आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दरवाजा तोडताच तिचा कोळसा झालेला मृतदेह दृष्टीस पडला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - घरातून खूप धूर येतोय म्हणून शेजारच्यांनी पोलिसांना फोन केला. दरम्यान, काहींनी दरवाजा तोडला तर आतमध्ये जळून खाक झालेला महिलेचा मृतदेह आढळून आला. ही घटना पुंडलिकनगरनजीकच्या हुसेन कॉलनीतील गल्ली क्रमांक पाचमध्ये शनिवारी सकाळी ११ वाजता घडली. रत्ना श्याम पगारे (४५) असे या महिलेचे नाव असून मुकुंदवाडी ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हुसेन कॉलनीत मेहमूद पठाण यांचे घर आहे. त्यांच्या घरात पहिल्या मजल्यावर रत्ना पगारे राहत होती. शनिवारी सकाळी तिचे नवऱ्यासोबत भांडण झाले. भररस्त्यात भांडण झाल्याने ती अपमानित झाली. रागाच्या भरात घरात जाऊन तिने अंगावर रॉकेल टाकून जाळून घेतले. अगदी दहा बाय दहाची खाेली. खिडकीतून धूर येत होता. ही घटना पाहणाऱ्या लोकांना वाटले घरात गॅस सिलिंडर फुटले असावे. घराचा दरवाजा तोडला तेव्हा ती पलंगावर पडलेली होती. लोकांनी तिला विझविण्याचा प्रयत्न केला. पण ती गंभीर भाजली होती. जवाहरनगरचे हवालदार एस. बी. जाधव आणि सहायक फौजदार हिवाळे यांनी तिला घाटीत दाखल केले. पोलिस निरीक्षक नाथा जाधव आणि उपनिरीक्षक हारुण शेख यांनी घटनेचा पंचनामा केला.

या गोष्टी संशयास्पद
एक महिन्यापूर्वीच रत्ना हिने हे घर भाड्याने घेतले होते. तिचा नवरा वाहनचालक आहे. मात्र, तो घरी जास्त फारसा येत नव्हता. उद्याच्या रविवारी ती घर सोडून दुसरीकडे राहण्यासाठी जाणार होती. तसे रूममालकालाही सांगितले होते. पठाण यांच्या पहिल्या मजल्यावर लागून तीन खोल्या आहेत. त्यामध्ये भाडेकरू राहतात. रत्नाने पेट घेतला तेव्हा तिने आरडाओरड केली. पण तिच्या मदतीला कोणीच गेले नाही. तिने स्वत:हून अंगावर रॉकेल ओतले की हा घातपाताचा प्रकार आहे, अशी शंका येथील लोकांनी उपस्थित केली.

घाटीत मृतदेह पडून...
मुकुंदवाडी पोलिसांकडे व्हॅन नव्हती म्हणून जवाहरनगर पोलिसांनी तिचा मृतदेह घाटीत आणला. मात्र, तिच्यासोबत कोणीही नातेवाईक नव्हते. पतीचा फोन बंद होता. त्यामुळे तिची ओळख पटेना. तब्बल एका तासानंतर मुकुंदवाडी ठाण्याचे कर्मचारी आले आणि त्यानंतर प्रक्रिया सुरू झाली.