आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद - कर्जाच्या गर्तेत अडकलेल्या आणि पत्नीच्या अनैतिक संबंधांच्या संशयावरून वैफल्यग्रस्त झालेल्या मित्रनगरातील तरुण हॉटेल व्यावसायिकाने रविवारी सायंकाळी तिसरी पत्नी, पाचवर्षीय मुलाला विष पाजले आणि त्यांचा गळा आवळून खून केला. त्यानंतर स्वत: विष प्राशन करून गळफास घेत आत्महत्या केली. हा प्रकार चार दिवसांनी, गुरुवारी (सहा फेब्रुवारी) दुपारी 12 वाजता उघडकीस आला. मनोज बाबूलाल जैस्वाल (35), नीता (27) आणि देवेंद्र (5) अशी या तिघांची नावे आहेत.
जालना रोडवरील आकाशवाणी केंद्राच्या मागील बाजूस देविदास गायकवाड यांचे दोन मजली घर आहे. त्यातील मागील बाजूंच्या तीन खोल्यांत मनोज, तिसरी पत्नी नीता आणि दुसर्या पत्नीपासून झालेला मुलगा देवेंद्रसह आठ महिन्यांपासून भाड्याने राहत होता. याच घराच्या दुसर्या मजल्यावर भाडेकरू राहतात. गुरुवारी दुपारी दुसर्या मजल्यावर राहणार्या महिलेला असहय़ दुर्गंधी येऊ लागली. हा काय प्रकार आहे, असे वाटल्याने ती महिला जैस्वालांच्या घराजवळ गेली.
न्यायवैद्यकच्या कर्मचार्यांकडून तपासणी
पोलिस निरीक्षक हेमंत कदम यांनी फौजफाट्यासह धाव घेतली. तेव्हा नीता, मनोजचा मृतदेह स्वयंपाक खोलीत, तर देवेंद्रचा बैठक खोलीत आढळला. दुपारी अडीचच्या सुमारास न्यायवैद्यकशास्त्र विभागाच्या कर्मचार्यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. त्यांनी केलेल्या तपासणीत नीताने डायक्लोरवोस 76 टक्के ईसी नुवान हे कीटकनाशक प्राशन केल्याचे स्पष्ट झाले. तिच्या नाकातोंडातून रक्त बाहेर पडले होते. तिच्या मृतदेहाजवळ रक्ताचे थारोळे साचले होते.
कुलूप तोडले, आतून कडी
जैस्वालांच्या घराजवळ दुर्गंधी येत असल्याची खात्री पटल्याने तिने आधी बाहेरील दरवाजाचे कुलूप तोडले. मात्र, मुख्य आणि स्वयंपाक खोलीकडील दरवाजालादेखील आतून कडी होती. यामुळे महिलेचा संशय आणखीनच बळावला. तिने या घटनेची माहिती घरमालक गायकवाड यांचा मुलगा अनिल यास दिली. त्यांनीही घराची पाहणी केली. काहीतरी भयंकर घटना घडली आहे, असे लक्षात येताच त्यांनी तत्काळ जवाहरनगर पोलिसांशी संपर्क साधत घटनेची माहिती कळवली.
0 दरवाजावर लिहिले पत्र
0घरातील दुर्गंधीनंतर संशय बळावला
घटनास्थळी तिसरा असण्याची शक्यता
जैस्वाल यांच्या बैठक खोलीत दोन वेगवेगळय़ा कंपनीच्या दारूच्या बाटल्या आणि दोन बिअरच्या बाटल्या होत्या. या खोलीत जैस्वाल कुटुंबीयांव्यतिरिक्त तिसरी व्यक्तीदेखील असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या ठिकाणी आढळलेल्या वेगवेगळय़ा दारूच्या बाटल्या आढळल्याने संशय व्यक्त होत आहे. देवेंद्र हा एका इंग्लिश शाळेत ज्युनियर केजीमध्ये शिक्षण घेत होता.
देणेकर्यांचा ससेमिरा टाळण्यासाठी..
मनोज जैस्वाल कर्जबाजारी असल्याने त्याच्या घरी बरेच जण पैसे मागण्यासाठी येत असावेत. त्यांचा ससेमिरा टाळण्यासाठीच त्याने घराच्या दरवाजावर ‘मी बंगलोरला जात आहे. दोन दिवसांत परत येणार आहे,’ असे लिहून ठेवले असावे. मात्र, हे हस्ताक्षर नेमके कुणाचे, याचा छडा लावल्यावरच ते खात्रीपूर्वक सांगता येईल, असेही पोलिसांचे म्हणणे आहे.
दोन मोबाइल सुरू, दोन बंद
दरम्यान, जैस्वालच्या घरात पोलिसांना पाच हजार तीनशे रुपये एका खिडकीत सापडले. शिवाय, चार मोबाइल संच होते. त्यापैकी दोन सुरू, तर दोन बंद होते. सर्व मोबाइलचे कॉल डिटेल्स मागवले जाणार आहेत. घटनेपूर्वी तो मोबाइलवरून कुणाशी काय बोलला याची माहिती तपासून पुढील तपास करणार असल्याचे पोलिस उपायुक्त अरविंद चावरिया यांनी सांगितले. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद जवाहरनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली असून खून आणि आत्महत्येचा गुन्हा तपासात दाखल केला जाईल, असे पोलिस निरीक्षक कदम म्हणाले. या तिघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आणण्यात आले होते.
हॉटेलचा सुरू होता सौदा..
मोंढा नाका सिग्नलजवळील (बालाजीनगरकडे जाणार्या रस्त्याच्या कोपर्यावर) अँड. श्रीचंद जग्यासी यांची राहूल हॉटेल दोन वर्षांपासून बंद आहे. ते चालविण्याबाबत चार महिन्यांपूर्वी जग्यासी आणि मनोजमध्ये व्यवहार झाला होता. याठिकाणी लेडिस सर्व्हिस बार मनोजला सुरू करायचा होता. यासाठी जग्यासी यांना मनोजने सुमारे दहा लाख रुपये दिले होते. आणखी रक्कम द्यायची असल्याने मनोजला पैशांची आवश्यकता होती. काही दिवसांपूर्वी व्यवहारावरून जग्यासी आणि मनोज यांच्यात वादही झाला होता अशी चर्चा परिसरात होती. तर हॉटेल पुन्हा सुरु करण्याबाबत पोलिसांचा परवाना मिळावा, यासाठी अँड. जग्यासी प्रयत्नशील होते, अशी पोलिसांची प्राथमिक माहिती आहे.
अखेर नीताचा मृतदेह ताब्यात घेतला
दरम्यान, जैस्वाल कुटुंबीयांनी नीताचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. तिचा आमच्याशी कोणताही संबंध नाही. ती बंगळुरूला कुठे राहत होती, तिचे नातेवाईक कुठे आहेत, मनोजसोबत प्रेमसंबंध जुळण्यापूर्वी ती कुठे राहत होती, याची कोणतीही माहिती आमच्याकडे नाही, असेही त्यांचे म्हणणे होते. मात्र, कदम यांनी त्यांची समजूत घातली. मृत्यूनंतर नीताशी असे वैर ठेवणे योग्य नाही, असे पटवून दिले. त्यानंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.