील छत्रपती संभाजी औरंगाबाद, मुक्तेश्वर शुगर गंगापूर, बारामती अॅग्रो कन्नड, सिद्धेश्वर सहकारी सिल्लोड व पैठणच्या संत एकनाथ सचिन घायाळ या पाच साखर कारखान्यांनी ऊस गाळपास प्रारंभ केला होता. पैठणचा संत एकनाथ सचिन घायाळ वगळता वरील चार कारखान्यांनी ११ मार्च ते ११ एप्रिल दरम्यान कार्यक्षेत्रातील ऊस संपल्याने आपले गाळप बंद केले. कार्यक्षेत्रात ऊस शिल्लक असल्याने अजून काही दिवस संत एकनाथ सचिन घायाळचा गळीत हंगाम चालण्याची शक्यता आहे. मागच्या वर्षी जिल्ह्यातील सिद्धेश्वर, मुक्तेश्वर, बारामती अॅग्रो व छत्रपती संभाजी हे कारखाने ५० ते ९७ दिवस चालून त्यांनी एकूण ५ लाख ४८ हजार ९८२ टन उसाचे गाळप केले.

यातून ५ लाख ९ हजार ९६० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन होऊन साखर उतारा सरासरी ९.२८ टक्के आला. वरील चार साखर कारखान्यांसोबत पैठणच्या सचिन घायाळ शुगर्सने या वर्षी ऊस गाळपास प्रारंभ केला. या पाच कारखान्यांनी १७ एप्रिलपर्यंत १४ लाख ७४ हजार ४२५ मेट्रिक टन उसाचे गाळप करून १५ लाख ६ हजार ६५१ क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन केलेले आहे.

साखर उतारा १०.२२ टक्के आला असून पैठण वगळता इतर चार कारखान्यांनी ११ एप्रिलपूर्वीच आपल्या कारखान्यांचे धुराडे बंद केले आहे. उसाचे क्षेत्र वाढल्याने यावर्षी साखर कारखान्यांना मार्च अखेरपर्यंत कारखाने चालवावे लागले. मागच्या वर्षी फेब्रुवारीमध्येच कारखान्यांनी आपला गळीत हंगाम संपवला हाेता.

राज्यभरातील अर्ध्याहून अधिक साखर कारखाने बंद झाले असून पैठण येथील कारखान्याचा पट्टा पडल्याने आणखी शिल्लक असलेला २० हजार मेट्रीक टन उसा प्रश्न पाहता कारखना आणखी दहा दिवस सुरू ठेवण्याचा निर्णय सचिन घायाळ शुगर्सचे चेअरमन सचिन घायाळ यांनी घेतल्याने पैठण तालुक्यातील उस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

साखर उत्पादन वाढण्याची प्रमुख कारणे
{मागच्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने उसाचे सरासरी २६८ टक्के क्षेत्र वाढले.
{उसाचे क्षेत्र वाढल्याने कारखान्यांना परिपक्व ऊस निवडीला वाव
{२६५ जातीचे वाण असलेला ऊस मिळाला.
{उताऱ्यात वाढ झाली.
{दुष्काळी परिस्थितीमुळे मुबलक प्रमाणात मजूर मिळाले.
अडचणी
साखरेचे भाव कमी असूनही उठाव नाही. त्यामुळे ऊसउत्पादक शेतकरी, ऊसतोड कामगार व कर्मचाऱ्यांना पैसे देण्यासाठी अडचणी होत्या.
मागच्या वर्षी साखरेचे भाव २९०० ते ३००० रुपये क्विंटल होते. यावर्षी २३५० रुपये भाव आहे.
मागच्या वर्षी मोलासिसची ५००० रुपये टनप्रमाणे विक्री झाली. यंदा २७०० रुपये टन भाव आहे.