आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: MIDC वाळूज पोलिस स्टेशनच्या लॉक-अपमध्ये आरोपीची गळफास घेऊन आत्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाईल) - Divya Marathi
(फाईल)
औरंगाबाद - एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्‍यातील कोठडीत एका आरोपीने गळफास घेऊन आत्‍महत्‍या केल्‍याची घटना बुधवारी सांयकाळी साडेसातच्‍या सुमारास घडली. गणेश रमेश नेमाने असे आरोपीचे नाव आहे. महिलेच्या गळ्यातील मनीमंगळसूत्र हिसकावून पळून जाण्‍याचा प्रयत्‍न करणा-या या आरोपीला नागरिकांनी पकडून एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याच्या पोलिसांच्या स्वाधीन केले होते.

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी (दि.१३) रोजी सायंकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास बजाजनगर परिसरातील सुलोचना खारणार (रा. इंद्रप्रस्थ कॉलनी आर.एम.१६२ बजाजनगर) ही महिला आपल्या पतीसह जेवणानंतर शतपावली करत होती. त्याच वेळी दुचाकीवर आलेल्या एका अनोळखी व्यक्तीने त्‍यांच्‍या गळ्यातील मनी गंठण हिस्कावून पळ काढला. त्यानंतर काही अंतरावरच असलेल्या त्रिमुर्ती शाळेजवळ लता वराडे या महिलेच्‍याही गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून एका दुचाकी स्वाराने पळ काढला. यावेळी मदतीला हाक मारल्यानंतर काही नागरिकांनी गणेश रमेश नेमाने (२८,राजळगाव सपकाळ ता. भोकरदन जि.जालना) या दुचाकीस्वारास पाठलाग करून पकडले व पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी दोन्ही महिलांना बोलवून मुद्देमाल व आरोपीची ओळख परेड केल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान आज बुधवार रोजी रात्री साडेसात वाजेच्या दरम्यान आरोपी गणेश नेमाने याने पोलिस कोठडीत असताना सतरंजीच्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली़. या प्रकारामुळे पोलिस ठाण्यात खळबळ उडाली. पोलिसांनी घटनेची माहिती बाहेर जाऊ नये याची खबरदारी घेण्याचा प्रयत्न करत होते़. त्यातून रात्री उशीरापर्यंत माहिती दडवून ठेवण्यात आली होती.
 
बातम्या आणखी आहेत...